अवकाळी पाऊस उठलाय द्राक्षबागायतदारांच्या मुळांवर

मुळातच २०२० हे वर्ष शेतकऱ्यांसाठी पाऊस आणि कोरोना यामुळे विलक्षण नुकसानदायक ठरले आहे. शेतकऱ्यांनी अस्मानी सोबत सुलतानी संकटाना कायम तोंड दिले आहे. पण आता सुरु झालेल्या २०२१ या नवीन वर्षात देखील शेतकऱ्यामागील शुल्ककाष्ठ आता सुटण्याच्या मागे नाही असचं चित्र झालं आहे.

द्राक्ष पट्यातील द्राक्ष काढणीचा हंगाम ऐन भरात आला आहे पण अचानक झालेल्या वातावरण बदल यामुळे काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि तापमान कमी-जास्त होते होते. दिवसभर हलक्या सरींसह थोडा पाऊस आणि अचानक रात्री पाऊस वाढला.

वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे काढणीला आलेले आणि पूर्ण पिकलेल्या द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत. देठाच्या ठिकाणी व जवळील मनी हे खराब होतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

🟣 निर्यातक्षम द्राक्षांची नासाडी.
इंदापूर परिसरातून थायलंड, रशिया, चीन, दुबई या देशात तर देशांतर्गत बाजारपेठा दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास केरळ ई. भागात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शरद सीडलेस आणि नानासाहेब पर्पल या वाणांची द्राक्ष पाठवली जातात. अवेळी आलेल्या पावसामुळे या लांब पल्ल्याच्या मार्केटला द्राक्ष पाठवणे जिकीरीचे होते. त्यामुळे निर्यात करणारे व्यापारी बागा घेत नाहीत. निर्यातीसाठी घेतलेल्या बागा आता व्यापारी सोडून देत आहेत. त्यामुळे आता दरही खूप ढासळतील.

🟣न भरून येणारे नुकसान
द्राक्ष बागायतदार साधारण एकरी ३ ते ४ लाख रुपये खर्च करून बागा निर्यातक्षम बनवतात. आता काढणीस आलेल्या बागा आणि त्यावर झालेला खर्च देखील ही निघू शकत नाही. या नुकसानीचा भाग ३०० ते ४०० हेक्टर दरम्यान आहे.

🟣 हवामान खात्याचे अंदाज धोकादायक
बऱ्याचदा हवामान खात्याचे अंदाज चुकल्याने हे परिणाम झालेले दिसत आहेत. ढगाळ वातावरण असा अंदाज सांगितले गेल्याने शेतकरी गाफील राहिले आहेत. त्यापेक्षा “काही खाजगी कंपनीचे हवामान रिपोर्ट चांगले असल्याचे” मत, कीटकशास्रज्ञ डॉ अंकुश जालिंदर चोरमुले यांनी सांगितले.

🟣पिकविमा आणि अनास्था
मुळातच पीकविमा त्याबद्दलची अनास्था हि प्रचंड आहे. अनेक लोक परतावा मिळत नाही म्हणून तर बरेच जन माहिती नसल्याने या संकटाला सामोरे जात आहेत. विमा मिळत नसल्याच्या अनेक बातम्या शेतकरी सतत वाचत असतात त्यामुळे विमा लुटीचं माध्यम असल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे. “अनेकदा प्रांत आणि मंत्रीमहोदय यांना अर्ज देऊन काही विशेष परिणाम होत नसल्याचे” शेतकरी Agr Daulat Giri यांनी सांगितले.

🟣 शेतकऱ्यांची लुट
अवकाळीच्या या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने आणि समाजातील सर्व घटकांनी उभे राहिले पाहिजे.
काही घटक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनांची विक्रीची संधी शोधून आपापली उत्पादने( औषधे आणि खते) आवश्यक नसताना शेतकऱ्यांच्या माथी मारून विकण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसाधारण शेतकरी याला बळी पडून आशेपोटी कोणी सांगेल, कसा सांगेल तसा बेमाप खर्च करताना दिसतोय त्यात त्याचेचं प्रचंड नुकसान होत आहे…

  • गणेश नाझीरकर ( द्राक्षपिक सल्लागार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here