वनस्पतीशास्त्र: ऊसाचे फुटवे भाग- २

5,221 views

भाग १ साठी येथे क्लिक करा

सूर्यप्रकाश : सूर्यप्रकाशाची तीव्रता व प्रकाशाचा कालावधी यांचा फुटव्यांवरती खूप मोठा प्रभाव असतो. ऊसाच्या शेताच्या परिसरात आणि दिवसभरात काही काळ सावली ऊसावर पडत असेल तर फुटव्यांचे प्रमाण फार कमी राहाते. तसेच फुटवे येण्याच्या काळात आकाश ढगांनी खूपकाळ आच्छादले असेल तर फुटवे कमी येतात.
नवीन लागण केलेल्या शेतात सुरुवातीच्या भरपूर फुटवे येण्याच्या अवस्थेत पाठोपाठ दोन्ही सर्यांतील पाने एकमेकांना भिडण्याची एक अवस्था येते. तोपर्यंत फुटव्यांची संख्या इतकी झालेली असते की अन्नद्रव्यासाठी त्यांची मोठी स्पर्धा सुरु होते. याचवेळेला प्रत्येक फुटीवर भरपूर पालवी आल्याने परस्परांना आच्छादन करतात. या आच्छादनामुळे भरपूर सूर्यप्रकाश असून सुद्धा तो फुटव्याच्या वाढीला कमी पडू लागतो. याप्रमाणे अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश यासाठी झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे फुटवे मरण्याची एक लाट सुरू होते. पण त्यातला प्रकाश हा घटक जास्त प्रभावी असतो. प्रकाशाचा हा प्रभाव ऊसाच्या शरीरांतर्गत निर्माण होत असलेल्या संप्रेरकाशी निगडित असतो. ऊसाच्या शेंड्याकडेला अशी संप्रेरके निर्माण होत असतात. त्यांचे वहन शेंड्याकडून बुडख्याकडे होत असते. याचा दुहेरी परिणाम होतो. या संप्रेरकामुळे काड्यांची लांबी वाढते आणि त्याचबरोबर बुडख्याकडेला उभ्या ऊसावरील पेरांच्या डोळ्यापासून नवे फुटवे येण्याची क्रिया रोखून धरली जाते. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर असतो तेव्हा या संप्रेरकांचे फोटोऑक्सिडेशन होऊन त्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पेरे आखूड राहतात व त्यावरील बाजूच्या सुप्त अंकुरातून नवे फुटवे येतात. पण प्रकाशाची तीव्रता कमी असेल तर ऊसातील अंतर्गत संप्रेरकाचे प्रमाण वाढते. पेरांवरील डोळ्यातील सुप्त अंकुर हे संप्रेरकांना जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे कमी प्रकाशामुळे ऑक्सिडेशन न झालेल्या संप्रेरकांचे प्रमाण अंकुरांना बाधक ठरते व फुटवे येत नाहीत.

तापमान : प्रकाशानंतर तापमान हा घटक फुटव्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. २० अंश सेल्सिअसपासून पुढे जसजसे तापमान वाढत जाते, तसतसे फुटव्यांचे प्रमाण वाढते. ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान ते जास्तीत जास्त राहाते. थंड किंवा अतिउष्ण वातावरणात फुटवा कमी येतो. थोडी उथळ लागण व पाचटाचे आच्छादन यामुळे उबदारपणा येतो व फुटवा वाढतो.

खते : नायट्रोजनची मात्रा जसजशी वाढते तसतसे फुटव्यांचे प्रमाण वाढत जाते. पण एका विशिष्ट मर्यादेनंतर मात्र फुटव्यांची संख्या वाढत नाही.
फॉस्फरसची कमतरता असल्यास वाढत्या मात्रेबरोबर फुटव्यांची संख्या वाढते. पण जमिनीत पुरेसा फॉस्फरस असेल तर मिळणारा प्रतिसाद कमी व तात्पुरता असतो. कारण मर्यादेच्या बाहेर फुटवे वाढल्यास फॉस्फरसच्या कमतरतेची लक्षणे दिसतात.

