चालू सहामाहीत कांद्याचा पुरवठा फुगवटा नाही

महाराष्ट्रासह देशभरात गेल्या वर्षीच्या तुलनेत घटलेले उन्हाळ कांदा उत्पादन आणि लेट मान्सूनमुळे खरीप कांद्याच्या उत्पादनातील संभाव्य घट यामुळे जुलै ते डिसेंबर या सहामाहीत गेल्या वर्षीसारखी पुरवठा फुगवठा ( supply glut ) परिस्थिती राहणार नाही.

जुलै महिन्यात महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांत १२०० ते १३०० रु. प्रतिक्विंटल दराने कांद्याचे लिलाव होत आहे. मागील वर्षातील कांदा बाजारातील महामंदीच्या अनुभवामुळे शेतकरी या वर्षी माल रोखून न धरता कांदा विक्री करत आहे. यामुळे बाजार अजून १३०० रु. प्रतिक्विंटलच्या वर चाल करू शकलेला नाही. दरम्यान, व्यापारी सूत्रांकडील माहितीनुसार चित्रदूर्ग, कर्नूल या पारंपरिक आगाप खरीप कांदा विभागात लागणी कमी झाल्या आहेत. किती प्रमाणात लागणी घटल्या याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. नाशिक, धुळे जिल्ह्यात आगाप पावसाळी लागणी घटण्याची चिन्हे आहेत. बी टाकण्यासाठी व ते जगवण्यासाठी पाणी उपलब्ध नसणे, ही लागणी घटल्यामागील कारणे शेतकऱ्यांनी सांगितली. लेट पावसामुळे संपूर्ण भारतात कांद्याचा खरीप हंगाम पंधरा दिवस-तीन आठवडे पुढे सरकला आहे. दुष्काळाने आटलेले जलस्त्रोत आणि लेट पावसाळा याचा एकत्रित परिणाम होवून दक्षिण भारतासह महाराष्ट्रात आगाप कांद्याच्या लागणी घटणार असल्याचे दिसते. गेल्या वर्षी पावसाळी व रांगडा अशा दोन्ही लागणींचा माल मंदीत गेला, त्यामुळे या वर्षीच्या हंगामात शेतकरी रोपे टाकण्याबाबत निरूत्साही आहेत. खरीप कांदा बी विक्रीचे आकडेही फारसे उत्साहवर्धक नाहीत.

अलिकडेच, नाफेडच्या माध्यमातून ६० हजार टनापर्यंत कांदा खरेदीचे उदिष्ट वाढवण्यात आल्याचे प्रसिद्ध झाले. नाफेडच्या खरेदीचा माल बाजारात येईल तेव्हा भाव पडतील अशी धास्ती बाळगण्याचे काहीच कारण नाही, संपूर्ण देशाची एका दिवसाची गरज भागवेल इतकाच स्टॉक नाफेडने केला आहे. दुसरा मुद्दा, देशांतर्गत मागणीच्या तुलनेत यंदाचे उन्हाळ उत्पादन नियंत्रित असल्याने निर्यात अनुदान काढून घेतले तरी त्याचा स्थानिक बाजारभावावर परिणाम होणार नाही.

देशांतर्गत कांदा उत्पादन – कांदा उत्पादन वर्ष २०१८-१९ मधील चित्र पाहता महाराष्ट्रात खरीप व लेट खरीप कांद्याच्या उत्पादनात वाढ होती तर उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट आहे. आज उन्हाळ कांदा बाजारात उपलब्ध असून, सप्टेंबरअखेरपर्यंत लक्षणीय प्रमाणात नवे पीक बाजारात नसणार आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ३.५ लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागण होती. या वर्षी महाराष्ट्रात २.६ लाख हेक्टरवर उन्हाळ लागणी झाल्या आहेत. देशातील एकूण उन्हाळ कांद्यातील महाराष्ट्राचा वाटा ६० टक्क्यापेक्षा जास्त असतो. या वर्षी कांद्याखालचे क्षेत्र निर्विवादपणे कमी झालेय, फक्त भिती होती एकरी उत्पादकता वाढीची. शेतकऱ्यांकडील माहितीनुसार या वर्षी एकरी उत्पादकता स्थिर आहे. यामुळे स्टॉकमधील कांद्याबाबत यावर्षी आशादायक, आश्वासक चित्र आहे. ज्यांना आपला कांदा टिकण्याची खात्री आहे, त्यांनी भितीपोटी विक्री करू नये. महाराष्ट्रापाठोपाठ मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, बिहार या राज्यात उन्हाळ कांदा उत्पादन घेतले जाते. दुष्काळी स्थिती व उष्म्याच्या तडाख्यामुळे वरील राज्यातील उन्हाळ कांदा उत्पादन गेल्या वर्षी तुलनेत किमान १० ते १५ टक्क्यांनी घटले असल्याचे व्यापारी सूत्रांकडून कळते.

कांदा निर्यातीचे चित्र – एप्रिल-मार्च १८-१९ आर्थिक वर्षांत भारतातून २१.८ लाख टन कांदा निर्यात झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७.९ टक्के वाढ आहे. १७-१८ मध्ये १५.८ लाख टन कांदा निर्यात होती. वरील निर्यातवृद्धीचा सध्याच्या बाजारभावाशी संबंध जोडता येणार नाही. कारण ती गेल्या आर्थिक वर्षांतील आहे. चालू आर्थिक वर्षांत – एप्रिल २०१९ पासून पुढच्या निर्यातीचा प्रभाव आजच्या बाजारभावावर असेल. देशाच्या एकूण उत्पादनाशी १८-१९ मधील निर्यातीचे प्रमाण जवळपास दहा टक्के येते. एका ट्रेड साईट नुसार २०१८ मध्ये कांद्याचा जागतिक एक्स्पोर्ट सेल्स ३.४ अब्ज डॉलर्स (रु.२३ हजार कोटी ) मूल्याचा होता. २०१८ मध्ये डॉलर व्हॅल्यूत जगामध्ये नेदरलॅंड क्रमांक एकचा निर्यातदार होता. एकूण जागतिक डॉलर रुपी मूल्यात १९ टक्के वाटा नेदरलॅंडचा होता. त्यानंतर चीन (१५ %), मेक्सिको (१२.७ %) आणि भारताचा (१२.५%) क्रम आहे. अपेडा साईटनुसार २०१७ मध्ये नेदरलॅंड पहिला तर भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. भारताचा शेजारी स्पर्धक देश पाकिस्तानचा जागतिक निर्यात मार्केटमध्ये केवळ १.४ टक्के वाटा आहे. भारतीय कांदा निर्यातीचा आकडा पाकिस्तानाच्या एकूण कांदा उत्पादनापेक्षा जास्त असतो. नेदरलॅंडचा कांदा प्रामुख्याने युरोपीय देशांत सॅलड्ससाठी निर्यात होतो. भारतीय कांद्याचे मार्केट प्रामुख्याने सार्क, आखाती व आग्नेय आशियायी देश आहेत – ज्यांचे खानपान भारतासारखे तिखट, तेज आहे. युरोपला सॅलडसाठी कमी तिखट कांदा लागतो. भारतात युरोपसाठीच्या सॅलड कांद्याच्या लागणीचे प्रयोग गेल्या दशकात झाले आहेत, मात्र व्यापारी तत्वावर त्याचे यश ऐकिवात नाही. अलिकडच्या वर्षांतील आकडेवारीनुसार जागतिक कांदा उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर आहे,तर भारत दुसरा आहे.

– दीपक चव्हाण, शेतमाल बाजार अभ्यासक, पुणे.

अॅग्रोवन 15 जुलै 2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here