क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय?

राज्यात पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पुराने थैमान घातलं आहे. जिथे पाहावं तिथे पाणीच पाणी दिसत आहे. सततच्या पावसामुळे धरणं काठोकाठ भरली आहेत. काही धरणातून विसर्ग सुरु आहे. पण सगळ्यात, गेल्या काही दिवसांत अनेकदा धरणांसंबंधित वापरला गेलेले शब्द म्हणजे क्यूसेक आणि टीएमसी. अमक्या धरणातून XYZ क्यूसेकने पाणी सोडलं, तमक्या धरणाचा पाणीसाठी XYZ एवढा टीएमसी आहे, असं सांगितलं जातं. पण क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय? ‘लिटर’ ही संज्ञा दैनंदिन वापरातील असल्याने आपल्याला माहित आहे, परंतु त्याचा अर्थ काय हे जाणून घेऊया.

धरणात असलेला पाणीसाठा मोजण्यासाठी आणि त्यातून सोडण्यात येणारं पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी परिमाणं वापरली जातात. पाणीसाठा ‘टीएमसी’ आणि ‘दलघमी’मध्ये मोजला जातो. तर नदीतून वाहणार्‍या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडणार्‍या पाण्याचा वेग मोजण्यासाठी ‘क्युसेक’ आणि ‘क्युमेक’ ही परिमाणं वापरली जातात.

क्यूसेक आणि क्यूमेक म्हणजे काय?
‘क्युसेक्स’ म्हणजे ‘घनफूट प्रतिसेकंद’, तर ‘क्युमेक्स’ म्हणजे ‘घनमीटर प्रतिसेकंद’. धरणातून किंवा एखाद्या बंधार्‍यावरुन एका सेकंदाला किती घनफूट किंवा घनमीटर पाणी वाहतं आहे, हे यावरुन कळतं.

1 क्यूसेक म्हणजे अंदाजे 29 लिटर पाणी (28.3 लिटर). तर 1 क्यूमेक म्हणजे अंदाजे 1000 लिटर पाणी. सांगली जिल्ह्यातील पूर ओसरण्यासाठी आलमट्टी धरणातून पाच लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला केली होती. आता आलमट्टी धरणातून साडेचार लाख क्यूसेक पाणी सोडलं जातंय असं आपण म्हणतो तेव्हा एका सेकंदाला 1 कोटी 27 लाख 35 हजार लिटर पाणी सोडलं जात असतं.

टीमसी म्हणजे किती?
धरणातील पाणीसाठा हा टीएमसीत सांगितला जातो. 1 टीमसी म्हणजे One Thousand Million Cubic Feet म्हणजेच 100 कोटी घनफूट पाणी, तर ‘दलघमी’ म्हणजे दहा लाख घनमीटर पाणी. 1 टीएमसीमध्ये 28 अब्ज (2800 कोटी) लिटर पाण्याचा समावेश असतो. उदाहरणार्थ कोल्हापुरातील राधानगरी धरणाची क्षमता 8 टीएमसी आहे. म्हणजे त्यात 22 हजार 400 कोटी लिटर पाणी मावतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here