रब्बी हंगामातील ज्वारी व मका पिकाची पेरणी झाली असून पिक वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी रब्बी ज्वारीवर मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसुन येत असुन त्यासाठी पुढील प्रमाणे एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
लष्करी अळीचे व्यवस्थापन:
- मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ३ ते ४ ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५% निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
- अंडीपुंज, समुहातील लहान अळया आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून राॅकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
- मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळ्याचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरिक्षण करावे.
- सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत. यासाठी एकरी १५ कामगंध सापळे लावावेत तसेच प्रकाश सापळे लावावेत.
- किडींचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इत्यादी) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस इत्यादी) यांचे संवर्धन करावे. यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
- ट्रायकोग्रामा किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त ५०,००० अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा किंवा कामगंध सापळ्यामध्ये ३ पतंग/सापळा आढळून आल्यास शेतात सोडावे.
- रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था या कालावधीत ५% प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी १०% प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त बुरशी व जिवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.
अ.क्र. | जैविक कीटकनाशक | मात्रा/१० लि. पाणी |
१ | मेटाऱ्हायजियम एनिसोप्ली (१x१०८सीएफयु/ग्रॅम) | ५० ग्रॅम |
२ | नोमुरिया रिलाई (१x१०८ सीएफयु/ग्रॅम) | ५० ग्रॅम |
३ | बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती | २० ग्रॅम |
वरील जैविक कीटकनाशके पिक १५ ते २५ दिवसाचे झाल्यास पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशाप्रकारे फवारणी करावी. त्यानंतर १० दिवसाच्या अंतराने १ ते २ फवारणी करावी. सध्याचे ढगाळ वातावरणात जैविक कीटकनाशकांच्या वापरासाठी पोषक आहे.

विशेष सूचना
- रासायनिक किटकनाशकाची फवारणी चारा पिकावर करु नये.
- एकाच रासायनिक किटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करु नये.
- तुऱ्याची अवस्था व त्यानंतर फवारणी टाळावी.
- फवारणी करताना मजुराने सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.
- एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.
लष्करी अळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजिव बंटेवाड, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे.
From where should I get bio insecticide for lashkari worm in Jalgaon
मक्यावरी ल लष्करी अळी साठी जैविक कीटकनाशक जळगांव मध्ये कुठे मिळेल