वनस्पतीशास्त्र: ऊसाचे फुटवे भाग-१

5,305 views

ऊसाची लागण केल्यानंतर बेणे कांडीवर असलेल्या मूळ पट्टिकेवरील अंकुरातून कांडेमुळ्या सुटतात. जमिनीतील ओलावा अन्नद्रव्ये यांचे शोषण सुरू होते. कांड्यातील ग्लुकोज व इतर पदार्थ यामुळे बेण्यावरचा अंकुर चेतविला जातो. त्यातून कोंभ निपजतो. या कोंभाचे पुढे पुर्ण ऊसामध्ये रूपांतर होते. कोंभाला आरंभी एक मूळ येते. पुढच्या वाढीच्या काळात म्हणजे लागणीपासून दीड दोन महिन्यात कांडे मुळ्यांचे (सेट रूट) कार्य पूर्णतः कमी होते व शोषण पोषणाचे काम कोंभापासून तयार झालेली मुळे (शूट रूटस्) करु लागतात. याच कोंभावर ऊसाचा जो अंकुर असतो त्यापासून क्रमाक्रमाने पेरे वाढत जाऊन ऊस तयार होतो. यातल्या खालच्या पेरावर आणखी अंकुर असतात. या अंकुरापासून फुटवे निपजतात.

फुटव्यांची संख्या :
प्रत्येक मुख्य कोंभापासून किती फुटवे यावेत याचा एक प्रकारचा निसर्ग नियम असतो. आपण सध्या लागणीसाठी वापरतो त्या सॅकॅरम ऑफिसिनॅरीयम या ऊसामध्ये सर्वसाधारणपणे एका मुख्य कोंभाला तीन प्राथमिक फुटवे व तीन दुय्यम फुटवे येतात. म्हणजेच एक डोळा बेणे लावल्यानंतर त्याला मुख्य कोंभ धरुन एकूण संख्या ७ होते. ही क्रिया दाखविण्याचे एक सूत्र असे आहे.
ऊसाची संख्या = अ+३ब+३क, येथे अ म्हणजे मुख्य कोंभाचा ऊस, ब = प्राथमिक फुटवे, क = दुय्यम फुटवे.
मुख्य कोंभ किडीने खाल्ला किंवा काढून टाकला (जेठामोड) तर मात्र हे सूत्र बदलते. प्रत्येक प्राथमिक फुटवा हा मुख्य कोंभाप्रमाणे फुटवे निर्माण करु शकतो.
सॅकॅरम बारबेरी या प्रकारच्या ऊसामध्ये फुटव्यांचे सूत्र असे आहे.
ऊसांची प्रत्येक बेटातील संख्या = अ + ८ब + २३ क + ३१ ड
अ म्हणजे मुख्य कोंभ, ब, क, ड म्हणजे अनुक्रमे प्राथमिक, दुय्यम, तिय्यम इ. फुटवे.
ऊस जाड असेल तर फुटवे कमी, बारीक असेल तर फुटवे जास्त असे काहीचे अवलोकन आहे. पण हा काही निसर्ग नियम नाही.

