लोडशेडींग आणि गावगाडा

पुर्वी गावामधे भारनियमन असायचे. गावात कोणी त्याला लोडशेडिंग तर कोणी लोडशिटींग म्हणतात साधारणतः 6-6 तासाचे लोडशेडिंग तेव्हा असायचं. सायंकाळी 5-6 दरम्यान लाईन जायची तर थेट मध्यरात्री 12 नंतरच यायची. पौर्णिमेचा लख्ख चंद्र जणू गावाला प्रकाशित करायचा, तर अमावसेच्या रात्री “चुर-चुर-चुर” करणारी रातकिडे त्या अंधाराला अजून भयाण करायचे. दरम्यान गावातल्या बाया बापड्या आपली कामं लवकर आटोपून एकमेकांच्या ओट्यावर जाऊन बोलंत बसायच्या, तर कुठे रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या ट्रॕक्टरवर किंवा मंदिराच्या ओट्यावर बसून युवकांचे घोळके ‘रसभरीत’ चर्चा करीत रमलेली असायची. तर कुणी रात्री लाईन आल्यावर वावरांत पाणी द्यायला जायचं या ताणात राहायची.

बुजुर्ग बिचारी आपली बाहेर बाजा,खाटा टाकून त्यावर नातवं खेळवायची. गावांत दुर कुठेतरी कोणत्या तरी कोपऱ्यात एखाद्या जवळच असणारा Everyday च्या सेल वर चालणाऱ्या रेडिओवरून. आकाशवाणी अकोल्याच्या केंद्रावरून प्रसारीत घडामोडी. गावातील काळोख आणि शांतता चिरत कानावर पडायच्या. बर्याचदा रेडिओ वर ठरलेली गाणीही असायची,जशी की बिंदिया चमकेगी,तेरे कारण-मेरे कारण किंवा मोहम्मद रफी-लता यांची बहारदार गाणी त्या काळोखाला गडद रंग द्यायची. किंवा असलीच क्रिकेटची मॕच तर अवघा मोहल्ला त्या रेडीओ जवळ येऊन ‘लेग आॕफ की तरफ से हवां मे उछली हुई गेंद को युवराज ने डाय मारते हुए रोक के सिधा थ्रो किया और ये…रन आऊट….!!!’ ही काॕमेंट्री ऐकतांना प्रत्येकात जणू युवराजच जन्मत असे,तर उत्सुकतेपोटी नसानसातलं रक्त गरम होऊन सळसळ करीत पळायचं. पुन्हा मॕच झाल्यावर ‘त्याने कॕच सोडली म्हणून मॕच पलटली’ वरून मैफिल सुरू व्हायची.

तेव्हाच्या रात्री गडद होत्या पण गोंधळाच्या नव्हत्या.निरव शांततेच्या होत्या पण संवादांनी भरलेल्या होत्या. मग तो बायकांचा ओटा असो की तरूणांचा तेथे मुक्त संवाद असायचा. व्यक्त होण्याचा अन समजून घेण्याचा मोकळे पणा होता. दररोजचा एवढा प्रचंड काळोख सहन करण्याची सहनशिलता होती. हे सगळं व्हायचं ते लोडशिडींग या शब्दामुळे.

पण हल्ली हा शब्दच गावाच्या बोलीभाषेतून दुर्मिळ झाल्यासारखा आहे. कारण आता पहिल्यासारखं लोडशेडिंग गावात नसतं. आता आमचं गाव सिंगल फेज झालंय,म्हणून आता 24 तांस लाईट असतींया. थोडावेळ जरी लाईट गेली तरी, सब स्टेशन ला फोन जातात. “साहेब लाईट केव्हा येते?” म्हणून विचारणा केल्या जाते. हे म्हणजे गावाच्या सहानशीलतेचा बांध किती लहान झाला याचेच प्रतिक आहे.

त्याचं कारणही आता की,ज्या कट्ट्यावर युवकांचे घोळके बसायचे ते कट्टे आता मोडले. आणि त्यांची जागा whats app च्या ग्रुप्सनी घेतली. त्या ग्रुपवर चर्चाही होतात पण त्या आधीसारख्या मोकळ्या ढाकळ्या खुलेपणाने न होता,त्या Forward केलेल्या मॕसेजेसने control केलेल्या असतात.
बर्याचदा त्यात धर्म,जातीच्या द्वेषाच्या छटाही असतात.म्हणून प्रत्यक्ष बोलल्या नंतरचा मोकळेपणा Whats ap वरच्या ग्रुप मधे मिळंत नाही. बायकांच्या ओट्यांची जागाही बदलली,आता ती जागा घरातील TV संचांनी घेतली. त्यावरील सिरीयल्संनी बायकांच्या डोक्याचा ताबा घेऊन,घरातल्या गैरसमजांना मोठं करण्याचंच कामं केलंय.

तर गावाच्या एखाद्या कोपऱ्यातच वाजणार्या रेडीओची जागा भंगारात गेली. आणि आधी सगळा मोहल्ला मिळून ज्या रेडीओवर क्रिकेट ऐकायचे. ते आता घरातल्या TV समोर कुटुंबासोबत बघतात, तर काही त्यापुढेही जाऊन HOTSTAR वर एकट्यातच कानांत हेडसेटस घालून मोबाईल वर रमतात.
वरकरणी पाहिलं तर भौतिक सुविधांनी आणि बाह्य झगमगाटाने गाव अन गावकरी पुढारले असतील.
पण आत्मिक प्रगतीने मात्र गावांची अधोगती झालींय असं मला वाटतं.

संवाद कुंठला अन गावगाड्यातली माणसंही आता एकटी होत चालली. दररोज नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञानाने मानवाला भौतिक दृष्ट्या संपन्न केलेंही असेल.किंवा तंत्रज्ञानाच्या अनेक जमेच्या बाजूही असतील,पण ते तंत्रज्ञान माणसाला एकटं पाडतं चाललंय हे मात्र निश्चितच खरं आहे. या वेगवान जगाच्या वेगाशी स्पर्धा करता करता,तंत्रज्ञान स्वःताशी संवाद साधण्याइतपतही वेळ मिळू देत नाही.
कारण हल्ली माणसं तंत्रज्ञानाला नियंत्रित करीत नसून,तंत्रज्ञान माणसांना नियंत्रित करायला लागलंय…
म्हणून कधीकधी वाटतं..गावांत सक्तीचं दोन तासांचं तरी का होईना पण पुन्हा लोडशेडींग सुरू करायाला पाहिजेत.त्याच दोन तासांसाठी जॕमर लाऊन,डेटा सर्व्हर डाऊन केले पाहिजेत.म्हणजे इंटरनेट चालणारंच नाही….म्हणजे मंग कसं माणसं पुन्हा एकदा कट्ट्यावर जमायला लागतील आणि क्षुल्लक कारणांवरून उभ्या राहिलेल्या मनामनातील भींती नष्ट होतील. मनमोकळेपणाचा प्रवाह खळखळून वाहेल. पण पुन्हा हे फक्त मलांच वाटतं….

सौरभ हटकर
खामगांव जि बुलढाणा 9694079143
अधिक लेखांसाठी कृपया saurabhhatkar.blogspot.com ला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here