कोरोनाचा बळी, “बळी”राजा

२२ मार्च, पुर्ण भारतात जनता कर्फ्यू लागू होता. शहरातील सुनसान रसत्यांचे दृष्ये व कोरोना बाबत तीच ती माहिती पाहुन कंटाळा आला. शहरां मधील लॉक डाउन दिसत होता मात्र ग्रामिण भारताचे चित्र काही दिसत नव्हते. ३१ मार्च पर्यंत दुरावा सहन करण्याची मानसिकता सर्वंचीच होती. आता आणखी २१ दिवस घरात बसण्याचे सक्त आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. २१ दिवसां नंतरही संचारबंदी आणखी काही काळ सुरुच राहण्याची शक्यता जास्त आहे. शहरातील रहिवासी दुकाने, कार्यालये बंद करुन घरात बसतील पण शेतकर्यांचे काय?

आता अनिशचित काळा पर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. शेतकर्याला लॉक डाउन शक्य नाही व कर्फ्यू तर नाहीच नाही. शेतातल्या गोठ्यात जनावरे असतात त्याना चारा पाणी करावेच लागते. शेतातील पिकांना पाणी द्यावेच लागते. तोडणीला आलेला माल तोडावाच लागतो. शेतीत काहीच थांबत नाही, थांबवता येत नाही. कष्ट थांबत नाहीत, खर्चही थांबत नाहीत, काहिही असो.
कोरोनामुळे शहरी भागातील व्यव्हार ठप्प झालेत, कारखानदारी उत्पादन थांबले आहे. आर्थिक नुकसान सर्वांचेच होत आहे यात वादच नाही. पण आज बंद झालेली दुकाने उद्या उघडतील, कारखानदारीचा माल नंतर खपेल, कार्यालये चालू होतील. काही काळात सर्व सुरळीत होइल पण शेतकर्यांचे झालेले नुकसान भरुन येणार नाही.
शेतीला जोड धंदा म्हणुन, लाखो रुपये कर्ज काढुन उभा केलेला कुक्कुटपालनाचा व्यवसाय बरबाद झाला. कोंबड्या फुकट वाटल्या, जंगलात सोडल्या, खड्डे खोदुन गाडुन टाकल्या. पोल्ट्रीसाठी होणारी मागणी घटल्यामुळे मकेचे भाव कोसळले. टमाटे, कोबी, फ्लावर सारख्या भाजीपाल्याच्या पिकात जनावरे चरायला सोडवी लागली. द्राक्ष बागायतदारांना रडू लागायला माणुस नाही. अतिवृष्टीत सुरुवातिच्या बागा गेल्या. नंतर चांगला माल लागला, सोैदे झाले पण कोरोनामुळे व्यापारी माल उचलत नाहीत. कमी दराने मागतात. उन तापायला लागले की माल खराब होतो, गळुन जातो. लाखो रुपये बुडणार, कर्ज कसे फेडायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे आहे.
कोराना रोकण्यासाठी उपयुक्त म्हणुन संत्र्याला मागणी आहे पण लॉक डाउनमुळे वाहतुकीसाठी गाड्या मिळत नाहीत. अनेक दिवस झाले माल तोडुन खोकी भरुन ठेवली आहेत, किती दिवस माल टिकणार?
शेतकरी संघटनेने पाठपुरावा केल्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी उठली, निर्यातशुल्क शुन्य झाले. आता कांद्याचे पैसे होतील ही अपेक्षा कांदा उत्पादकांना होती मात्र त्या कोरोना आडवा आला. खरिपात येणारा लाल कांदा साठवुन ठेवता येत नाही, लगेच विकावा लागतो पण सर्वच व्यव्हार बंद झाल्यामुळे पुन्हा मातीमोल भावाने विकावा लागत आहे किंवा डोळ्यादेखत सडताना पहावा लागणार आहे.
खरिपाची पिके अतिवृष्टीत गेली होती, रब्बीत चांगले पिक आले. गहू, हरभरे घरात आले पण मार्केट बंद असल्यामुळे रोज खर्चासाठी धान्य विकुन पैसे मिळवणे सुद्धा दुरापस्त झाले आहे. गावातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे छोट्या शेतकर्यांनी पिकविलेला भाजिपाला सुद्धा विकला जात नाही. बराच खर्च करुन कलिंगडाचे पिक तयार केले पण आता फेकुन देण्याची वेळ आल्यामुळे रडणार्या शेतकर्याचा व्हिडीअो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे, लग्न सभा समारंभ बंद असल्यामुळे सर्व प्रकारच्या फुलांच्या बागा कोमेजल्या आहेत. कर्फ्यूमुळे आता दुधही विकणे अवघड होइल. देशातील शेतकर्याच्या प्रत्येक पिकाची हिच आवस्था आहे, सर्व इथे सांगणे शक्य नाही, वाचकांनी समजुन घ्यावे.
राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यात व्यव्हार थंडवणार आहेत म्हणजे मोठी आर्थिक उलाढाल बंद होणार आहे. दरवर्षी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सरासरी दोन लाख पन्नास हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. इतकी मोठी उलाढाल थांबली म्हणजे त्यावर अवलंबुन असणारा रोजगार बुडणार. शेतकरी मार्केट सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असणार व जेव्हा केव्हा बाजार समित्या सुरु होतील तेव्हा शेतकरी प्रपंच चालवण्यासाठी व खरिप पिकांचे बियाणे व खते खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीस आणील. मागणी पेक्षा आवक झाल्यामुळे पुन्हा भाव कोसळतील व तोटा बळीराजाच्याच माथी येणार.
अशा परिस्थितीतही विजबिल थकले म्हणुन शेतीपंपाचा विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम विज वितरण कंपनी जोमाने राबवत आहे. कर्जमाफीच्या याद्या जाहिर झाल्या पण खात्यावर पैसे आले नाहीत म्हणुन नविन कर्ज नाही. मध्यम मुदत व दीर्घ मुदतीचे कर्ज शेतकर्याला भरावेच लागणार आहे. सर्वच पिकांचे पैसे होणार नसतील तर शेतकरी हे कर्ज कसे फेडणार? जर कधी शेतीमालाला चांगले भाव मिळायला लागले तर सरकार निर्यातबंदी करुन किंवा आयाती करुन शेतीमालाचे भाव पाडणार, मग शेतकर्यांनी कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, कार्यालयात न येणार्यांना पगारी रजा देण्याच्या सुचना दिल्या, ज्यांचे छोटे व्यवसाय आहेत त्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहिर केले. त्यांना मदत मिळालीच पाहिजे यात वाद नाही. पण शहरात सर्व काम बंद असताना शेतात काम करत असणार्या शेतकर्याचा विचार करायला नको का? शेतात तयार झेलेला माल फेकुन द्यावा लागत आहे त्याची काही नुकसान भरपाई द्यायला नको का? पण तोटे सर्व शेतकर्यांनी सहन करायचे व नफा मिळविण्याची संधी आली की सरकारने आडवे यायचे हा आपल्या देशातील शिरस्ता राहिला आहे.
कोरोना हे फक्त शेतकर्यांवरील संकट नसुन देशावरील संकट आहे. याला सर्वांनी खंबीरपणे तोंड देणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी यांचे आभार मानण्यासाठी टाळ्या थाळ्या वाजवण्यात आल्या पण शेतात राबुन शहरांपर्यंत दुध भाजिपाला, धान्य पोहोचवणार्या बळीराजाचे आभार मानण्याची गरज कोणाला वाटली नाही. अशा परिस्थितीत किमान विज वितरण कंपनी व बॅंकांकडुन सूरु असलेली अत्याचारी वसुली थांबावी ही किमान अपेक्षा बळीराजाची आहे.
बळीराजा हा नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाचा बळी ठरला आहे. आता कोरोना व्हायरसचा बळी ठरतो आहे. नैसर्गिक आपत्ती येतच राहणार आहेत. आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले आहे. येत्या काही दिवसात, राज्याच्या काही भागात गारपीट हिण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशाच्या वित्तमंत्री निरमला सितारामन यांनी अौद्योगिक क्षेत्राला भरीव मदत करण्याची घोषणा केली आहे मात्र शेतीला काही मदत जाहीर करण्याची गरज त्यांना वाटली नाही. प्रत्येक वेळेला सरकार मदत करेल ही अपेक्षा ठेवणे ही योग्य नाही पण अशा परिस्थितीत तग धरुन राहण्या इतकी बचत शेतकर्यांकडे शिल्लक रहावी अशी व्यवस्था आपल्या देशात नाही. सरकारच्या या शेती विषयक धोरणात अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. मागील पिकां मधुन शेतकर्याकडे बचत शिल्लक राहिली असती तर दर पडत असताना शेतमाल बाजारत घेउन जाण्याची गरज पडली नसती. ग्राहकहितासाठी शेतीमालाचे भाव नियंत्रित करण्याच्या सरकारच्या धोरणाचे गंभीर परिणाम शेतकरी भोगत आहे. त्याच्याकडे बचत शिल्लक राहण्यासाठी त्याला सहानुभुतीची, सहवेदनेची गरज नाही, स्वातंत्र्याची गरज आहे. शेतकर्याला अन्नदाता करू नका उद्योजक होऊ द्या , शेतीला व्यवसाय समजा तरच बळीराजा आरिष्ठांचा बळी ठरणार नाही.

२५/३/२०२०

अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here