सिंचन : फुटव्यांची संख्या हमखासपणे वाढविण्याचा उपाय म्हणजे चांगले पाणी व्यवस्थापन. फुटव्यांची निपज ही विभाजनक्षम असलेल्या मेरिस्टेमेटिक पेशींच्या फुगीरपणावर अवलंबून असते. त्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. त्यामुळे अनेक विकरे कार्यान्वित होऊन पेशींचे विभाजन घडून येते व फुटवे वाढतात. तथापी मर्यादेपेक्षा (वाफसा) अधिक ओलावा व मुक्त हवेचा दबाव अभाव फुटव्यास हानीकारक ठरतो. तसेच पाण्याचा ताण सुद्धा फुटव्यावर अनिष्ट परिणाम करतो.

सरीची रुंदी आणि रोप लागणीचे अंतर : कमी रुंदीची सरी व दाट लागण केली तर जरी ऊसाचा फुटवा झाला तरी प्रकाश, हवा, अन्न यासाठी झालेल्या स्पर्धेमुळे फुटव्यांची मर जास्त होते. त्यामुळे सुद्धा फुटवे कमी होतात.
रुंद सरी (४.५ ते ५ फूट) व योग्य अंतर (दीड ते दोन फूट) ठेऊन रोप लागण केल्यास भरपूर प्रकाश मिळतो, हवा खेळती राहते आणि पोषण द्रव्यांसाठी स्पर्धा टळते. भरपूर फुटवे येतात. दक्षिण-उत्तर दिशेच्या सर्यांमध्ये प्रकाश चांगला मिळतो व फुटवे चांगले फुटण्यास मदत होते.

भरणी : आरंभापासूनच फुटवा चांगला हवा असेल तर लागण केलेल्या बेण्यावर कमीतकमी माती राहील हे पहावे, शक्यतो १/४ भाग मातीच्या वर आणि ३/४ भाग मातीत असणे चांगले. यामुळे प्रकाश व उष्णतेचा लाभ होऊन फुटवे भरपूर येतात. पुढे येणा-या फुटव्यांचे मात्र नियमन करावे लागते. हलकी व थोडी उशीरा माती लावली तर फुटवे जास्त मिळतात. याउलट थोडी लवकर (७० ते ८० दिवस) व थोडी जास्त माती लावली तर फुटवे येण्याची क्रिया रोखली जाते. पण या दुस-या प्रकारामध्ये फक्त सशक्त व जोमदार फुटवे मात्र माती बाजूला सारून वर येतात, कमजोर व बारीक फुटवे वाढू दिले जात नाहीत. त्यामुळे बाळभरणी किंवा भरणी हा विषय विचारपूर्वक करावा लागतो. लवकर येणा-या फुटव्यांपासूनच ऊसाची निपज होणे हे सर्व दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यामुळे एकसारख्या वयाचे, आकाराचे व वजनाचे ऊस तोडणीसाठी मिळतात. फुटवे मागेपुढे येत राहिल्यास बेटातील ऊस एका वयाचे रहात नाहीत. लवकर आलेले फुटवे वाढीस लागले म्हणजे सरीतील जागा पानांच्या सावलीने झाकोळली जाते. त्यामुळे तणांची वाढ सुद्धा फारशी होत नाही. बाळभरणी अथवा मोठ्या भरणीनंतरच्या काळात फार जास्त फुटवे येणे अनिष्ट असते. त्यामुळे तोडणीच्यावेळी अपेक्षित ऊसांची संख्या आणि वजन यावर विपरीत परिणाम होतो. पण हे प्रमाण अल्प असेल तर राहू द्यावे. कीड, रोग अथवा अन्य काही कारणामुळे आधी आलेल्या फुटव्यांचे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई या राखीव फुटव्यातून होते. लवकर बाळभरणी अथवा मातीचा दुमाला लावण्याने फुटव्यांची अतिरिक्त संख्या वाढणे टळते. कारण असे जास्तीचे फुटवे मरणारच असतात.

ऊस लोळणे : कोणत्याही कारणाने ऊस लोळला तर त्याच्या बाजूने फुटवे येतात. ऊस लोळल्यामुळे फडामध्ये प्रकाश व तापमानाचे जे बदल होतात त्यामुळे असे फुटवे येतात. ऊस आडवा झाल्यामुळे डोळे फुटतात. शेंड्यांची शिरजोरी कमी झाल्यामुळे संप्रेरकांचे संतुलन बदलते व फुटवे येतात.

