2019-20 साठी सर्व रब्बी पिकांसाठीच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 2020-21 या रब्बी विपणन हंगामात ही पिकं बाजारात येणार आहेत.
2020-21 या रब्बी विपणन हंगामासाठीच्या रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत केलेली वाढ ही देशपातळीवर सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट किमान आधारभूत किंमत ठेवावी या 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तत्वाला अनुसरून आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.
2020-21 या रब्बी विपणन हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीत मसुरासाठी सर्वात जास्त वाढ म्हणजे 325 रुपये प्रती क्विंटल, करडई 270 रुपये प्रति क्विंटल, चणा 255 रुपये प्रति क्विंटलची शिफारस करण्यात आली आहे. मोहरीच्या एमएसपीत 225 रुपये प्रति क्विंटल वाढ तर गहू आणि जवाच्या एमएसपीत 85 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.