सोयाबीनची चाल पाच हजारांकडे

17,532 views

देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड (सीबॉट) वर उच्चांकी दर, खाद्यतेलाला असलेली मागणी आणि चीनची आक्रमक खरेदी यामुळे सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. चीनने ऑक्टोबरमध्ये ८.७ दशलक्ष टन सोयाबीन आयात केली आहे. जी भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्क्यांहूनही अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दर आणखी ३०० रुपयांनी वाढतील, तर पुढील दोन ते तीन महिन्यांत सोयाबीन ४९०० रुपयांचा पल्ला गाठेल, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी वर्तविला आहे.

देशात यंदा खासगी व्यापारी आणि मिलधारकांनी गृहीत धरलेल्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यातच पावसामुळे दर्जा घसरल्याने गुणवत्तेच्या सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. विदर्भातील वाशीम बाजार समितीत शनिवारी (ता.७) चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला राज्यातील आणि हंगामातील विक्रमी ४६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मध्य प्रदेशातही ४२०० ते ४३०० रुपयांदरम्यान मध्यम दर्जाच्या सोयाबीनला मिळत आहे. तर अशा अनेक बाजार समित्यांमध्ये त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन तेजीत आहे.

खाद्यतेल दरात वाढ झाल्यानेही सोयाबीनला लाभ मिळत आहे. तसेच पोल्ट्री उद्योग सध्या पूर्वपदावर येत असून, सोयामिलचीही मागणी वाढली आहे. इंडोनेशियाने बायोडिझेलसाठी पामतेल राखून ठेवल्यानेही सोयातेलाला मागणी आहे. त्यातच चीनची आक्रमक खरेदी सुरू आहे. चीनच्या सोयाबीन आयातीचा विचार करता केवळ ऑक्टोबरमध्ये ८.७ दशलक्ष टन सोयाबीनची चीनने आयात केली आहे. ही आयात भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्क्यांहूनही अधिक आहे.   

शेतीमाल बाजार विश्‍लेषक दिनेश सोमाणी म्हणाले, की दरवर्षी दिवाळीपर्यंत बाजारात साधारणपणे १० ते १२ लाख बॅग प्रति दिवस सोयाबीनची आवक असते. जी सध्या केवळ सात ते आठ लाख बॅग आहे. दिवाळीपूर्वीच शेतकरी गरजेप्रमाणे सोयाबीन विक्री करत असतात. मात्र दिवाळीनंतर निकड भागल्याने शेतकरी सायोबीन होल्डवर ठेवतात.

त्यामुळे दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन होल्डवर ठेवल्यास बाजारात आवक आणखी कमी होईल. त्यातच शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर (सीबॉट) सोयाबीन मागील काही वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहे. ‘सीबॉट’वर १०४० सेंट प्रति बूशेलच्या जवळपास असणारे सोयाबीन आता ११०० सेंटच्या पुढे आहे. तसेच अंदाजापेक्षाही खूपच कमी उत्पादन असल्याने सोयाबीन तेजीत आहे. 

वायद्यांमध्ये तेजी
वायदे बाजारातही सोयाबीन दरात तेजी दिसून येत आहे. ‘एनसीडीईएक्स’वर शुक्रवारी (ता. ६) सोयाबीनचे डिसेंबरचे करार ४३७७ रुपये प्रतिक्विंटलने झाले. त्याआधी गुरुवारी (ता. ५) हे करार ४३५५ रुपयांनी झाले. रिफाइंड सोयातेलाचे नोव्हेंबरचे करार ९९६.२ रुपये प्रति दहा लिटरने झाले. 

‘सीबॉट’वर विक्रमी वाढ
सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार असलेल्या शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवरही (सीबॉट) सोयाबीनचे दर हे विक्रमी पातळीवर आहेत. ‘सीबॉट’वर गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन १०४० सेंट प्रति बूशेलच्या (बूशेल  = २७.२१ किलो) जवळपास होते. मात्र गुरुवारी (ता. ५) दराने ११०० सेंटचा टप्पा पार केला. शुक्रवारी सोयाबीनचे जानेवारी २०२१ चे करार हे विक्रमी ११०९ सेंट प्रति बूशेल दराने झाले. सोयातेलाचे डिसेंबर २०२० चे करार हे ३५.७३ सेंट प्रति पौंड दराने आणि सोयामिलचे डिसेंबर २०२० चे करार ३९० डॉलर प्रतिटनाने झाले.

