राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शेती विषयक कार्य

कोल्हापूर संस्थानाची त्यावेळची लोकसंख्या आठ ते नऊ लाखांच्या दरम्यान होती. आज ती कितीतरी अधिक आहे. या भूमीचा मुख्य व्यवसाय शेतीच होेता. आज उद्योगधंदे वाढले आहेत. सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने आणि तत्सम उद्योग, शेतीपूरक उद्योग यांचे जाळे पसरले आहे. महाराजांच्या कारकिर्दीत शेती हा प्रधान व्यवसाय होता; पण शेतीचे लहान-लहान तुकड्यांत विभाजन झाले होते. वाटणी व्यवहाराने अशा लहान तुकड्यांची निर्मिती झाली होती. ती बदलावी आणि त्याचे रूपांतर मोठ्या शेतीमध्ये व्हावे हा त्यांचा विचार होता. म्हणजे शेती किफायतशीर होईल आणि शेतकऱ्याची प्रगती होईल असे त्यांचे स्पष्ट मत होते. हे मत त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविले आहे. माणगावच्या परिषदेमध्ये भाषण करताना ते म्हणाले, ‘तुम्ही साधारण माणसी दहा एकर जमीन वाट्याला येईल असे तुमच्या म्हारकीचे तुकडे करा आणि हे उत्पन्न तुमच्यातील वडील असणाऱ्या व्यक्तीकडे चालवायला द्या. म्हणजे सर्वांना अर्धपोटी राहावे लागते ते वाचेल?’ त्यासाठी त्यांनी १९१३ ला अविभाज्य इनामाचा कायदा केला. त्यामध्ये वाटणी करता येणार नाही असे ठरविले.
त्यांनी सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेशही दिला. ते म्हणत, ‘कृषी कर्मापासून दुहेरी उन्नती होते. स्वत:ला सुख तर होतेच, शिवाय सर्व मनुष्य जातीलाही सुख मिळते. कृषी कर्म करताना क्षात्र धर्माला बाधा येते ही समजूत निखालस खोटी आहे. ज्यावर माणूस समाजाची सुव्यवस्था आणि उन्नती अवलंबून आहे, ते कर्म कमीपणाचे आहे ही समजूत वेडगळपणाची आहे. हे असे कर्म करणारा माणूस समाज खऱ्या अर्थाने क्षत्रिय होय. अन्न माणसाला जगविते. त्याचे पालनपोषण करते. त्याला बलवानही करते आणि इतरांनाही जगवा असा संदेश देते. श्रमाची प्रतिष्ठा जगात मोठी, फारच मोठी आहे. शेती ही श्रमाची प्रतिष्ठाच आहे.’


महाराजांनी शेतीचे विविध प्रयोग आणि त्यासाठी संशोधन यांचाही मागोवा घेतला. जुन्या अवजारांच्या ठिकाणी नवी अवजारे आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने, शेती संस्था असे उपक्रमही सुरू केले.
शेतीला उपयुक्त जनावरांची प्रदर्शने त्यांनी घडवून आणली. पारंपरिक पिकांशिवाय नवी पिके घेण्याचा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविला. पन्हाळा व भुदरगड येथे चहा आणि कॉफीची लागवड करण्याचा प्रयोग केला. शिवाय वेलदोडे, कोको, रबर, ताग, अंबाडी, बटाटे, लाख, ट्रॅपिओका, कंबोडीयन कापूस, आदींची लागवड म्हणजे महाराजांच्या प्रयोगशीलतेचे आणि प्रगतिशीलतेचे द्योतक होय.

उद्योग निर्माणामध्ये ते अग्रेसर ठरले. कोल्हापूरची शाहू मिल हे त्याचे मोठ उदाहरण. येथे पहिल्यांदा सूत आणि नंतर कापड निर्मिती सुरू झाली. इचलकरंजी, कोल्हापूर, शिरोळ, चिंचली, गडहिंग्लज अशा ठिकाणी जिनिंग फॅक्टरी सुरू झाल्या. महाराजांनी माणसांचे जीवनमान सुधारावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा केली. यामागे विचार, रचनात्मकता आणि त्यांची कळकळ होती. हा अष्टावधानी राजा त्या काळचं लेणंच ठरला.


महाराज स्वारी- शिकारी- दौर्‍यासाठी राज्यात दौरे करीत असताना त्यांच्या मुक्कामी लागणारे साहित्य, अन्नधान्य लोकांकडून फुकट न आणता त्यांना भरीव मोबदला देत जावा, असा दंडक महाराजांनी घालून दिला.