शेतात लावलेल्या ऊसामध्ये फुटव्यांची अवस्था (टिलरिंग फेज) आल्यानंतर पुढे कांड्या लांबण्याची (इलॉंगेशन) अवस्था येते. बेण्याची लागण फार खोलीवर केली नसेल, पुरेसा ओलावा व योग्य उष्णतामान असेल तर फुटवे भरपूर येतात. दोन सर्यातील ऊस वाढीला लागून एकमेकाला भिडू लागतात. फुटव्यांची परस्परांशी स्पर्धा सुरु होते. याचवेळी ऊसाची लांबी वाढायचा काळ सुरु होतो. अनेक अंतर्गत व बाह्य घटकांचा फुटव्यांच्या संख्येवर परिणाम होतो. काही शेतकरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यान ऊसाची लागण करतात. जुलै महिन्यातील लागणीच्या ऊसात पहिले आलेले फुटवे पुढे थोडे कमी होतात. ऑगस्ट लागणीच्या ऊसाला पुष्कळ दुय्यम फुटवे येतात. पण यांचे मरुन जाण्याचे प्रमाण जास्त असते. सप्टेंबर लागणीच्या ऊसाला भरपूर फुटवे येतात. पण त्यातले २० ते २५% जगतात. मुख्य फुटव्यानंतर काही मोठ्या आकाराच्या पाणकोंबर्या (वॉटरशूटस्) येतात. त्यातल्या ५० टक्क्याहून अधिक शेवटपर्यंत मरुन जातात. यात ग्लुकोज, फ्रुक्टोज इ.चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारखान्याच्या गाळपासाठी त्या अयोग्य असतात. जोपर्यंत फुटवे बाल्यावस्थेत असतात तोपर्यंत सर्वांना प्रकाश, हवा, पाणी, जमीन व त्यातली पोषणद्रव्ये पुरेशी असतात. पण फुटवे मोठे झाल्यावर परस्परावर सावली करतात, प्रकाश अपुरा पडतो. जागा, ओलावा, पोषणद्रव्ये अपुरी पडतात. स्पर्धा वाढते. फुटवे मरण्याचे प्रमाणही वाढते.

जुलै लागण केलेल्या ऊसाच्या फडात तोडणीच्यावेळी २५% मुख्य ऊस, ५०% ऑगस्टमध्ये आलेले फुटवे व २५% सप्टेंबर फुटवे असे ऊस टिकून असतात. बाळभरणी किंवा भरणीपूर्वी आलेले फुटवे हे पीक घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यानंतरचे फुटवे चांगले जाडसर, मांसल व पाणचट असतात. त्यांना वॉटरशूटस्, बुलशूटस किंवा कोंभर्या म्हणतात. मुख्य ऊस वा-याने पडला किंवा काही कारणासाठी बाजूला दाबला तर तेथे मोकळा प्रकाश व हवा मिळते अशा ठिकाणी हे वॉटर शूटस् मोठ्या प्रमाणात येतात. मुख्य ऊसाला तोडणीपर्यंत परिपक्वता येण्यासाठी या कोंभर्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. अशा कोंभच्या वेळोवेळी काढायला हव्यात. अन्यथा मुख्य पिकाबरोबर तोडल्या जातात. ऊसाचे टनेज थोडे वाढते. परंतु साखरेचे प्रमाण घटते. एवढेच नव्हे तर रसाची गुणवत्ता खालावते. काही मंडळी अशा कोंभर्या जाणीवपूर्वक वाढवतात. पण साखर उद्योगाच्या दृष्टीने ही बाब अनिष्ट आहे.

