या मदतीतून दिवाळी गोड होणे दूरच, वाया गेलेल्या पिकांचा उत्पादन खर्चही निघणार नाही : अजित नवले

ठाकरे सरकारने अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेल्या मदतीचं शेतकरी संघटना किसान सभेने स्वागत केलं आहे. मात्र, ही मदत पुरेशी नसून त्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. तसेच या मदतीने दिवाळी गोड होणे दूरच, पण शेतात वाया गेलेल्या पिकांचा उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी भूमिका किसान सभेचे नेते अजित नवले यांनी मांडली

अजित नवले म्हणाले, “राज्य सरकारने केंद्राच्या निकषांपेक्षा थोडी अधिकची तरतूद करून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे आणि ज्या प्रमाणात नुकसान झाले ते पाहता ही मदत अपुरी आहे. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 10 हजार रुपये आणि फळ पिकांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये ही मदत अत्यल्प आहे. या मदतीने दिवाळी गोड होणे दूरच, वाया गेलेल्या पिकांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही हे वास्तव आहे.”

अजित नवले म्हणाले, “राज्य सरकारने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत वारंवार कळविले. मात्र तरीही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीची पुरेशी दखल घेतली नाही. साधे पाहणीसाठी पथक पाठविण्याची तसदीही घेतली नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची केलेली ही उपेक्षा संतापजनक आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये. शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता तातडीने मदतीसाठी पुढे यावे आणि राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करावी.”

“विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात नेहमीच टाळाटाळ करत आलेल्या आहेत. आताच्या संकटातही विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे कसे टाळता येईल असाच त्यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या मदती व्यतिरिक्त विमा कंपन्यांकडूनही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची रास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी सरकारच्या यंत्रणांनी गांभीर्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे,” असंही नवले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here