कोणत्याही संकटात शेतकऱ्याचाच का जातो पहिला बळी?

समाजात काही उलथापालथ झाली की त्याचा सर्वात मोठा बळी शेतकरीच ठरावा ना! जगात काहीही झाले की पहिली ठेच शेतकरी माणसालाच! हे कसे आणि कधी थांबणार?

गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात महापुरानं माणसं उद्ध्वस्त झाली, तर सततच्या दुष्काळी झळांनी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांची होरपळ सुरूच आहे. शेती-मातीवर जिवापाड प्रेम करणारा शेतकरी पाण्याच्या थेंबाथेंबासाठी माती आणि आभाळाबरोबर टक्कर घेत काहीतरी पिकवत असतो. मात्र, कापसाच्या बोंडांनी पोटातली भुकेची वात कधी पेटलीच नाही, उसाच्या फडातले फोड हातावर घेऊन कारखानदारांच्या दारी पायपीट अजूनही थांबली नाही. जोडधंदा म्हणून कुठे पोल्ट्री उभी करावी, कर्जाचे हप्ते उरावर ठेवून ट्रॅक्टर-ट्रॉली घ्यावी आणि पुन्हा समाजात काही उलथापालथ झाली की त्याचा सर्वात मोठा बळी शेतकरीच ठरावा ना! जगात काहीही झाले की पहिली ठेच शेतकरी, कष्टकरी माणसालाच! हे कसे आणि कधी थांबणार?

तीन वर्षांपूर्वी नोटाबंदी आली. हजार-पाचशे रुपयांसाठी रांगेत शेतकरीच उभे. ज्यांच्यासाठी नोटाबंदी करण्यात आली ते नामानिराळेच! कर्जमाफी द्यायची तर त्यातही सतराशे साठ आडकाठ्या. दिले काही दोन-पाच हजार तर त्याचे प्रदर्शन मोठे. शिवार पिकावे, जपावे व फुलावे यासाठी प्रयत्न करणारे कमीच. आता कोरोनो व्हायरस आला. संचारबंदी लागू झाली. अन्नधान्याचा साठा करणारे, त्याचे आकडे सांगणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल मिळत आहे, पण आपल्या बायकापोरांसह उन्हात शेतात काम करायला जाणाऱ्या शेतकऱ्याची मोटारसायकल, मालवाहतूक वाहनाला इंधन मिळत नाही. एकीकडे मजूर शेतात येत नाहीत, तर दुसरीकडे रानात जायला नाकाबंदी हे असे का?

ज्या परिस्थितीला शेतकरी जबाबदार नाही त्यासाठी सतत त्याचे मरण का व कशासाठी? जगायचे तर सगळ्यांना आहे. पण जो शेतीकाम करून जगायला तयार आहे त्याला सारखी मरणाची भीती देणे कितपत योग्य आहे? आम्ही राबराब राबून पीकपाणी उभे करायला निघालो तर पहिले पेट्रोल आम्हाला बंद? संचारबंदी समजून घेणारा शेतकरी कुठे गल्लोगल्ली बोंबलत फिरतोय का? जे फिरतात त्यांना शोधा. पण शेतावर जनावरे पाण्यासाठी टाहो फोडताहेत, पोल्ट्रीवर पक्षी खाद्य नाही म्हणून मरू लागलेत, उभी पिके, माळवे त्याची राख करून काय करायचे? कोरोनो व्हायरस प्रादुर्भाव नको हे सगळे खरे आहे. तरीही शेतकरी थांबला तर सगळेच थांबेल. आज जग थांबले असले तरी शेतकरी जगला व जागला तरच पुन्हा ते होरपळून गेलेले जग उभे राहील.

आता शेतकरी असल्याची कागदपत्रे पाहूनच पेट्रोल दिले जातेय. परदेशातून येणाऱ्यांची कागदपत्रे नीट पाहताना कोरोनो चाचणी नको होती का करायला? आता अंगलट आले की त्याचे भोग शेतकरी समाजाच्या माथी मारणे किती योग्य आहे? आम्ही घरात थांबायला तयार आहे, पण शेतातल्या पिकाची, जनावरांची तहान-भूक कोण भागविणार? कोरोनो आला तो परत जावा, सगळा देश सुखी व्हावा, जग सुखी व्हावे. मात्र, काही झाले की पहिली कुऱ्हाड शेतकऱ्याच्या मानेवर हे काही बरे नाही.

  • नाथराव कराड (शेतकरी,परळी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here