मक्याचा चारा खाऊन जनावरे दगावण्याची कारणे

3,437 views

मका चारा खाल्ल्याने मागील काहि दिवसात गाईंमध्ये विषबाधा किंवा मरतुक झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले परंतु त्याचे सर्वच ठिकाणी योग्य निदान होऊन कारण सापडले नाही. त्यात ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आणि अनेक जण शास्त्रीय किंवा अशास्त्रीय तर्क वितर्क लावून विविध मेसेज फॉरवर्ड करू लागले आहेत. तरी मका चारा खाल्ल्याने नेमके जनावरे का मेले असतील त्याचे काही शास्त्रीय कारणे खालील प्रमाणे असू शकतील.

  1. कोवळा मका खाऊ घालणे – दुष्काळामुळे गेले अनेक महिने जनावरांना हिरवा पौष्टिक चारा मिळू शकलेला नाही व जिथे फक्त वाळलेल्या चाऱ्यावर जनावरे जगविले जात होते तिथे अचानक हिरवा कोवळा चारा दिल्याने पोटफुगी व असिडोसिस किंवा शेळ्या मेंढ्यातील आंत्रविषार सारखा गाई मधील आंत्रविषार रोग झाल्याने जनावरे दगावली असू शकतात.
  2. नायट्रेट किंवा नायट्राईट विषबाधा – मका पिकाला जास्त करून फक्त युरिया हे एकच खत वापरले जाते. युरिया खत दिल्यावर पिकास योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर नायट्रेट किंवा नायट्राईट साठविले जाऊन त्याची विषबाधा होऊ शकते.
  3. कीटकनाशकांची विषबाधा – लष्करी अळी ने लागण झालेल्या मका पिकावर शिफारस असलेले आणि नसलेले अनेक कीटकनाशकांची प्रमाणात किंवा अधिक प्रमाणात फवारणी एकदा किंवा काही ठिकाणी तीन तीन वेळा केल्या गेल्या. त्यामुळे ह्या कीटकनाशकाचे अंश किती दिवस पिकात आहेत हे लक्षात न घेता तो मका चाऱ्यासाठी वापरल्याने काही ठिकाणी त्यांची विषबाधा झाली असू शकते.
  4. लष्करी अळी – लष्करी अळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असलेला मका खाऊ घातल्यास एकाच वेळेस मोठ्या प्रमाणावर अळ्या जनावरांच्या पोटात गेल्यास रवंथ प्रक्रियेत बिघाड होऊन जनावर फुगण्या सारखे किंवा बुळकांडण्याचे प्रकार होऊ शकतात.

परंतु डॉ ज्ञानेश्वर वाकचौरे साहेबांनी सांगितलेल्या प्रमाणे अळ्या मधील जिवाणू मुळे जनावरे दगावणे शक्य नाही कारण त्यांनी नमूद केलेले जिवाणू जनावरांना आजारी करतील त्यांना ताप येईल व इतर लक्षणे दाखवून कमीत कमी आठवडा भर आजारी राहून उपचार न मिळाल्यास मरतील. अचानक मरणे शक्य नाही.

  • डॉ सचिन रहाणे, पशुधन विकास अधिकारी, सांगली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here