सकस हिरव्या चाऱ्यासाठी संकरित नेपिअर गवत लागवड

जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण,हिरवा चारा, आंबवण, खनिज पदार्थ, जीवनसत्वे, पाणी याच्या समावेश होतो. त्यात सुमारे 70 टक्के भाग हा हिरवा चारा असतो. त्यामुळे लुसलुशीत व पौष्टिक चाऱ्याचे नियोजन करणे अत्यंत महत्तवाचे आहे. त्यासाठी संकरित नेपिअर हे बहुवार्षिक गवत महत्वाचे ठरते.
सर्वसाधारणपणे पूर्ण वाढलेल्या दुभल्या जनावराला दिवसाला 24 ते 25 किलो हिरवा चारा आणि 5 ते 6 किलो कोरडा चारा लागतो समतोल आहाराच्या दृष्टीने एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मे-निम्मे असावे लागते. 12 ते 13 किलो एकदल चारा उदा. (बाजरी, मका, ओट, नेपिअर, इ) तर 12 ते 13 किलो द्दिदलवर्गीय चारा (उदा. लसुण घास, चवळी, इ.) यांचा समावेश असावा.
पशु आहारात सकस हिरव्या चाऱ्याचे महत्व :

 1. आहारात जास्त प्रमाणात खुराक व कमी प्रमाणात हिरवा चारा असे प्रमाण जास्त काळ राहिल्यास जनावरांच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो.
 2. जनावरांची निरोगी वाढ व प्रजनन समता टिकविण्यासाठी हिरवा चारा आवश्यक.
 3. दर्जेदार हिरवा चारा अभावी गाभण गायींना कमजोर व रोगट वासरे निपजतात.
 4. जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास उत्तम खुराक देवुन सुध्दा जनावरांचे उत्पादनक्षम वय व उत्पादन यावर परिणाम होऊ शकतो.
  लागवडीसाठी जमीनीची निवड :
  संकरित नेपिअर हे सर्व प्रकारच्या जमिनीत वाढते. जमीनही ,खोल, मध्यम ते भारी, काळी कसदार, उत्तम निचऱ्याची जमीन निवड करावी. जमीन तयार करताना जमीनीची खोल नांगरट करावी व कुळवाच्या दोन आडव्या उभ्या पाळ्या घालुन जमीन तयार करावी. यामुळे गवताची जोमदार वाढ होते. व चांगले फुटवे मिळतात.
  लागवडीचा हंगाम व पेरणीची योग्य वेळ :-
  या गवताची साधारपणे लागवड ही खरीप व उन्हाळी हंगामात करता येते. या गवताची खरीप हंगामात लागवड जून ते ऑगस्ट व उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत करावी.
  संकरीत नेपिअर सुधारित वाण व वैशिष्टये :- या पिकाचे तीन वाण महत्वाचे आहेत 1) फुले जयवंत 2)

