‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त ‘या’ वेळेत सुरू…

कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (ता. २०) कठोर नियमावली जाहीर केली. त्यानुसार आता कृषी संबंधित व्यवहारदेखील लॉकडाउनच्या कक्षेत आणले गेले आहेत. कृषी अवजारे व शेतीमालाची विक्री केवळ सकाळी सात ते अकरा या वेळेत करता येणार आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर नवी नियमावली जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे नियम एक मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू असतील. त्यानुसार राज्यातील फळे-भाजी, डेअरी, चिकन-मटण-अंडी-मासे विक्रीची दुकानांपासून ते कृषी अवजारे, शेतीमालाची संबंधित सर्व दुकाने सकाळी ११ वाजल्यानंतर चालू ठेवता येणार नाहीत. केवळ सकाळी ७ ते ११ याच वेळेत संबंधित दुकाने उघडता येतील.

मुख्य सचिवांनी सर्व किराणा दुकानांना देखील हाच नियम लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र किराणासहित शेतीमालाच्या सर्व वस्तूंची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) करण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत मान्यता राहील. म्हणजेच आता ग्राहकाला सकाळी ११ वाजल्यानंतर घराबाहेर पडण्यास मज्ज्वाव करण्यात आला आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी विक्रेत्यांना मात्र ग्राहकांपर्यंत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासनाला आवश्यकता वाटत असल्यास कोणतीही सेवा संबंधित जिल्ह्यापुरती या कठोर नियमावलीत नव्याने समाविष्ट करता येईल. तशी मान्यता राज्य सरकारने दिली आहे.

…यामुळे कठोर नियमावली
राज्यातील विविध बाजार समित्या आणि आठवडी बाजारांमध्ये लॉकडाउन कालावधीत तुफान गर्दी होत होती. त्यामुळे सामूहिक अंतर पाळले जात नव्हते. यातून संसर्ग वाढण्यास वाव असल्याची शक्यता कोविड टास्क फोर्सच्या यंत्रणांनी राज्य शासनाकडे व्यक्त केली होती. परिणामी, कृषी व्यवस्था देखील आता लॉकडाउनच्या कठोर नियमाखाली आणली गेली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

स्त्रोत- ॲग्रोवन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here