विषाणूजन्य रोगांचे खापर शेतकऱ्यांच्या माथीच का?

टोमॅटो च्या बाबतीत IIHR संस्थेकडून काल रिपोर्ट प्राप्त झाला. त्या रिपोर्टमध्ये टोमॅटो वर कुकूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही),टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टीबीव्हीडीव्ही), ग्राऊंटनट बड नेक्रॉसीस व्हायरस व टोमॅटो मोझॅक व्हायरस हे 4 मुख्य व्हायरस आहेत असे नमूद करण्यात आले आहेत.

सदरच्या रिपोर्ट मध्ये टोमॅटो अकाली पिवळी पडण्याचे कारण देताना IIHR संस्थेने शेतकरी, नर्सरी चालक तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांनाच अप्रत्यक्षरीत्या जबाबदार धरले आहे. रिपोर्ट नुसार टोमॅटो अकाली पिवळे पडण्याची काही कारणे दिली आहेत ती अशी

1. सीएमव्ही या व्हायरस सहित इतर व्हायरस चा एकत्रित परिणाम
2. फळ परिपक्व होण्याच्या काळात उच्च तापमान असणे
3. नायट्रोजन युक्त खतांचा बेसुमार वापर तसेच शिफारशीत नसलेल्या टॉनिक चा वापर केल्यामुळे फळे मऊ होणे

वरील सर्व कारणांचा विचार केला तर टोमॅटो उत्पादक पट्ट्यात मागील पन्नास वर्षापासून टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. शेतकरी बंधू स्वतःच्या ज्ञानाचा तसेच कंपनीमार्फत पुरवलेल्या ज्ञानाचा वापर करून उच्च उत्पादन घेत आहेत. त्यामुळे वर नमूद केलेल्या बाबी ह्या दरवर्षीच होत असतात. मागील वर्षी ही फळ पक्वतेच्या काळात 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान होते. त्यावेळी अशा काही समस्या शेतकऱ्यांना भेडसवल्या नाहीत. रासायनिक खतांचा वापर करताना टोमॅटो उत्पादक शेतकरी कधीही अतिरेक करत नाही किंवा ठरलेल्या शेडूल प्रमाणेच रासायनिक खते वापरतो. त्यामुळे कुठेही नत्रयुक्त खतांचा अतिरेक होत नाही. आणि तो झालाच तर टोमॅटोमध्ये सेटिंग अजिबात व्यवस्थित होत नाही हे शेतकऱ्याला देखील माहित आहे. यातील बरेच शेतकरी माती परीक्षण करूनच खतांचा मात्रा देतात. सदरचा दिसत असणारा रोग एक दोन एकरवर नसून जवळपास 15000 एकरापर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो पट्ट्यांमध्ये पसरलेला आहे. एकाच वेळेला वरील सर्व गोष्टी प्रत्येक शेतात दिसणे शक्य नाही.

IIHR संस्थेने रिपोर्टमध्ये रोगापासून बचाव करण्यासाठी काही तोकड्या सूचना देखील दिल्या आहेत ज्या वापरल्याशिवाय शेतकरी कधीही टोमॅटोची लागवड करत नाही त्यामध्ये
1.नायलॉन नेट मध्ये तयार केलेली रोपे वापरावीत
2.टोमॅटो लागवड करताना टोमॅटोसाठी गरजेची असणारी गूड अग्रिकल्चर प्रॅक्टिसेस फोलो करावीत.
3. टोमॅटोची लागवड मल्चिंगवर करावी. किडीच्या व्यवस्थापनासाठी चिकट सापळ्यांचा वापर करावा तसेच नत्रयुक्त खते व टॉनिक यांचा संतुलित वापर करावा

सदरच्या रोगासाठी प्रथम भारतातील नामांकित शास्त्रज्ञांची कमिटी तयार करून त्यांना शेतावर बोलून सत्य परिस्थिती दाखवणे गरजेचे आहे यामध्ये काल काही वृत्तपत्रांनी टोमॅटोमध्ये कोणताही अज्ञात व्हायरस नाही अशीही बातमी दिली परंतु टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टीबीव्हीडीव्ही) हा आतापर्यंत कधीही टोमॅटोवर दिसला नाही आणि तोही नवीनच म्हणावा लागेल.

महाराष्ट्रातील प्रत्येक टोमॅटो उत्पादक पॉकेट मधील वातावरण काही अंशी वेगळं आहे.परंतु या रोगाचा प्रादुर्भाव आता जवळपास फलटण,बारामती ,अकोले, संगमनेर, नारायणगाव पट्ट्यात देखील दिसत आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या भागात शेतकरी किंवा नर्सरी चालक चुकीच्या प्रॅक्टिस करतील आणि त्यामुळे हा रोग वाढेल अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सदरचे आलेले रिपोर्ट शेतकरी म्हणून आम्हाला मान्य नाहीत यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती नेमून याच्या ग्राउंड वरील अभ्यास करावा.

ज्यावेळी बियाणे उत्पादक कंपन्या बियाण्यांचे उत्पादन घेतात तेव्हा तरी या वरील सर्व गोष्टींचे पालन करतात का हा चिंतनाचा विषय आहे. बऱ्याच कंपन्या बियाण्यांच्या माहितीच्या पत्रकात आमची जात या या रोगासाठी प्रतिकारक्षम आहे असे जाहीर करतात तरीही त्या जातीवर त्या व्हायरल रोगाचा प्रादुर्भाव होतो ही दुर्दैवाची बाब आहे आणि आमच्या लेखी ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे

सदरच्या रिपोर्ट सोबत शेतकऱ्यांना संपूर्ण ऍडव्हायझरी देणे अपेक्षित होते तशी कोणत्याही प्रकारची ऍडव्हायझरी देण्यात आली नाही. टोमॅटो उत्पादक शेतकरी म्हणून आम्ही आमच्या शेतातील काही भाग सरकारी संस्थांना टोमॅटो पिकवण्यासाठी देण्यास तयार आहोत. त्यांनीच आमच्या प्लॉटमध्ये येऊन या सर्व गोष्टी फॉलो करून टोमॅटोचे उत्पादन घेऊन दाखवावे. त्यामुळे आम्हा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एक दिशा मिळेल आणि इथून पुढे या रोगाचे व्यवस्थापन कसे करावे याचाही मार्ग आम्हाला सापडेल. कृपया याही गोष्टीचा संशोधन संस्थांनी विचार करावा.

श्री. अजित कोरडे
टोमॅटो उत्पादक शेतकरी
मिरेवाडी ता. फलटण जी. सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here