रोग आणि किडी : शेंडाकीड आणि कांडेकीड या दोन्हीमुळे ऊसाचे बरेच नुकसान होते. बाळ अवस्थेमध्ये या किडी आल्यातर मातृकोंभ त्याला बळी पडतात. परंतू बाजूचे फुटवे चांगले येतात. जेठा कोंभाची शिरजोरी कमी झाल्यामुळे फुटवे येतात. पण अशा फुटव्यांवर सुद्धा कांडेकीड किंवा शेंडाकीड येते व नुकसान होते. म्हणून किडीचे नियंत्रण करावेच लागते.

मातृकोंभ किंवा जेठाकोंभ मोडणे : ऊसाचे पीक ५५ ते ६० दिवसांचे झाल्यावर जेठाकोंभ जोरदार वाढू लागतो. याचवेळेला बाजूला लहान लहान फुटवे सुरू झालेले असतात. जेठाकोंभ तसाच राहिला तर मोठ्या प्रमाणात अन्नपाणी वापरतो. या स्पर्धेत छोटे फुटवे टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे ते सावकाश वाढतात. शेवटपर्यंत जेठ्याची बरोबरी करु शकत नाहीत. याला शेंड्याची शिरजोरी किंवा जेठ्याची शिरजोरी (अपायकल डॉमिनन्स) म्हणतात. अशा परिस्थितीत जेठाकोंभ मोडल्यास बाजूचे फुटवे जोमाने वाढू लागतात. ऊस एकसारखे येतात. कांड्या लांब, जाड व निकोप राहतात. ऊसाचे उत्पादन १५ ते २० टक्क्याने वाढते. जेठा मोडण्याचे काम लागणीपासून ६० ते ७५ दिवसांनी करावे. शक्यतो बाळभरणीच्या वेळी करावे. जेथे हवामान, जमीन व पाणी हे घटक प्रतिकूल असतात. तेव्हा जेठा मोडणे लाभदायक ठरते.

तुटाळी आणि फुटव्यांची भरपाई : लागण केलेल्या ऊसामध्ये काही कारणामुळे क्वचित ठिकाणी बेण्याची उगवण होऊ शकत नाही. तेथे तुटाळी पडते. अशी तुटाळी भरण्यासाठी सुरवातीपासून लागणीच्या वेळीच पाटाकडेला कांडी लावून ठेवण्याची पद्धत आहे. एखाद्या ठिकाणी तुटाळी पडल्यास दोन्ही बाजूंनी फुटवे वाढून ती जागा भरुन सुद्धा जाऊ शकते. तसेच ऊसामधले फुटवे काही कारणांमुळे मरतात. त्यांची जागा नवीन फुटव्याने भरुन निघते. बाल्यावस्थेत अशी भरपाई चांगल्या प्रकारे घडून येते. पण ऊस मोठा झाल्यावर भरपाईचे प्रमाण कमी होते, म्हणून लागणीचे वेळीच रोपे तयार केल्यास तुटाळी भरणे सोईचे होते.

पानशा फुटणे किंवा फांद्या फुटणे (एरियल ब्रांचिंग) : निकोप उभ्या ऊसाला पानशा फुटण्याचा प्रकार कमी घडतो. शेंड्याकडील अंकुरामधल्या संप्रेरकाच्या प्रभावामुळे इतर कांड्याजवळील डोळे फुटत नाहीत. पण काही वाणांमध्ये पानशा फुटतात. ज्या शेतामधील हवेत आर्द्रता व तापमानामध्ये लक्षणीय बदल होतात तेव्हा पानशा फुटतात. काही वेळेस ऊसाच्या वरच्या भागात पडलेले पाणी पानांच्या देठात साठून राहते. अशा देठा जवळील डोळ्यांतून पानशा फुटतात. जुनी पाने काढल्यामुळे पानशा फुटण्याचे प्रमाण कमी होते. ऊस लोळला तरी पानशा फुटतात. इथे ऊस आडवा झाल्यामुळे माती व पाण्याशी संपर्क येतो. त्यामुळे पानशा फुटतात. उभ्या ऊसामध्ये रोग किंवा किडींमुळे शेंड्याकडेच्या पेरांना हानी होते. त्यामुळे शेंड्याचा प्रभाव कमी होऊन खालच्या डोळ्यातून पानशा येतात. वार्यामुळे शेंडे मोडले, तुटले तरी पानशा येतात, तुरा आल्यानंतर सुद्धा पानशा फुटतात.

संपर्क : डॉ. जमदग्नी सर, ९४२२६२७७६२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here