मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ.अंकुश चोरमुले, प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह.

फॉल आर्मीवर्म- लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका  करणारी कीड असून जून २०१८ मध्ये तिचा भारतात सर्वप्रथम प्रादुर्भाव दिसून आला. या किडीमुळे मागील खरीप व रब्बी हंगामात मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  मागील वर्षी असणारी पाण्याची कमतरता तसेच लष्करी अळीचा प्रादुर्भाव यामुळे मक्‍याच्या दरात कायम तेजी पहावयास मिळाली. सध्या खरीप तोंडावर येऊन ठेपला असताना येत्या हंगामात देखील या किडीमुळे मका पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय करणे गरजेचे आहे

किडीचा जीवनक्रम 

लष्करी अळीचा  जीवनक्रम अंडी,अळी,कोष व पतंग या चार अवस्थेमधून पूर्ण होतो 

अंडी अवस्था – मादी पतंग पानाच्या वरच्या व खालच्या बाजूला तसेच पोंग्यामध्ये जवळपास एक हजार अंडी घालते. अंडी पुंजक्यामध्ये घातली जातात व त्यावर लोकरीसारखे आवरण असते. अंड्यांचा रंग पिवळट सोनेरी असून ती घुमटाच्या आकाराची असतात. अंडी अवस्था २  ते ३ दिवसाची असते.

अळी अवस्था – अळी अवस्था ही जवळपास सहा अवस्थेमधून पूर्ण होते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या  अळ्या अन्नाच्या शोधात विखुरल्या जातात. प्रथम अवस्थेतील लहान अळ्या रंगाने हिरव्या असून त्यांचे डोके काळ्या  रंगाचे असते.  दुसऱ्या अवस्थेमध्ये अळीने  प्रवेश केल्यानंतर तिचे डोके तपकिरी रंगाचे होते.  तिसऱ्या अवस्थेमध्ये अळीचा रंग तपकिरी होतो. तिच्या अंगावर वरच्या बाजूने तीन पांढऱ्या रेषा दिसू लागतात.  चौथ्या ते सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर उंचवट्याचा सारखे ठिपके दिसू लागतात. अळी १४ ते १९ दिवसांमध्ये पूर्ण होते.

कोष- पुर्ण वाढ झालेली अळी २ ते ८ सेंटिमीटर जमिनीत जाऊन मातीचे वेस्टन करुन त्यात कोषावस्थेत जाते. कोष लालसर तपकिरी रंगाचा असतो. कोषावस्था ९ ते १२ दिवसात पूर्ण होते. 

लष्करी अळीचा जमिनीतील कोष

पतंग 

नर पतंग राखाडी ते तपकिरी रंगाचा असून त्याच्या पुढील पंखाच्या वरच्या कडेला त्रिकोणी आकारात पांढरा ठिपका  व पंखाच्या मध्यभागी गोल ठिपका दिसून येतो. मादी पतंगाचे पुढचे पंख राखाडी रंगाचे असून ते एकाच रंगाचे असतात.  नर आणि मादी मध्ये मागील पंख सोनेरी पांढऱ्या रंगाचे असतात. पतंग अवस्था चार ते सहा दिवसांची असते.

नर पतंग.
फोटो सौजन्य- डॉ. शरणबसाप्पा देशमुख
मादी पतंग.
फोटो सौजन्य- डॉ. शरणबसाप्पा देशमुख

लष्करी आळीचा जीवनक्रम ३२ ते ४६ दिवसांमध्ये पूर्ण होतो

लष्करी अळी ओळखण्याची खुण

१.अळीच्या  डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट इंग्रजी  ‘Y’ आकाराची खूण असते.

२.अळीच्या आठव्या बॉडी सेगमेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके दिसुन येतात. त्या चार ठिपक्‍यात केस देखील आढळून येतात. अळीच्या  शरीरावर इतरत्र कुठेही अशी ठेवण दिसत नाही. 

चौकट 

लष्करी अळीचे लक्षणावरती आधारित व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.  त्याची दोन कारणं आहेत १.पिकावर वाढणारी लक्षणे अळीची वाढ दर्शवतात. २.  त्याचबरोबर अळीची वाढीची अवस्था कोणते कीटकनाशक अथवा नियंत्रणाचे उपाय योजावेत हे ठरवते

नुकसानीचा प्रकार 

रोपावस्थेतील मका पिकाच्या पानांवर सुरुवातीची लक्षणे दिसून येतात. पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या पाने खरवडून खातात त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसून येतात.  लहान रोपावर जर अशी लक्षणे दिसत असल्यास पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे असे समजावे व नियंत्रणाचे उपाय योजावेत. जेव्हा अळी तिसऱ्या अवस्थेत प्रवेश करते त्यावेळी ती पोंग्यामध्ये  प्रवेश करून पाने खाण्यास सुरुवात करते. या अवस्थेत पानावर छिद्रे दिसून येतात. अळीने पाचव्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर ती पोंग्यामध्ये राहून पाने खाते त्यामुळे पानावर मोठी छिद्रे दिसून येतात. सहाव्या अवस्थेतील अळी आधाशीपने पाने खाऊन पोंग्यामध्ये  मोठ्या प्रमाणात विष्टा टाकते या अवस्थेत मक्‍याची पाने झडल्यासारखी  दिसून येतात. तुरा आणि कणीस  भरण्याच्या अवस्थेत कणीस जर लष्करी अळीचा  प्रादुर्भाव झाला तर अशावेळी आर्थिक नुकसान होते.  अळी मक्याच्या कणसात प्रवेश करून दाण्यावर उपजीविका करते. मधु मका या किडीला जास्त प्रमाणात बळी पडतो. अळीने प्रादुर्भावित कणीस खाण्यायोग्य राहत नाही. 

