कडकनाथप्रकरणी सांगलीत १६ रोजी मोर्चा

कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामध्ये शेतकर्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रत्येक तालुक्यातून पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू आहे. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कडकनाथ कोंबडीपालक शेतकरी संघर्ष समितीची स्थापना रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. तसेच 16 सप्टेंबररोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महारयत अॅग्रो इंडिया या कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनाचे आमिष दाखवून शेतकर्यांची मोठ्याप्रमाणात फसवणूक केली आहे.


शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. फसवणूक झालेल्या शेतकर्यांना न्याय मिळावा, यासाठी कडकनाथ कोंबडीपालक शेतकरी संघर्ष समितीची स्थापना सांगलीत झालेल्या बैठकीत करण्यात आली. 16 सप्टेंबररोजी सकाळी 10 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. संघर्ष समितीचे निमंत्रक म्हणून कॉ. दिग्विजय चव्हाण, कायदा सल्लागार म्हणून अॅड. अमित शिंदे हे काम पाहणार आहेत. समितीचे सदस्य म्हणून स्वाभिमानीचे महेश खराडे, कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील, विकास मगदूम, जयंत जाधव, महालिंग हेगडे, डॉ. विवेक गुरव, शाकीर तांबोळी आदी काम पाहणार आहेत.


शेतकर्यांच्या बाजूने वकिलांची टीम
अॅड. अमित शिंदे म्हणाले, महारयत अॅग्रोच्या माध्यमातून शेतकर्यांची मोठ्याप्रमाणात फसवणूक झाली आहे. या कंपनीतील संचालकांवर एमपीआयडीनुसार गुन्हे दाखल करून प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. संचालकांने त्रयस्थ व्यक्तीच्या नावे प्रापर्टी केली असल्याची चौकशी करून ती जप्त करावी. सध्या पोलिस एकच गुन्हा दाखल करण्याच्या विचारात आहे. परंतु फसवणूक झालेल्यांची स्वतंत्र गुन्हा दाखल झाले पाहिजे. सध्या कंपनीकडून कंपन्यांना खाद्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. प्राण्यांच्या छळातर्गंत गुन्हे दाखल झाले पाहिजे. ग्राहक न्यायालयातही गुन्हे दाखल करणार आहे. त्यासाठी वकिलांची टीम तयार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here