शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा ८ तास वीज पुरवठा

 राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे. राज्यात विजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले.

वीजबिल माफीवरुन वादात सापडलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अखेर राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृषिपंप वीजवाहिन्या अतिभारित (ओव्हरलोड) होत असते, अशा तक्रारी मिळत असल्याने वीजवाहिन्यांचे जाळे सक्षम करणे, रोहित्रांची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. “राज्यातील किती आणि कोणत्या रोहित्रांना दिवसा आठ तास वीज पुरवठा करता येत नाही, याचा शोध घ्यावा व त्यांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा.

इतर राज्यांच्या तुलनेत औद्योगिक ग्राहकांचे वीजदर जास्त आहे. वीजदरांमुळे राज्यातील उद्योगांच्या वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. उद्योगांचे वीजदर कमी करणे गरजेचे आहे. त्यामुळे वीजदर किमान एक रुपया प्रतियुनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. सोबतच घरगुती व वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करा.” असे निर्देश राऊत यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here