अमेरिकन सोयाबीन स्वस्त का?
अमेरिकेत जनुकीय सुधारित (जीएम) सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तर भारतात देशी किंवा संकरित वाणांची लागवड केली जाते. भारतीय सोयाबीनपासून बनविलेल्या सोयामीलला युरोपातील काही देशांसह अगदी इराणचीही मागणी असते. तसेच या सोयामिलला टनामागे ३० ते ४० डॉलर अधिक दर मिळतो. त्यामुळे भारतीय सोयाबीन हे अमेरिकेच्या किंवा जनुकीय सुधारित सोयाबीनपेक्षा जास्त दर मिळतो.

सोयाबीनमधील तेजीची कारणे

  • बाजारात सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीच आवक 
  • दिवाळीनंतर शेतकरी माल होल्ड करत असल्याचा अनुभव
  • चीनची आक्रमक खरेदी सुरूच
  • इतर देशांचाही शेतीमालाचा साठा करण्याकडे कल
  • वायदे बाजारातही कराराचे दर वाढले 
  • ‘सीबॉट’वर सोयाबीन अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनातील अनिश्‍चितता
  • देशात सोयाबीन पेंडच्या दरातील तेजी    

प्रतिक्रिया
सोयाबीनच्या किमतीला चीनच्या वाढत्या आयतीचा आधार मिळत आहे. तसाच युक्रेनमधील सूर्यफूल तेल देखील विक्रमी १००० डॉलर प्रति टन वर गेल्यामुळे एकंदर तेलबिया आणि खाद्य तेल बाजार तेजीत आहे. भारतात मोहरीमधील विक्रमी भाववाढ आणि पुरवठ्यात होणारी घट पाहता यापुढील काळात सोयाबीनला मागणी वाढेल, असे दिसते.
– श्रीकांत कुवळेकर, शेतमाल बाजार विश्‍लेषक

उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारातील आवक सध्या केवळ सात ते आठ लाख बॅग आहे, जी साधारण १० ते १२ लाख बॅग असते. तसेच ‘सीबॉट’वर दराची उच्चांकी पातळी असल्याने सोयाबीन तेजीत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता पुढील दोन महिन्यांत सोयाबीन ४९०० रुपयांचा टप्पा गाठू शकते.
– दिनेश सोमाणी, शेतमाल बाजार विश्‍लेषक   

मध्य प्रदेशासह विदर्भातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारातील आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे. तसेच ब्राझील, अर्जेंटिना विपरीत वातावरणाचा पेरणीवर परिणाम झाला असून, पिकालाही फटका शक्य असून, अमेरिकेतही मालाचा साठा कमी झाला आहे. तसेच मलेशियानेही पामतेल बायोडिझेलसाठी राखून ठेवल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. वाशीम बाजार समितीत मध्यम दर्जाचा जास्त माल येत आहे. या मालाला सध्या ३५०० ते ४२०० रुपये दर मिळत आहे. बियाणे दर्जाच्या मालाला ४२०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. 
– आनंद चरखा, संचालक, बालाजी कृषी बाजार, वाशीम

मध्य प्रदेशात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक खूपच कमी आहे. सध्या सोयाबीन ४२०० ते ४३०० रुपयांनी विक्री होत आहे. सोयाबीन पेंडचे दर हे ३२ हजार ते ३३ हजार ५०० रुपयांदरम्यान आहे. इराणमध्ये अडीच हजार टन सोयाबीन पेंड निर्यात झाल्याने दर वाढले आहेत. देशांतर्गत सोयाबीनला मागणी भक्कम आहे. 
– प्रमोद बंसल, व्यापारी, मध्य प्रदेश  

स्त्रोत-अॅग्रोवन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here