राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक

राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर कारखाने गतीने बंद होत असले तरी राज्यातील शेवटचा कारखाना बंद होण्यास मे महिन्याची अखेरची तारीख उजाडेल, असा अंदाज आहे. राज्यात अद्यापही अंदाजे वीस लाख टन ऊसतोडणी अभावी शिवारात शिल्लक आहे.

ऊसतोडणी मजूरांसह ऊसतोडणी यंत्राच्या अनुपलब्धतेमुळे अनेक जिल्ह्यांतील कारखान्यांना अद्यापही आपला गाळप हंगाम पूर्ण करता आलेला नाही. सध्याच्या गाळपावर नजर टाकल्यास सध्या सुरू असलेल्या कारखान्यापैकी नव्वद टक्के साखर कारखाने एप्रिल अखेर हंगाम पूर्ण करतील, अशी शक्‍यता साखर आयुक्तालयातील सूत्रांची आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत १९१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यातील सुमारे चौदा ते पंधरा कारखाने मे महिन्याच्या मध्य ते अखेरपर्यंत सुरू राहतील, असा अंदाज आहे.

१५ एप्रिलअखेर आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार यंदा हंगाम सुरू केलेल्या १८८ साखर कारखान्यांपैकी १३६ साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. गेल्या वर्षीच्या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर यंदा मजूर कमी येतील, असा अंदाज ऊस पट्ट्यातील कारखान्यांनी बांधला होता. विशेष करून कोल्हापूर, सांगलीसह पुणे जिल्ह्यातील काही कारखान्यांनी ही शक्‍यता गृहीत धरून ऊस तोडणी यंत्रे खरेदीला प्राधान्य दिले. यामुळे हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात उसाची तोडणी गतीने झाली.

यंदा ऊस जास्त असून व कामगार कमी येऊन सुद्धा यंत्राने तोडणी गेल्या वर्षीपेक्षा जास्त झाल्याने जादा गाळप क्षमता असणाऱ्या कारखान्यांचा हंगाम देखील एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात संपला. हंगामापूर्वीच्या अंदाजानुसार एप्रिलच्या मध्यानंतरही ऊसगाळप सुरू राहिल, असा अंदाज होता. परंतु तोडणी यंत्राच्या प्रभावी वापराने ऊसतोडणी लवकर आटोपली. या उलट मराठवाड्यासह पुणे, नगर जिल्ह्यातील काही कारखान्यांकडून अजूनही ऊसगाळप सुरू आहे. केवळ ऊसतोडणी कामगारांच्या साह्याने तोडणी होत असल्याने अनेक जिल्ह्यांतील तोडणी धीमी होत असल्याचे चित्र आहे.

अशी आहे सद्यःस्थिती
नगर जिल्ह्यात चौदा कारखाने अद्याप सुरू आहेत. या जिल्ह्यातील ऊस हंगाम २० मेला संपण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६ कारखाने अद्याप सुरू आहेत. या जिल्ह्यतील शेवटचा कारखाना ३० मेला आपला हंगाम संपविण्याची शक्‍यता आहे. जालन्यातील चार कारखाने ३१ मेला हंगाम संपवतील. परभणीतील पाच कारखाने एप्रिल अखेरला बंद होतील. पुणे जिल्ह्यात ५ कारखाने सुरू असून, जिल्ह्याचा हंगाम ३० मेला संपेल. बीडचे सात कारखाने अद्याप सुरू असून, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हंगाम संपण्याची शक्‍यता आहे. साताऱ्यातील ५ कारखान्यांचा हंगाम एप्रिल अखेर संपण्याचा अंदाज आहे. हे प्रमुख जिल्हे वगळता नाशिक, हिंगोली लातूर जिल्ह्यात एक दोन कारखाने सुरू असून, हे कारखाने एप्रिलच्या शेवटी आपला हंगाम समाप्त करतील, अशी शक्‍यता आयुक्तालयाने व्यक्त केली आहे.

स्त्रोत- ॲग्रोवन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here