सरकारच्या परिभाषेत शेतकरी कुठे बसतो का??

प्रचार झाला निवडणुका झाल्या शेतकऱ्याच्या पोरांनी झेंडे नाचवले, जेवणावळी खाल्ल्या, नेत्याला निवडून देखील आणले. पण आपली शेती कुठे आहे हे कधी पाहिले का?

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात सर्वच भागात दाणादाण उडवून दिली आहे. मका बाजरी सोयाबीन सारखी पीक शेतातच उगवून येत आहेत. द्राक्षा सारखे परकीय चलन मिळवून देणाऱ्या पिकाचे देखील नाशिक,सांगली भागात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच पावसाने दिलेली ओढ त्यातही कसबसं हाती आलेले पीक त्याचेदेखील नुकसान होताना शेतकरी मनाला किती यातना होत असतील याची थोडीतरी सरकारी बाबूंना कणव यायला हवी.

पिक विम्याच्या बाबतीत पैसे भरून घेतले जातात परंतु बऱ्याच गोष्टी शेतकऱ्याला देखील माहीत नसतात. नुकसान झाल्यानंतर किती वेळात विमा कंपनीला कळवावे लागते, तलाठ्यांनी त्याचा पंचनामा कधी करावा लागतो अश्या गोष्टी शेतकर्‍याला माहीत नसल्यामुळे पिक विमा देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. कागदांची पूर्तता करण्यात काळ निघून जातो त्यासोबत हातातील पीक देखील.
सध्या बहुमताने निवडून आलेली महायुती त्यांचे सरकार स्थापन करण्यात मग्न आहे. देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री कोण हे महत्त्वाचे आहे. यांनी प्रचाराच्या वेळी शेतकरी केंद्रबिंदू मानून प्रचार केला परंतु आता शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत किंवा सहाय्य होत नाही. सरकारने शेतकऱ्याला सपशेल वाऱ्यावर सोडलं आहे. प्रिंट मिडीया सोडला तर इलेक्ट्रॉनिक मीडियात शेतीच्या नुकसानीबाबत कुठेही बातम्या नाहीत. तेही टीआरपी वाढवणाऱ्या बातम्या छापण्यात मग्न आहेत

शेतकऱ्याच्या पोरांनी वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे हातात घेऊन घरचं खाऊन नेत्यांचा प्रचार केला. त्यांना या झालेल्या नुकसानीबाबत देखील जाब विचारण्याची हिंमत तुमच्या मध्ये आहे का? आणि ती हिंमत नसेल तर शेतकरी पुत्र म्हणूनच घेऊ नका.

प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या नरड्यावर सुरी ठेवून राजकारण केलं जातं आणि तुमच्या सारखेच महाभाग त्याला हातभार लावतात. आता तरी शासनाने जागे होऊन ओला दुष्काळ जाहीर करावा ज्या भागात पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा भागातील शेतकऱ्यांना भरपाई मिळावी तसेच पीक कर्ज देखील माफ व्हावे.
लक्षात राहुद्या शेतकरी जगला तर देश जगेल.

  • डॉ. अंकुश चोरमुले
  • प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,महाराष्ट्र राज्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here