येत्या २१ तारखेला मी मतदान करणार नाही! – विनय हर्डीकर

सत्तेची किळसवाणी हाव, निर्लज्जपणे केलेली पक्षांतरे आणि त्या पक्षांतरांचे तितकेच बेमुर्वत, तत्वहीनसमर्थन, राजकीय प्रचाराची बटबटीत, थिल्लर आणि हीन भाषा आणि शैली, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची चर्चा करणे सोडून मतदारांच्या भावना भडकवण्याचे सत्ताधारी पक्षांचे गारुड आणि त्याला माजी सत्ताधारी पक्षांची बेजबाबदार उत्तरे, आरोप-प्रत्यारोप, सर्वच पक्षांतून गुंड गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचा आढळ या आणि इतर कारणांमुळे उद्विग्न होऊन मी मतदान न करण्याचे ठरवले आहे.

भारतीय लोकशाही परिपक्व व्हावी म्हणून मी केलेली धडपड सर्वाना माहित आहे. मतदान करणे माझे कर्तव्य आहे याची मला जाणीव आहे. तरीही मतदानावर बहिष्कार हा लोकशाही मार्ग मी स्वीकारला आहे. नोटा चा पर्याय मी ती तरतूद झाल्यापासून वापरला होता;मात्र त्यामध्ये आपण केवळ आपल्या मतदार संघातले उमेदवार नाकारतो; सध्याच्या राजकीय संस्कृती बद्दलची नाराजी त्यातून व्यक्त होत नाही.

शेतकऱ्यांमधले वैफल्य, सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या, आर्थिक व्यवस्थेची मंदावलेली गती, नैसर्गिक आपत्तीमध्ये हतबल होणारे सुस्त प्रशासन, वाढत चाललेली आर्थिक विषमता, बकाल शहरीकरण यांतल्या कशाचीही चर्चा न करता ‘सत्तेवर आल्यावर आम्ही हे प्रश्न सोडवू’ अशा उर्मट आवेशाने मतदारांना वारेमाप आश्वासने दिली जात आहेत. गरिबी संपवण्यासाठी धोरणात्मक रचना न बदलता, तुम्ही गरीब म्हणवून घ्या, सरकार तुम्हाला मदत करेल अशी स्वाभिमानाने उत्पादन कष्ट करण्याऐवजी लाचारी स्वीकारण्याची- सवय जनतेला लावली जात आहे.

यावर उपाय करायचा असेल तर या कोलाहलापासून थोडे दूर होऊन विचार करण्याची गरज आहे. माझ्याप्रमाणे अनेक नागरिक उद्विग्न आहेतच! त्यांनी आपली भूमिका ठरवावी, कल्पना सुचवाव्यात म्हणजे निवडणुकीनंतर एकत्र बसून विचारविनिमय करून Action Plan  बनवता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here