– खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती (एमएसपी- हमीभाव) केंद्र सरकारने जाहीर केल्या. या किंंमती उत्पादनखर्चाच्या दीडपट असल्याची लोणकढी थाप केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून तीच थाप मारली. ते त्यांच्या लौकिकाला साजेसे आहे. वास्तविक आधारभूत किंमतीत तुटपुंजी वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोग पिकांचा उत्पादनखर्च काढताना तीन व्याख्या वापरतो- A2, (A2 + FL) आणि C2.
– एखादे पीक पिकवताना शेतकरी बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन आदी वस्तुंवर जो खर्च करतो तो A2 मध्ये मोजला जातो.
– तर (A2 + FL) मध्ये या खर्चासोबतच शेतकरी आणि त्याच्या कुटुंबियांनी शेतात केलेल्या कामाची मजुरी हिशोबात धरली जाते.
– C2मध्ये मात्र जमिनीचे आभासी भाडे/खंड आणि स्थायी भांडवली साधनसामुग्रीवरील व्याज हे सुध्दा मोजतात. त्यामुळे C2 ही व्याख्या अधिक व्यापक ठरते आणि त्यानुसार काढलेला पिकाचा उत्पादनखर्च हा अधिक रास्त असतो.

स्वामिनाथन आयोगाने C2 उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली होती. ती लागू करू असे आश्वासन नरेंद्र मोदी आणि भाजपने दिले होते.

परंतु प्रत्यक्षात केंद्र सरकारने जाहीर केलेले भाव C2 च्या नव्हे तर (A2 + FL) च्या दीडपट आहेत. ही शुध्द फसवणूक आहे. गेल्या दोन वर्षांपासून सरकार हीच थापेबाजी करत आहे.

एखाद्या पिकाच्या (A2 + FL) आणि C2 उत्पादनखर्चामध्ये खूप फरक असतो. उदा. केंद्रीय कृषी मूल्य व किमत आयोगाने यंदा हमीभाव जाहीर करताना तुरीचा (A2 + FL) उत्पादनखर्च प्रति क्विंटल ३७९६ रूपये तर C2 उत्पादनखर्च ५४६४ रूपये धरला आहे. कापसाचा (A2 + FL) उत्पादनखर्च ३७६६ रूपये तर C2 उत्पादनखर्च ४९३५ रूपये येतो. सोयाबीनचा (A2 + FL) उत्पादनखर्च २५८७ रूपये तर C2 उत्पादनखर्च ३५१७ रूपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here