शेतात किडीचे निरीक्षण कसे करावे

 शेताला रोजच्या रोज भेट देऊन पिकाचे निरीक्षण करावे. सुरुवातीच्या काळात दिसणारी लक्षणे ओळखून व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. निरीक्षण करतेवेळी शेताच्या बाहेरील बाजूच्या तीन ते चार ओळी सोडून शेतातून इंग्रजी डब्ल्यू “W” आकारात चालावे. चालताना डब्ल्यू आकारातील पहिल्या ओळीतील पाच झाडे निवडावीत अशाप्रकारे डब्ल्यू आकारातील प्रत्येक ओळीतील पाच अशी वीस झाडे निवडावीत. या वीस निरीक्षण केलेल्या झाडांपैकी किती झाडावर प्रादुर्भाव आहे याची नोंद घ्यावी .

उदा . समजा २० झाडांपैकी २ झाडे लष्करी अळीमुळे प्रादुर्भावित असतील  तर नुकसान पातळी १० टक्के आहे असे समजावे. जर पीक रोपावस्थेत अथवा मध्य वाढीच्या अवस्थेत असेल तर नियंत्रणाचे उपाय योजने गरजेचे आहे.शेताचे निरीक्षण रोपावस्थे पासून सुरू करावे व आठवड्यातून एकदा शेताचे निरीक्षण करावे

पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आर्थिक नुकसान संकेत पातळी

१. रोपावस्था ते सुरुवातीची पोंगा अवस्था  (उगवाणी नंतर दोन आठवड्यापर्यंत) :- तीन पतंग प्रति सापळा किंवा ५ टक्के प्रादुर्भावित झाडे
2. सुरुवातीची पोंगा अवस्था ते मध्य पोंगा अवस्था  (उगवणीनंतर दोन ते चार आठवडे) :- ५ ते १० टक्के प्रादुर्भावित झाडे 
3. मध्य पोंगा अवस्था ते उशिराची पोंगा अवस्था (उगवणीनंतर ४ ते ७ आठवडे):- १० ते २० टक्के प्रादुर्भावित झाडे
4. उशिराची पोंगा  अवस्था (उगवणीनंतर सात आठवड्यापुढे);-  २० % पेक्षा जास्त प्रादुर्भावित झाडे५. तुरा लागण्याची अवस्था ते पीक काढणी:-  १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कणसाचे नुकसान

लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन 

 1. पाऊस पडण्याआधी शेताची खोलवर नांगरट करून घ्यावी. खोल नांगरटीमुळे किडींची कोषावस्था प्रखर सूर्यप्रकाशाच्या तसेच कीटक खाणाऱ्या पक्ष्यांच्या संपर्कात येऊन मरून जातात. 
 2. पिकांची फेरपालट करावी. मका घेतलेल्या शेतात त्यानंतर भुईमूग अथवा सूर्यफूल पिकाची लागवड करावी.
 3. ज्या भागात मका लागवड केली जाते अशा भागात मक्‍याची लागवड एकाच वेळेस करावी. जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर मक्याची लागवड करावी. मक्याची उशीरा पेरणी टाळावी. एकाच वेळी पेरणी केल्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो व किडीला प्रत्येक वाढीच्या अवस्थेतील मका उपलब्ध होत नाही.
 4. मक्‍याची पेरणी करताना त्यामध्ये आंतरपीक घेऊन पिकांची विविधता साधावी. त्यामध्ये कडधान्य पिकांचा वापर करावा. उदा.  मका+ तूर,उडीद, मूग
 5. मक्याच्या बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी. नेपियर चा उपयोग मका पिकात लष्करी अळीसाठी सापळा पीक म्हणून होतो
 6. मका पिकाची पेरणी झाल्यानंतर लगेचच शेतात एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.
 7.  मक्याच्या पानावर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात अथवा  पानावर चिरडून टाकाव्यात. 
 8. किडीच्या सर्वेक्षणासाठी पेरणीनंतर पीक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत. लष्करी आळीचे नर पतंग एक गठ्ठा पकडण्यासाठी शेतात हेक्‍टरी १५ कामगंध सापळे लावावेत त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
 9. जेव्हा मका पिकाचा पोंगा  व्यवस्थित तयार होईल तेव्हा त्यामध्ये माती आणि राख किंवा चुना यांचे ९:१ या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात टाकावे त्यामुळे पोंग्यातील  अळ्यांवर परिणाम होतो. 
 10. मधु मका किंवा बेबी कॉर्न  मध्ये पिकाची एकाच वेळी पेरणी करणे शक्य नसल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझेडीरेक्टिन  ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सुरवातीच्या वाढीच्या काळात फवारणी घ्यावी. 
 11. किडीचा प्रादुर्भाव मका पिकावर दिसू लागताच  जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा मेटाऱ्ऱ्हाझियम अनीसोप्ली  ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
 12. किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यास खालील पैकी एका  कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी घ्यावी. कीटकनाशकांची फवारणी घेताना फवारा मक्याच्या पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी. 
अन कीटकनाशक प्रमाण/१० लिटर पाण्यासाठी 
थायोमिथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायहॉलोथ्रीन ९.५ झेड सी 
5 मिली 
स्पिनेटोरम ११. ७ एस सी४ मिली 
क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एस सी४ मिली 

लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन व्हिडिओ

How to manage FAW/ लष्करी अळीचे व्यवस्थापन कसे करावे
लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here