फुले यशवंत 3) फुले गुणवंत हे वाण म.फु.कृ.वि. विकसित आहेत.
अ) फुले जयवंत (आर.बी.एन-13) :- या वाणाच्या हिरव्या चाऱ्यात ऑक्झीलिक आम्लाचे प्रमाण हे 1.91% असते. त्यात प्रथिने 10.35%, खनिजे 12.32% स्निग्ध पदार्थ 2.38% तसेच एकुण पचनीयता 61.8% तसेच पानांवर कुस कमी प्रमाणात असल्याने जनावरे आवडीने खातात. चारा कापणीनंतर पुन्हा जोमाने लांब, भरपुर वाढतो, पाने रुंद तसेच फुटवे मऊ, लांब होतात हे वाण वर्षभर कोणत्याही हंगामात लागवड करता येते, पहिली कापणी 9-10 आठवडे नंतर कापण्या 3-7 आठवडे करता येतात वर्षभरात 8-9 कापण्या घेता येतात.
ब) फले यशवंत :- कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपुर फुटवे, मऊ,लांब,रुंद पाने आणि अल्प प्रमाणात लव ही असते.
क) फले गुणवंत :- चारा पालेदार, मऊ लांब व रुंद पाढो, कापणीनंतर जोमाने परत होणारी वाढ, अधिक लांब भरपुर फुटवे. या वाणांमहये प्रथिने 9-10%, पचनीयता 56% ऑक्झॉलिक आम्ल 2.05% इ. घटक आढळतात.
लागवड पद्धत :- या गवताची लागवडीसाठी ठोंबे लावावित लागवडीसाठी साधारणपणे 3 महिने वाढु दिलेल्या गवताच्या खोडाचा वापर करताना खोडाचा जमिनीकडील दोन तृंतीयांश (2/3) भागातील 2 ते 3 डोळे असणारे कांड्या काढुन लागवड करावी या गवताची लागवड 90 X 60 से.मी. (3 X 2 ) फुट अंतरावर करावी) गवताचे ठोंब 90 से.मी. अंतरावर (3 फुट) काढलेल्या सरीच्या बगलेत मुळासहित गवताची ठोंब डोळे असणाऱ्या कांड्याद्वारे लागवड करावी. दोन डोळे जमिनीत व एक जमिनीवर राहिल अशा पद्धतीने लागवड करावी व दोन झाडांमध्ये 2 फुट (60 से.मी.) अंतर ठेवावे. एका ठिकाणी एक जोमदार ठोंब लावल्यास हेक्टरी 18500 ठोंब पुरसे होतात.
गवत वाढीच्या काळात आंतर मशागत :- सुरवातीच्या वाढीच्या काळात 1 किंवा 2 खुरपण्या देणे आवश्यक आहे. त्यानंतरची खुरपणी गरजेनुसार करावी. दरवर्षी खांदणी करुन मातीची भर झाडास द्यावी. प्रत्येक वर्षी एक ठिकाणी 2 ते 3 फटवे ठेवुन इतर जादा फुटवे लागवडी करीता नवीन ठिकाणी वापरावेत. मर झालेले फुटवे पुंजक्यातुन काढुन टाकावेत. जोमदार 2 ते 3 फुटवे वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करावे.
खत व्यवस्थापन :- लागवडीपुर्वी 10 टन शेणखत प्रति हे आणि 250 ग्रॅम ॲझेटो बॅक्टर, पी.एस.बी (द्रवरुप) जीवाणु खत प्रति 1000 ठोंबासाठी प्रक्रिया करुन रासायणिक खताची मात्रा, 50:50:40 नत्र, स्फुरद, व पालाश प्रति हेक्टरी प्रमाणे, यापैकी प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र प्रति हे द्यावे.
गवताची कापणी व्यवस्थापन व उत्पादन : या गवाताची हिरव्या चाऱ्यासाठी पहिली कापणी 60 ते 65 दिवसांनी करावी. कापणी जमिनी पासुन साधारण 15 ते 20 से.मी. उंचीवर केल्यास फुटवे चांगले फुटण्यास मदत होते. नंतरच्या कापण्या पीक वाढीनुसार 45 ते 50 दिवांनी कराव्यात. अशाप्रकारे वर्षभरात 6 ते 7 कापण्या घेता येतात. व चारा शक्यतो कडबा कुट्टी मध्ये बारीक करुन द्यावा म्हणजे तो वाया जाणार नाही.
उत्पादन प्रति हेक्टरी :- उत्पादन हे 100 ते 150 टन/हेक्टरी मिळते.
हिरव्या चाऱ्यासाठी एकाच चाऱ्याचा अतीवापर टाळणे फायद्याचे :- पशु खाद्यामध्ये एकदल व द्विदल चारा पिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्यांचा उपयोग चारा म्हणुन करतात. त्यामुळे ऊसाच्या हिरव्या वाढ्यात हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्झलेट आम्ल व नायट्रेट प्रमाण जास्त असते. त्याचा गंभीर परिणाम हा जनावरांवर होत असतो. म्हणुन जनावरांना 8 ते 10 किलो वाढे त्याबरोबर सकस हिरवा हिदल चारा 10 किलो यांचे मिश्रण करुन द्यावे. त्याबरोबर 1 ते 1.5 किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम सार खनिजे द्यावीत.

प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक (कृषिविद्या)
दादासाहेब पाटिल कृषि महाविद्यालय
दहेगांव ता. वैजापूर जि. औरंगाबाद
(व.ना.म.कृ.वि.परभणी )
मो.नं. 7888297859.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here