शाहू महाराजांचे कार्य अतिशय नियोजनबद्ध व अविश्रांत असे होते. सन १८९६ चा दुष्काळ आपत्तीचा मुकाबला अतिशय धीरोदात्तपणे महाराजांनी केला. यासाठी महाराज स्वत: दौरे करून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यासाठी त्यांनी अन्नधान्याची आयात करून स्वत: धान्याची दुकाने काढली. शेतकर्‍यांना सारामाफी देऊन गुराढोरांसाठी वैरणाची व्यवस्था केली. दुष्काळग्रस्तांसाठी ठिकठिकाणी नऊ निराधार आश्रमे काढली. रोजगारासाठी रस्ते, विहिरी, तलावाची कामे सुरू केली. येथे काम करणार्‍या मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघरे उभी केली. यावरून शाहू महाराजांची नियोजनबद्धता वृत्तीचा प्रत्यय येतो.


युरोप दौर्‍यातील अनुभव पाहता, महाराजांनी देखील आपल्याकडील शेती उत्पादन वाढविण्यासाठी सन १९१२ साली कोल्हापुरात किंग एवर्ड ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. तेथेच आधुनिक शेती अवजारांचे एक म्युझियम सुरू करून शास्त्रीय पद्धतीने शेती करण्याचे धडे शेतकर्‍यांना दिले. तसेच मराठी माणूस फक्त शेतकरी किंवा सैनिकच होऊन राहू नये, तर त्यांनी उद्योग व्यापार करावा त्याशिवाय आमच्या सर्व चळवळी निरर्थक व निस्तेज होतील. असे महाराजांना नेहमी वाटत असे म्हणून त्यांनी नवीन बाजारपेठ, वखारी, मिल्स, कापड गिरण्या, जिनिंग फॅक्टरी, ऑईल मिल, पहिली सॉ मिल, पहिली फाऊंड्री फॅक्टरी, पहिली इलेक्ट्रिकल कंपनी, पहिली मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी आदी उद्योग-व्यापार स्थापना केले व इच्छुकांना प्रोत्साहन व मदत देऊन उद्योग व्यापाराला चालना व गती देण्याचे फार मोठे कार्य महाराजांनी केली.


सध्या कोल्हापूर जिल्हा म्हटला, की समृद्धीची शिखरे समोर येतात. अलीकडच्या काळात जिल्ह्याच्या शेतीत मोठी सुधारणा झाली आहे. पण याचे खरे श्रेय जाते ते राजर्षी शाहू महाराजांना. त्यांनी उभारलेल्या राधानगरी धरणामुळे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शिवारे हिरवाईने फुलली आहेत. या धरणाला शंभरहून अधिक वर्षे झाली आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या मनात या धरणाविषयी अतिशय जिव्हाळ्याची भावना आहे. या धरणाने शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून टाकले आहे. राजर्षी शाहू महाराज यांची पाण्याबाबतची ही दूरदृष्टी आजही पथदर्शी ठरत आहे.


तलाव, विहिरी, बंधाऱ्यांसाठी साहाय्य केले महाराष्ट्रातल्या इतर भागांप्रमाणे कोल्हापूर संस्थानातही दुष्काळ पडत असे. दुष्काळाच्या काळात मदत करण्याची शाहू महाराज यांची भूमिका होतीच; परंतु दुष्काळ निर्मूलनाचा खरा मार्ग शेतीला पाणीपुरवठा वाढविणे हाच होय; असा विचार शाहू महाराज यांचा होता. यासाठी नद्या, विहिरी आणि तलाव या सर्व घटकांचा अवलंब शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संस्थानात होत होता. १९१५-१६ या वर्षांतील अहवालावरून असे दिसते, की कोल्हापूर संस्थानात नद्यांमधून ३९७८३, विहिरींमधून ३९८४५, आणि तलावांमधून २३२ एकर असा एकूण ७९८६० एकर क्षेत्रावरील शेतीला पाणीपुरवठा होत होता. तळी, विहिरी, बंधारे बांधण्यास शाहू महाराज यांनी प्रोत्साहन दिले व साह्यही केले.

राधानगरी धरण दूरदृष्टीचे प्रतीक
केवळ भूजलातून पाणी न घेता नद्यांमधील पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी धरणाची संकल्पना मांडली. नद्यांचे पाणी अडवून ते पाणी शेतीतील पिकांसाठी उपयोगात आणावे यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. १९०९ मध्ये राधानगरी धरण प्रकल्प हाती घेण्यात आला. शाहू महाराज यांनी या धरणावर १९१८ पर्यंत १४ लाख रुपये खर्च केले. या धरणाच्या माध्यमातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी अडविले. जलसाक्षरता व जलसंधारण क्षेत्रात आजही मार्गदर्शक ठरावे, असे मौलिक कार्य राजर्षी शाहू महाराज यांनी केले. संस्थानाचा आकार, आर्थिक कुवत आणि तंत्रज्ञानाची मर्यादित उपलब्धता हे लक्षात घेता शाहू महाराज यांनी आखलेली व कार्यान्वित केलेली राधानगरी धरणाची योजना त्यांच्या महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीच्या धोरणाचे प्रतीक आजही मानली जाते.
असे एक ना अनेक प्रयोग व धोरण या राजाधिराज यांनी राबवली.

“आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन”…


इरफान शेख, प्रबंधक,
होय आम्ही शेतकरी, महाराष्ट्र राज्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here