बीबीएफ तंत्रज्ञान व त्याचे फायदे

कृषी विभागामार्फत मौजे अंजनसोंडा गावात जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले.यावेळी बियाणे उगवणक्षमता तपासणी,बीजप्रक्रिया, निंबोळी अर्क तयार करणे,फवारणी करतानाची काळजी,रुंद वरंबा सरी(बीबीएफ) तंत्रज्ञान इ बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.दरम्यान आमच्यासाठी नवीन असलेल्या या तंत्रज्ञानाबद्दल बीबीएफ यंत्र जोडणी,पेरणी करताना घ्यायची काळजी व बीबीएफ चे फायदे याबाबत प्रत्यक्षिकसह माहिती दिली. याच वेळी पारंपरिक पध्दतीत बदल करू अशाप्रकारे नवीन तंत्रज्ञान अवलंब करण्याचा निर्णय घेतला.

पूर्वमशागत

खरिप 2020 ची पेरणीपूर्व शेताची मशागत करण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 मार्च दरम्यान नांगरणी केली. मे च्या पहिल्या आठवड्यात पहिली व शेवटच्या आठवड्यात दुसरी मोगडनी केली आणि जून च्या पहिल्या आठवड्यात ट्रॅक्टरने शेतास पाळी घातली.

पेरणीपूर्व तयारी.

पेरणीसाठी ग्रीनगोल्ड कंपनीचे 3344 वाण निवडले होते.त्याची उगवणक्षमता तपासणी केली. बियाण्यास स्प्रिंट या रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली व पेरणीपूर्वी रायझोबियमची जैविक बीजप्रक्रिया केली.

पेरणी

बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी करण्याची इच्छा होती पण बीबीएफ यंत्र उपलब्ध नव्हते. पेरणीच्या दिवशी कृषी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे असलेल्या 5 फनी पेरणी यंत्राचे मधले फन बंद ठेवून नेहमीप्रमाणे पेरणी केली. या पद्धतीमुळे एकरी 20 किलो याप्रमाणे बियाणे लागले. एकूण 6 एकर सोयाबीन पेरणीवेळी 4 पोते सिंगल सुपर फॉस्फेट, 1 पोते युरिया , 1 पोते निंबोळी खत, 20 किलो झिंक, 30 किलो सल्फर हे खत वापरले. पेरणी नंतर स्ट्रॉंगआर्म हे उगवणीपूर्व तणनाशक फवारणी केली.

फवारणी

निंबोळी अर्क व 19:19:19 ची पहिली फवारणी 15 दिवसानंतर घेतली.पुढील 15 दिवसांनी सुक्ष्म अन्नद्रव्य व क्लोरोपायरीफॉस ची दुसरी फवारणी घेतली.शेवटची फवारणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत 0:52:34 + स्प्रिंट+इमामेकटीन ची फवारणी केली.

रुंद वरंबा सरी

पेरणी वेळी मधला फन बंद राहिल्याने सोयाबीन उगवण झाल्यानंतर बरोबर 4 ओळी नंतर
एक ओळ रिकामी राहिली.त्या रिकाम्या सरी मध्ये कोळपणी वेळी सरी काढली.या पद्धतीमुळे बरोबर सोयाबीनच्या चार ओळी वारंब्यावर आल्या व बाजूला सरी तयार झाली व रुंद वरंबा सरी पद्धत म्हणजे बीबीएफ तयार झाले.सुरुवातीला मोकळी सरी राहिल्याने उत्पादन कमी येते की काय अस वाटत होतं परंतु हवा खेळती राहिल्याने पिकाची जोमदार वाढ झाली.मोकळी सरी दिसतच नव्हती कारण शेंगा भरण्याच्या अवस्थेत सरी पूर्ण झाकून गेली.या हंगामात खूप पाऊस झाला.परंतु या पद्धतीमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा झाला व सोयाबीन पीक बचावले. तसेच फवारणी वेळी सुद्धा सोयीस्कर झाले. अतिरिक्त पाणी, किडरोग पासून बचाव झाल्याने उत्पादनात यापूर्वी पेक्षा वाढ झाली.पूर्वी अशाचप्रकारे पेरणी करून एकरी 8-10 क्विंटल उत्पादन यायचे परंतु या बीबीएफ पद्धतीमुळे अतिपावसात पीक तर वाचलेच परंतु एकरी जवळपास 12 क्विंटल उत्पादन आले.

