रेबीज….एक जीवघेणा दंशरोग..


सुधाकर तांबे… शेतीवाडी,मोलमजुरी,मच्छिमारी करून उपजीविका करणारा. कधीतरी माझ्याकडे येणारा. काही वेळा माझी जंगलसोबत करणारा. जाणकार वैदू. गावकामात तरबेज. चुलीसाठी सगळीकडची लाकडे फोडून देणारा, नारळझावळी हिरांच्या केरसुण्या, सुंभदो-या, मुसकी करणारा,नव्या घोंगड्या मळून देणारा पंचक्रोशीतला प्रसिद्ध हरकसबी व हरहुन्नरी माणूस.
○गेल्या वर्षी सहज फेरफटका करीत तो माझ्याकडे आला. त्याच्या नाकावरचे ओरखडे पाहून मी त्याची कुठे पडला, ओरबडला? चौकशी केली तर त्याचा वृत्तांत ऐकून सुन्न झालो. फोटो घेतले. दोन दिवसांपूर्वी सुधाकर भर दुपारी कामावरून घराकडे जात असता मळ्यात एक कोल्हा सुक्या वहाळाकडे उभा राहिलेला दिसला. ‘ऐन दुपारी गाव वस्तीत कोल्हा कसा काय आला? माणूस बघताच तो पळाला कसा नाही?’ अशी शंका येऊन सुधाकरने एक छोटसं मातीचं ढेकूळ कोल्ह्याच्या दिशेने भिरकावलं. पण पळून जाण्याऐवजी तो त्वेषाने चाल करून आला. जवळपास अन्य माणूस कुणी नाही. सुधाकरने मागच्या आकडीतला कोयता हातात घेतला व अंगावर धावून येणा-या कोल्ह्याकडे भिरकावला.. अनवधानाने अनाहूतपणे घडलेली हीच चूक त्याच्या प्राणांवर बेतली. कोल्ह्याने झेपेत त्याला गाठलं व ढोपराजवळ त्याच्या पायाचा चावा घेतला. सुधाकरने खाली वाकून कोल्ह्याच्या पाठीत ठोसे मारायला सुरवात करताच कोल्ह्याने खाली वाकलेल्या सुधाकरचं नाक ओरबाडलं.. थोडी झटापट होऊन कोल्हा पळाला.

घाईने हातातला कोयता फेकून न मारता तो हातातच ठेवून सुधाकर ठाम रहाता तर तो कोयत्याने कोल्ह्याला नक्की मारू शकला असता… पण अचानक आलेल्या संकटात भीती ,धांदल, गडबडीत विचाराअगोदर कृती घडते… फेकलेला कोयता उचलून तो पाय ओढीत घराकडे गेला. वाटेत हाॅस्पिटल असून तो तिकडे गेला नाही हे त्याचं दुर्दैव! सगळं ऐकून सुधाकरला मी रेबिजचं गांभिर्य पटवून त्याला पैसे दिले. सरकारी रुग्णालयात इंजेक्शन घेण्यास सांगितलं. त्याला माझ्या पुतण्याने बाईकवरून हाॅस्पिटलला पोचवलं.त्याच्या घरी कळवलं. मी निर्धास्त झालो.
○दुस-या दिवशी मला आणखी एक बातमी कळली.तो कोल्हा तेथून पळाला तो जवळच्या वाडीत पायवाटेने जाणा-या एका बाईच्या अंगावर धावून गेला.तिच्या साडीला चावा घेऊन ओढताच ती खाली पडली. कोल्ह्याने तिच्या कोपराचा चावा घेतला. आरडाओरडा ऐकून शेजारीपाजारी दांडे,बडगे घेऊन धावून गेले व त्यांनी कोल्ह्याचा पुरा बंदोबस्त करून काही फोटो घेऊन त्याला पुरून टाकलं. मी त्या बाईकडे गेलो. तिच्या घरच्यांनी तिला त्वरित हाॅस्पिटलदाखल करून इंजेक्शन व उपचार करून आणलं होतं.तिच्या घरच्यांनी पथ्य व कोर्स पुरा करणार असल्याचं सांगितलं.


चार दिवसांनी सुधाकर मला फिरतीत भेटला तर दिलखुलास बोलला. इंजेक्शनं व उपचार घेतल्याचं त्याने सांगितलं…काही दिवसानी कळलं की तो डाॅ.कडे गेलाच नव्हता. मी हबकलोच.घरी चौकशी केली. तो कुणाचंच ऐकणारा नव्हता. रेबिजनं त्याला पूर्ण घेरलं.अखेरीस लवकरच त्याला गोव्यात नेलं. पण सगळं संपलं होतं….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here