हजारो कोटींचा टर्नओव्हर असणारी शेतकऱ्यांच्या मालकीची “डीकोऑप”- एक प्रेरणादायक यशोगाथा

स्पेन मधील “डीकोऑप” #Dcoop जगातील सर्वात मोठी “ऑलिव्ह तेल” उत्पादक सहकारी कंपनी आहे. मोठी म्हणजे किती? तर तब्बल ७५ हजार ऑलिव उत्पादक शेतकरी आणि ४ लाख हेक्टर क्षेत्र या कंपनीच्या अधिपत्याखाली येते. खरे तर ही संस्था, जवळपास १८० लहानमोठ्या सहकारी कृषिउत्पादक कम्पन्यांचा एक समूह आहे.

एंटोनियो ल्युक हे सध्या या कंपनीचे कामकाज पाहतात. १९५२ साली स्पेन मधील ऑलिव उत्पादक शेतकरी कुटुम्बात जन्मलेल्या एंटोनियो यांनी १९८० मध्ये कोरडोबा विद्यापिठातून ‘कृषिअभियांत्रिकीय शाखेतून” पदवी संपादन केली. तेथून पुढे त्यानी “कृषिउत्पादक संघ मलगा” या सहकारी संस्थेचे प्रेसिडेंट म्हणून काम पाहिले. स्पेन मधील जवळपास १९० कृषि सहकारी संस्थाना एकत्र आणुन “डीकोऑप”चे विशाल साम्राज्य उभे राहिले आहे. ऑलिव तेलाच्या बाबत आज जगातील सर्वात मोठी उत्पादक कम्पनी म्हणून त्यानी ओळख मिळवली आहे. एकट्या “डीकोऑप”चे ऑलिव तेलाचे प्रोडक्शन हे जवळपास ७० हजार टन प्रति वर्ष आहे. याबरोबरच ते वाईन, मांस उत्पादनातही काम करतात.

“डीकोऑप” चे वैशिष्ट्य हे आहे की या कंपनीचे भागधारक शेतकरी हे विविध “फॅमिलीज” च्या माध्यमातून काम करतात. म्हणजे थोडक्यात घराणी. त्यांच्या ऑलीव शेतीला आणि वाईन बनविण्याच्या पद्धतीला जवळपास २००० वर्षांचा इतिहास आहे. आणि प्रत्येक “फॅमिली” आपल्या वारशाचा अभिमान बाळगतात. उदा. डॉ. मोरा हे ऑलीव उत्पादक “दी मोरा गुईजोसा फॅमिली” मधून येतात. तर वाईन निर्मितीचा वारसा असणाऱ्या “दी इस्ला रोजो फॅमिली” चे दिएगो रोजो हे वाईन निर्मितीचे काम पाहतात. थोडक्यात ही सर्व कुटुंबे आप आपल्या पारंपारिक कौशल्याचा वापर करत दर्जेदार उत्पादन घेतात आणि “डीकोऑप”च्या मदतीने जागतिक बाजारपेठ मिळवितात.

“डीकोऑप”ने २०१४ मध्ये “कारगिल” च्या मालकीचे “मर्काओलीवो” या ब्रांडमधील ५० टक्के समभाग विकत घेतले. २०१८ मध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या ऑलीव ब्रांड “बेल कार्टर” मध्ये ५० टक्के समभाग विकत घेतले. “पोर्तुगीज” च्या “मकारियो” या ब्रांड मध्येही ५ टक्के हिस्सा संपादित केला. थोडक्यात “डीकोऑप”चा आर्थिक आवाका यातून लक्षात येईल. आणि ही क्षमता विकसित होण्यामागे, शेतकऱ्यांचे संघटित होणे हे मुख्य कारण आहे.

“टूर दे फार्म” – “डीकोऑप”त्यांच्या फार्म वर “कृषीपर्यटन” देखील घडविते. पर्यटकाना ऑलीव च्या बागा, तेलाचे घाणे पाहता येतात आणि तेथून मालही विकत घेता येतो.

शेतीतून संपत्तीनिर्मिती करायची असेल तर प्रत्येक पिकाची कृषीमूल्य साखळी विकसित कशी करावी हे “डीकोऑप” आपल्याला सांगते. त्यातून पुढे ब्रँडिंग, मार्केटिंग च्या माध्यमातून मूल्यवर्धन करण्याचा ते फॉर्म्युलाच सांगतात.

आज महाराष्ट्रातील हजारो युवा, कृषी पदवीधर, अभियंते कृषीउद्यम क्षेत्राकडे करीयर ऑप्शन म्हणून पहात आहेत. ही स्टोरी खरे तर त्यांच्यासाठीच आहे.

आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील “सह्याद्री फार्म” “गोदा फार्म” ची वाटचाल देखील अशीच प्रेरक आहे.

अशा शेकडोने कंपन्या उभ्या राहतील तर “शेतीवरील निराशेचे मळभ दूर व्हायला वेळ लागणार नाही”.

डॉ. नरेश शेजवळ
सीईओ, ऍग्रीवाला
७७७४०८७०४५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here