+91 99224 15333
श्री दयानंद महादेव पाटील
शिक्षण-LLM
मौजे अंजनसोंडा, ता. भूम जि उस्मानाबाद

काय आहे बीबीएफ तंत्रज्ञान
बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी केल्यास वारंब्यावर टोकन पद्धतीने पेरणी होते व बाजूला सरी पडते. प्रचलित पेरणी यंत्रात बदल करून सुद्धा अशाप्रकारे रुंद वरंबा सरी करता येते. तसेच पट्टा पद्धतीने अथवा 4-5 ओळी नंतर एक सरी काढता येऊ शकते.

बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे:
१.बीबीएफ पेरणी यंत्राच्या साहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण होते.
२.बीबीएफ मुळे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न मिळते.
३. पावसात खंड पडल्यास अथवा पाणी कमी असल्यास या पद्धतीमुळे वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जातो.पिकाला पाण्याचा ताण पडत नाही.
४.पाऊस जास्त झाल्यास या पद्धतीमधील सरी मधून अतिरिक्त पाणी बाहेर पडते.
५.मुबलक हवा,सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. किडरोग प्रमाण कमी होते.
६. सोयाबीन पेरणीसाठी 20-25% बियाणे कमी लागते, पाण्याची बचत होते, उत्पन्नामध्ये 25-30% हमखास वाढ होते.
७.पिकाची आंतरमशागत करणे,पीक मोठे झाल्यावर सरी मधून औषध फवारणी करणे,आवश्यकता भासल्यास स्प्रिंकलर द्वारे संरक्षित पाणी देण्यासाठी ही पेरणी पद्धत फायदेशीर ठरते
8.परभणी विद्यापीठाने नव्याने विकसित केलेल्या बीबीएफ यंत्राद्वारे टोकन पद्धतीने पेरणी,खत देणे,रासनी करणे व तणनाशक फवारणी करणे ही कामे एकच वेळी होत असल्याने उत्पादन खर्चात मोठी बचत होते

बीबीएफ पद्धत यापूर्वीच विकसित झालेली आहे. फायद्याचे तंत्रज्ञान असूनही मोठ्या प्रमाणावर शेतकरी अवलंब करताना दिसत नव्हते यामुळे याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या.सुरुवातीला बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रसार करताना बीबीएफ यंत्र उपलब्धता,तंत्रज्ञानाबद्दल असलेला गैरसमज,बीबीएफ बाबतची अपुरी तांत्रिक माहिती इ अडचणी जाणवल्या.ज्यांच्याकडे बीबीएफ यंत्र होते त्यांनी त्याचे सरीचे फाळ काढून ठेवले होते. अशा शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक द्वारे यंत्र जोडणी,पेरणी व फायदे याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले व त्या बीबीएफ यंत्राने थोड्या क्षेत्रावर का असेना पेरणी करण्याचे आवाहन केले.

या तंत्रज्ञानाबदल शेतकऱ्यांना सोप्प्या भाषेत समजावे यासाठी व्हिडीओ, फोटो,इ माध्यमातून जनजागृती करण्यास पुढाकार घेतल्यावर शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.ज्यांच्याकडे बीबीएफ यंत्र उपलब्ध नव्हते त्यांना पण वेगवेगळ्या पद्धतीने रुंद वरंबा सरी पद्धत कशाप्रकारे करता येईल याबाबत सांगितले.पहिलेच वर्ष असल्याने कमी क्षेत्रावर पेरणी झाली,परंतु आता प्रत्यक्ष अनुभव व इतर शेतकऱ्यांना झालेलं फायदे बघून या बीबीएफ तंत्रज्ञान बद्दल शेतकरी सकारात्मक झालेत ही समाधानाची बाब आहे.या पद्धतीने पेरणी केलेल्या पद्धतीचे वेगवेगळ्या पीक अवस्थेतील फोटो,व्हिडिओ,शेतकरी मनोगत या द्वारे इतर शेतकऱ्यांना जागृती केल्याने येत्या काळात नक्कीच जास्तीतजास्त पेरणी या पद्धतीने होईल व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल.

श्री निखिल रायकर
मंडळ कृषी अधिकारी,ईट
ता. भूम जि. उस्मानाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here