फुटव्यामधील फरक : मातृकोंभ किंवा जेठाकोंभ, त्यापासून आलेले फुटवे व या फुटव्यापासून आलेले फुटवे यांचे वजन, लांबी, पेरांची जाडी, गोलाई इ. बाबतीत बराच फरक असतो. जेठाकोंभ किंवा मातृकोंभापासून निपजलेल्या ऊसाला बुडख्याकडेच्या कांड्या अत्यंत आखूड असतात. याचा अर्थ असा की सुरुवातीच्या अवस्थेत वाढ मंद असते.
आरंभीच्या अवस्थेत मातृकोंभापासून निपजलेली मुळे चांगली कार्यान्वित व्हायला दीड पावणे दोन महिने लागतात. या दरम्यान कांडेमुळाद्वारे होणारे भरण पोषण नव्या निपजणार्या पेरांच्या समाधानकारक वाढीसाठी पुरेसे नसते. त्यामुळे मातृ ऊसाच्या सुरुवातीच्या कांड्या आखूड राहतात.
सर्वसाधारणपणे मातृकोंभाला आलेले फुटवे व त्यांना आलेले दुय्यम फुटवे जाड व लांब कांड्यांचे असतात. मुळापासून थोडा बाक किंवा वळण घेऊन पुढे सरळ आकाशाकडे वाढतात. यानंतर येणारे जे फुटवे असतात ते वॉटरशूटस् असतात.
जेठा कोंभापासून आलेल्या ऊसाचे वजन फुटव्यांच्या ऊसापेक्षा जास्त असते. रसाची गुणवत्ता चांगली असते. प्राथमिक, दुय्यम किंवा तिय्यम स्तरावरील फुटव्यांमध्ये हे प्रमाण कमी कमी होत जाते. त्याचे एक कारण असे की, जेठा ऊसाचे वय जास्त असते. फुटव्यांचे वय कमी असते. फुटवे फुटण्याच्या अवस्थेत जेठा कोंभ मोडला तर मात्र येणारे फुटवे एकसारखे, वजनदार, लांब कांड्यांचे व साखरेचे प्रमाण चांगले असलेले असतात. याचे एकमेव कारण म्हणजे जेठा कोंभामध्ये संजीवकांचे प्रमाण जास्त असते. त्याच्या प्रभावाने बाजूच्या फुटव्यांचा वाढ विकास कमी होतो. याला जेठ्याची शिरजोरी (अपायकल डॉमिनन्स ) म्हणतात. जेठा कोभ मोडला तर ही शिरजोरी कमी होते. फुटवे चांगले वाढीस लागतात. बाजूच्या फटव्यांना परेसा कालावधी मिळाला तर त्याची रिकव्हरी, वजन इ. बाबतीत जेठा कोंभा इतकी बरोबरी होऊ शकते.

फुटव्यावर परिणाम करणारे घटक : अनेक अंतर्बाह्य घटकांचा फुटव्यांची निर्मिती व वाढीवर परिणाम होत असतो. आरंभी निपजलेल्या फुटव्यांची संख्या आणि ऊस काढणीच्या वेळी शेतात मिळणारी ऊसांची संख्या यांचा अन्योन्य संबंध पाहताना काही संभ्रम आणि संदेह निर्माण होतात. पण तो टाळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ रुंद सरीच्या लागणीमध्ये फुटवे चांगले वाढतात. अरुंद सरीमध्ये लागण दाट होते. त्यामुळे फुटवे कमी मिळतात. शेवटी आपणास हवे तसे, तितके, निकोप, सशक्त, वजनदार ऊस मिळविण्यासाठी आरंभापासून किती फुटव्यांची निपज करायची, त्याचे मरण्याचे प्रमाण कमीतकमी कसे ठेवायचे, व शेवटी अपेक्षित संख्या कशी राखायची हेच ऊस शेतीच्या यशाचे गमक आहे.

फुटव्यावर परिणाम करणारे घटक : अनेक अंतर्बाह्य घटकांचा फुटव्यांची निर्मिती व वाढीवर परिणाम होत असतो. आरंभी निपजलेल्या फुटव्यांची संख्या आणि ऊस काढणीच्या वेळी शेतात मिळणारी ऊसांची संख्या यांचा अन्योन्य संबंध पाहताना काही संभ्रम आणि संदेह निर्माण होतात. पण तो टाळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ रुंद सरीच्या लागणीमध्ये फुटवे चांगले वाढतात. अरुंद सरीमध्ये लागण दाट होते. त्यामुळे फुटवे कमी मिळतात. शेवटी आपणास हवे तसे, तितके, निकोप, सशक्त, वजनदार ऊस मिळविण्यासाठी आरंभापासून किती फुटव्यांची निपज करायची, त्याचे मरण्याचे प्रमाण कमीतकमी कसे ठेवायचे, व शेवटी अपेक्षित संख्या कशी राखायची हेच ऊस शेतीच्या यशाचे गमक आहे.

क्रमशः..

संपर्क : डॉ. जमदग्नी सर, ९४२२६२७७६२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here