राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांकडील दूध संकलन वाढविण्याचे मंत्री सुनिल केदार यांचे निर्देश

1,042 views

मुंबई, : विविध डेअरींच्या माध्यमातून राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील दूधसंकलन वाढवून राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिल्या.

मंत्रालयात, नागपूर येथे मदर डेअरी मार्फत उभारण्यात येणाऱ्या दूधाचे विविध उत्पादन प्रकल्प तसेच अमूल व मदर डेअरींच्या मार्फत राज्यात करण्यात येणाऱ्या दूध संकलनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त एच.पी. तुम्मोड यांच्यासह अमुल डेअरीचे प्रतिनिधी समीर नागवले, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अनिल हतेकर आणि मदर डेअरीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री.केदार म्हणाले, मदर डेअरीने नागपूर येथे पाच लाख लिटर दूध संकलन करून त्याद्वारे दुधाची विविध उत्पादने तयार करावीत. यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल. त्याचबरोबर गोंदिया व भंडारा या जिल्ह्यातही दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्यास तत्काळ सुरुवात करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात विविध प्रकारचे दूध उत्पादन होते. त्याविषयी माहिती घेण्यात येईल. राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये राज्यातून आणि परराज्यातून दूध पुरवठा होत असून यामध्ये प्रामुख्याने पिशवी बंद दूध प्रमुख आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या प्रमुख शहरात दूध पुरवठा करण्यात येतो. अमूल डेअरी रोज १६.८५ लाख लिटर पिशवी बंद दूध वितरण करते. याकरिता राज्यातील १०.६५ लाख लिटर दूध संकलन आणि ६.२० लाख लिटर परराज्यातून आवक करण्यात येत आहे. मदर डेअरी २.३० लाख लिटर पिशवी बंद दूध वितरण करते. नंदीनी डेअरी १.१० लाख लिटर दूधाचे वितरण करते, अशी माहिती दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here