सह्याद्री फार्ममधील द्राक्षांचा एकाच हंगामातील दुसरा बहर!


राज्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून द्राक्ष उत्पादक पुढील हंगामाच्या तयारीला लागले आहेत.
मे महिन्याच्या अखेरच्या या दिवसांत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील ‘सह्याद्री फार्म्स’च्या शेतातील आरा १५ वाणाची द्राक्षे बहरलेली आहेत.

या बागेचा या हंगामातील दुसरा खुडा सुरु झाला आहे. म्हणजे मागील हंगाम आणि यंदाचा हंगाम एकत्र पकडला तर या बागेपासूनचे हे चौथे पिक आहे. भारतीय द्राक्ष शेतीतील ही नवलपूर्ण घटना आहे. कॅलिफोर्नियातील नर्सरीत तयार झालेले हे पेटंट वाण चिलीमधून भारतात आले व ते आता नाशिकच्या मातीत चांगलेच रुजतांना दिसत आहे. ‘सह्याद्री’ने हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यास सुरुवातही केली आहे. या शिवाय अजूनही काही पेटंट वाण ‘सह्याद्री’ च्या पुढाकारातून भारतात विशेषतः महाराष्ट्राच्या मातीत येत आहेत. हे पेटंट वाण येत्या काळातील द्राक्ष शेतीचा चेहरामोहरा बदलून टाकतील यात शंकाच नाही.

आरा १५ वाणाची वैशिष्ट्ये : हिची फलधारणा क्षमता १२० ते १६० टक्के आहे. जोरदार पावसातही चांगले काम करते. मण्याची क्रॅकिंग अजिबात होत नाही. जीबरेलीक चा वापर अत्यंत कमी म्हणजे ०.५ ते १ ग्रॅम या प्रमाणातच आहे, जो बाकी थॉमसन वानांना १२५ ग्रॅम च्या आत बाहेर लागतो. गोड, रसाळ, कुरकुरीत चव, एकसारखा आकार यामुळे घडही आकर्षक दिसतो. सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या वर्षी काही नैसर्गिक आपत्ती उदभवली तर वर्ष वाया जात नाही.

एका पिकाचे पूर्ण नुकसान झाले तरी लगेच छाटणी घेऊन याचे दुसरे उत्पादन घेता येते. ‘सह्याद्री’च्या रावळगाव येथील शेतात हे उत्पादन घेतले असून इथे आरा वाणाची सगळी वैशिष्ट्ये दिसून आली आहेत. मागील वर्षी निसर्ग वादळाच्या वेळी खुडणी सुरु असतांना जोरदार पाऊस झाला. दोन दिवस बागेतुन पाणी वाहत होते. मात्र, वेल आणि फळ पूर्णपणे मजबूत राहिले आणिभ पूर्ण क्षमतेने उत्पादन मिळाल्याचा अनुभव आम्ही घेतल्याचे सहयाद्री फार्म्स चे मुख्य ऍग्रोनॉमिस्ट सचिन वाळुंज यांनी सांगितले.
ज्ञानेश उगले,
ठिकाण : रावळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक)
२९ मे २०२१

सह्याद्री फार्म या फेसबुक पेज वरून सकभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here