शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई; दिवाळी सण होणार गोड

5,396 views

महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेसाठीच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात अडथळा येत होता. त्यामुळे या मदतीला अडथळा येऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत लवकरच परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

यासंदर्भात उद्यापर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळेल आणि सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते व्हायला सुरुवात होईल. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच भरपूर प्रमाणात नुकसान झाले. परंतु रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करताना सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करू असे मुख्यमंत्री म्हणाले होते. अखेर आज यासंदर्भात निर्णय होऊन सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात होईल मदत थेट खात्यात जमा होणार आहे. यामध्ये पहिला हप्ता 4700 कोटींचा असणार आहे.

किती मदत मिळेल?

शेती पिकासाठी जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्‍टर मदत देण्यात येईल. तसेच फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्‍टर, मृतांच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरांची पडझड झाल्यामुळे भरीव मदत देण्यात येईल असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here