साखर आयुक्तांकडून १३ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा

राज्यातील शेतकऱ्यांची थकीत एफआरपी सव्वादोन हजार कोटींच्या पुढे गेल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड मिशन मोड वर गेले आहेत. आयुक्तांनी १३ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा काढल्या असून १५ कारखाने कारवाईच्या प्रक्रियेत आहेत.

साखर कारखान्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना १६ हजार २७५ कोटी रुपये एफआरपीपोटी (रास्त व किफायतशीर दर) रुपये देणे अपेक्षित होते. मात्र अदा केलेली रक्कम १३ हजार २७५ कोटी रुपये आहे. म्हणजेच २ हजार ३६७ कोटी रुपये मुदतीत दिलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहिल्या टप्प्यात ५५६ कोटींची थकीत एफआरपी असलेल्या १३ कारखान्यांना आयुक्तांनी कारवाईचा झटका दिला आहे. त्यात सहकारी व खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील कारखान्यांचा समावेश असून, सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे.

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समुहाच्या कारखान्यांना यंदा पुन्हा कारवाईला सामोरे जावे लागले आहे. ऊस नियंत्रण आदेश १९५६ मधील तिसऱ्या कलामातील आठव्या पोटकलमाचा आधार घेत आरआरसीचा दुसरा टप्पादेखील आयुक्तालयाने सूरु केला आहे. त्यामुळे आणखी १०-१५ कारखान्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आरआरसी जारी होताच संबंधित जिल्हाधिकाऱ्याने कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांची देणी देणे अपेक्षित आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

आरआरसी कारवाईचा पहिला टप्पा

कारखाना आणि थकबाकी

विठ्ठल ससाका (सोलापूर)- ३९.७६ कोटी

गोकूळ माऊली शुगर्स (सोलापूर) २१.०६ कोटी

सिद्धनाथ शुगर्स (सोलापूर) ७२.९६ कोटी

कंचेश्वर शुगर्स (उस्मानाबाद) ४५.२९ कोटी

विठ्ठल रिफाइंड (सोलापूर) ६०.६१कोटी

जयहिंद शुगर्स (सोलापूर) ६१.८१ कोटी

लोकमंगल अॅग्रो (सोलापूर) ३१.३९ कोटी

लोकमंगल शुगर इथेनॉल (भंडारकवठे, सोलापूर) – ७७.६८ कोटी

लोकमंगल माऊली शुगर (लोहरा , उस्मानाबाद) ७०.२४ कोटी

शरद ससाका (पैठण, औरंगाबाद) १७.५० कोटी

वैद्यनाथ ससाका (पांगरी, बीड) २७.६० कोटी

एसजीझेड अॅण्ड एससीए युनिट १ (तासगाव, सांगली) १७.८३ कोटी

एसजीझेड अॅण्ड एसजीए युनिट २ (नागेनाडी, सांगली) १३.०२ कोटी

उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये शेतकऱ्यांची देणी मिळण्यास खूप उशीर होतो. जरी साखरेची विक्री होत नसली, तरी साखर कारखान्यांनी नियमानुसार शेतकऱ्यांची संपुर्ण देणी चुकती करणे अपेक्षित असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.

स्त्रोत- कृषीजागरण मराठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here