बायोडिझेल म्हणजे काय ?

1,888 views

जमिनीत मिळणाऱ्या कच्च्या खनिज तेलाचं शुद्धीकरण करून त्यातून पेट्रोल आणि डिझेल ही दोन इंधने मिळवली जातात. शुद्धीकरणाच्या या दोन प्रक्रियांचा खर्च जवळजवळ सारखाच असला तरी आपल्या देशात डिझेलचे दर पेट्रोलच्या दरापेक्षा लक्षणीयरित्या कमी ठेवण्यात आले आहेत. त्याचे कारण म्हणजे अन्नधान्यासारख्या जीवन आवश्यक वस्तूंची ने आण करणारे ट्रक बहुधा याच इंधनाचा वापर करतात. पण आता या इंधनाचा वापर करणाऱ्या मोटारीही बाजारात आल्या आहेत. तरीही खनिज तेलाचा वापर कमी व्हावा असाच सर्व देशांचा प्रयत्न आहे. याची अनेक कारणं आहेत. कच्च्या तेलाच्या किमती आता गगनाला भिडू पाहत आहेत. खनिज तेलांचे साठेही झपाट्याने कमी होत आहेत आणि येत्या काही वर्षांमध्ये ते तळ गाठतील असा अंदाज आहे. पण याहून महत्त्वाचं कारण आहे ते हे की या तेलांच्या ज्वलनामुळे हवेत कार्बन डायॉक्साईड व इतर वायू सोडले जातात. हे हरितगृह वायू धरतीचं तापमान वाढून हवामानात मोठा बदल घडवून आणतात. हे प्रदूषण कमी करायच्या दृष्टीने डिझेलला पर्यायी इंधनाचा शोध सुरू झाला. त्यातूनच बायोडिझेलची कल्पना साकारण्यात आली.

बायोडिझेल हे वनस्पती तेलापासून किंवा प्राण्यांच्या चरबीपासून बनवण्यात येते. खास करून सोया किंवा मका यांच्या तेलावर रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून ग्लिसरीन आणि मिथाईल एस्टर ही रसायने वेगळी केली जातात. त्यांची मिथेनॉल या मद्यार्काशी सांगड घालून बायोडिझेलचे उत्पादन केले जाते. डायरेक्ट इंजेक्शन पंप हे तंत्रज्ञान वापरणारी डिझेल इंजिनं या इंधनाचा स्वीकार सहजगत्या करतात. त्यामुळे इंजिनांमध्ये कोणताही बदल न करता साध्या डिझेलऐवजी बायोडिझेलचा वापर करता येतो. परंतु बहुतांशी या दोन प्रकारच्या डिझेलच्या मिश्रणांचा वापर करण्याकडेच सध्याचा कल आहे. या मिश्रणातलं बायोडिझेलचं प्रमाण वीस टक्क्यांइतपत असेल तर कोणतंही डिझेल इंजिन त्याचा सहज स्वीकार करतं. खास करून रेल्वे इंजिनांसाठी असे मिश्रण इंधन उपयोगी ठरले आहे.

बायोडिझेल स्वस्त असल्यामुळे इथे आर्थिक बचत तर होतेच; पण याच्या ज्वलनातून हरितगृह वायूंच्या निर्मितीत पन्नास टक्क्यांहून जास्त घट होत असल्याचेही दिसून आले आहे. म्हणजेच प्रदूषण नियंत्रणालाही हे इंधन हातभार लावते. त्यामुळे त्याचा अधिकाधिक वापर करावा असा आग्रह धरला जात आहे; परंतु त्यात धोका आहे; कारण मग अन्नपदार्थांसाठी पिके घेण्याऐवजी तेलाच्या निर्मितीसाठीच्या पिकासाठी लागवडीखालची जमीन आणली जाण्याचा धोका आहे. या लागवडीतून अधिक उत्पन्न देणारे नगदी पीक मिळत असल्यामुळे शेतकरी त्याकडे जास्त आकर्षित होतील. तसे झाले तर मग अन्नसुरक्षेला फार मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे या इंधनाचा वापर तारतम्यानेच करावा असे तज्ज्ञ सांगत आहेत.

डाॅ.बाळ फोंडके यांच्या ‘काय ?’ या पुस्तकातुन

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here