शेतकरी का तोडताहेत पेरूच्या बागा?

9,243 views

“मालेगाव तालुक्यात पेरूचे अतिरिक्त उत्पादन झालेय. बाजारभाव पाच रुपये प्रतिकिलोपर्यंत तुटले आहेत. पुरवठावाढीने ‘पिवळा चिखल’ पाहायला मिळतोय”

प्रा. योगेश सावंत आपला अनुभव सांगत होते. पोस्टमधील फोटो त्यांच्याच बागेतील आहे…

“आघार बु. येथील एक एकरातील पेरू बाग तोडण्याचा मी निर्णय घेतला. पुढे चार वर्ष अजून उत्पादन मिळाले असते. परंतु, अन्य पिकांशी तुलना करता आणि
सध्या आसपास पेरूचे वाढते क्षेत्र लक्षात घेवून पुढे परवडेल, असे वाटत नसल्याने बाग तोडण्याचा निर्णय घेतला.”

“लखनौ 49 वाणाची 2011-12 मध्ये लागण केली होती. सलग सहा वर्ष एकरी दर हंगामात सरासरी दहा टन उत्पादन मिळालेय. 35 ते 40 रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजारभाव मिळत होते. मला व्यक्तिश: सहा वर्षांत किफायती उत्पन्न मिळाले. त्यामुळे तोटा झालेला नाही.”

“पेरूने यापूर्वी उत्पन्न दिलेय. पुढचे चित्र पाहून क्षेत्र मर्यादित केलेय. माझ्याकडे दीड एकरात पिंक तैवान व लिंबूचे दुसरे क्षेत्र आहे. याशिवाय, द्राक्षे, डाळिंब, आवळा, सीताफळ, शेवगा आदी पिकेही घेतोय.”

प्रा. सावंत यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या नोंदी.

3.पेरूचा पहिला बहार पंधरा महिन्यात मिळतो. त्यामुळे रोपलागणी ते पहिले उत्पादन यातले अंतर कमी असल्याने अचानक पुरवठावाढीची परिस्थिती बाजारात दिसते.

2.पेरू पिकांत जे घडलेय तशी परिस्थिती सीताफळासंदर्भात येऊ शकते. म्हणून, काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही फळपिकाचे क्षेत्र बाजारातील मागणीनुसार संतुलित राहिले पाहिजे.

3. मिडो आर्चर्ड पद्धतीत सुरवातीचे चार-पाच वर्ष कल्टिवेशन चांगले होते. पुढे झाडांचे आकारमान वाढते आणि कल्टिवेशन अवघड होते. दीर्घकालीन विचार करता ट्रॅक्टरने काम करता येईल, एवढे अंतर जरूरी वाटते.

मालेगाव तालुका व आघार – दाभाडी परिसर हा संपूर्ण राज्यात फलोत्पादनात अव्वल व अग्रेसर आहे. सुप्रसिद्ध ‘रावळगाव शुगर’ आसपासची ही पंचक्रोशी आहे. प्रा. सावंत यांची निरीक्षणे प्रातिनिधिक म्हणता येतील.

वरील मुद्दे माहितीसाठी दिले आहेत. पुढील बाबी कृपया लक्षात घ्यावात.

  1. वरील पोस्ट ही माहितीसाठी दिली आहे. गुजरात राज्यातही अशाच प्रकारे पेरूच्या बागा तोडल्याचे वृत्त आहे. कृपया, पॅनिक होवून निर्णय घेवू नये. या पोस्टमधील निरीक्षणे वैयक्तिक आहेत.
  2. अनेकदा मंदीच्या आवर्तनात असलेल्या एखाद्या पिकाखालील क्षेत्र अशा पद्धतीने वेगाने नष्ट होते, परिणामी काही महिन्यांनी पिकाचा बाजारातील पुरवठा मर्यादित होते व मंदी हटते असे अनुभव आहेत.
  3. नव्याने कोणी पेरू लागण करत असेल, तर नियोजित क्षेत्रात 50 टक्क्यांनी कपात करणे योग्य राहील, का याचा आढावा घ्यावा. मंदीची परिस्थिती हटल्यावर उर्वरित उदिष्ट साध्य करता येईल का, याबाबत विचार करावा.
  4. सर्वात महत्त्वाचे, प्रा. योगेश सावंत यांनी मिश्रफळ पीक पद्धतीचा अवलंब केला आहे. एका पिकातील मंदीची झळ दुसऱ्या पिकातील किफायती उत्पन्नाने कमी होते. पाच हेक्टरच्या पुढे शेती असणाऱ्यांनी अशाप्रकारे समतोल साधने गरजेचे वाटते.
  • दीपक चव्हाण, ता. 30 नोव्हेंबर 2020.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here