महापुरातील ऊस सावरताना..

1,110 views

कोयना धरण सुरू  झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाची व्यवस्था वाढत गेली.

महाराष्ट्राच्या अनेक भागांत सध्या ढगफुटीसारखा पडणारा पाऊस धुमाकूळ घालत आहे. या पावसामुळे ऊस शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पावसाच्या पाण्यात बुडणाऱ्या या ऊस शेतीचे व्यवस्थापन कसे करावे या विषयी..

महापुरामुळे गावगाडय़ाची अपरिमित हानी होते. सर्वाधिक फटका बसतो तो शेतीला. यंदाच्या महापुरात याचीच पुनरावृत्ती झाली आहे. ऊस, सोयाबीन, भात, हळद, भाजीपाला, केळी, द्राक्षे अशा पिकांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. यापूर्वीच्या दोन महापुरातही शेतकऱ्यांनी हाच कटू अनुभव घेतला. विशेषत: ऊस शेतीचे नुकसान सर्वाधिक झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी या नैसर्गिक आपत्तीने मुळातून हादरून गेला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील ऊस पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. कोयना धरण सुरू  झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाची व्यवस्था वाढत गेली. पुढे चांदोली, काळम्मावाडी अशी धरणे निघाल्याने सिंचनात आणखी भर पडली. कोल्हापूर जिल्ह्यात तर राधानगरी धरणामुळे पंचगंगा नदीकाठचा भाग सुपीक होता. या काळ्या मातीत उसाचा गोडवा उत्तरोत्तर वाढत चालला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा उतारा अधिक असल्याने येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेने चार पैसे ज्यादा मिळत असतात. शिवाय एफआरपी कायद्यामुळे ऊस दर मिळण्याची निश्चिंती आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यंदा उसाचे पीक चांगलेच तरारून आले होते.

मात्र जुलैमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे अपेक्षा पुरत्या फोल ठरल्या. कृष्णा, वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांना मोठे पूर आले. कोयना काळम्मावाडी, चांदोली, राधानगरी ही धरणे पूर्णपणे भरून जादा पाणी वाहू लागले. कर्नाटकातील अलमट्टी धरणसुद्धा पूर्णपणे भरले असल्याने त्याचेही पाणी फुगवटय़ाने मागे येऊ  लागले. यामुळे शेकडो गावे पाण्याखाली गेली. शेतीचे अपरिमित नुकसान झाले. महापुराच्या पाण्यात ऊस आठवडाभर बुडून होता. पाण्याची उंचीही तीन ते दहा फुटांपर्यंत होती. वेगवान पावसामुळे ऊस लोळण्याचे प्रमाण वाढले आहे. उसाच्या सुरळीत माती, गाळ गेल्यामुळे वाढ थांबली आहे. ऊस कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकसानीचे प्रमाण हे पिकाचा बुडीत कालावधी, पिकांच्या संदर्भात पाण्याची पातळी आणि पिकाच्या वाढीची अवस्था (उंची) यावर अवलंबून असते. पाणी साचून राहिल्याने जमिनीमधील प्राणवायूची मात्रा कमी झाल्याने पिकांची वाढ थांबते. प्राणवायूची मात्रा कमी झाल्यावर नत्र, स्फुरद, पालाश या मूलद्रव्याचे शोषण बंद होते. आडसाली तसेच पूर्वहंगामी ऊस लावणी लांबणीवर पडल्या आहेत. याचा मोठा फटका आगामी हंगामात ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांनानाही बसणार आहे. उसाची कमतरता जाणवणार आहे. साखर उताऱ्यात घट होण्याची चिन्हे आहेत. परिणामी ऊस उत्पादकांचे उत्पादन घटणार आहे. साखर उताऱ्यात घट झाल्याने कारखान्यांना फटका बसणार आहे. यामुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला दणका बसणार आहे. आधीच करोनामुळे शेतकरी विविध कारणांनी त्रस्त आहे. आता शेती उत्पादनांचे शेतमालाचे दर पडले असल्याने तो चिंतेत आहे. टोमॅटो, भाजीपाला, ढबू मिरची यांसारखी उत्पादने रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. दुधाचे दर घटले आहेत. अशा चोहोबाजूने तो अडचणीत आला आहे. उरलेला ऊस कसा वाचवता येईल यादृष्टीने शेतकरी विचार करीत आहेत. साखर कारखाने, त्यांचा कृषी विभाग वाचलेला ऊस कसा वाढेल या दृष्टीने नियोजन करत आहे. शास्त्रज्ञांचे पथकही या कामांमध्ये गुंतले आहे. यामुळे काहीशी उभारी आणि धुगधुगी ऊस पट्टय़ात दिसत आहे.

असे होते नुकसान

काही शेतकऱ्यांनी मे तसेच जून महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ापासून १० जुलैपर्यंत लागणी केली होती. हे पीक उगवणीच्या अवस्थेत असतानाच पुराचे पाणी शेतात शिरले. लागण केलेल्या उसाची उगवण झाली नाही. जे उगवले होते ते कोंभ मरून गेले. हंगामी लागण पीक फूटव्याच्या अवस्थेत होते. २०२० च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागण केलेला ऊस १५ ते १८ कांडय़ावर होता. २०२० च्या जुलै-ऑगस्टमध्ये लावलेला आडसाली ऊस २० ते २२  कांडय़ांवर होता. खोडव्याचे पीक १३ ते १५ कांडय़ावर होते. बहुतांशी क्षेत्रात पीक १० ते १२ दिवसांहून अधिक काळ पाण्यात राहिले. नुकसानीचे प्रमाण नदी किनाऱ्यापासून अंतराप्रमाणे व्यस्त आढळले. खालच्या कांडय़ावर मुळ्या फुटल्या गेल्या होत्या. नदीपात्रातून थोडय़ा उंचीवरील क्षेत्रातील पीक बरेच दिवस पाण्यात होते. काही ठिकाणी पुराचे पाणी आले नाही, पण अतिपावसाने सऱ्या भरल्या. काही ठिकाणी निचाऱ्याच्या जमिनीत एक दिवसापुरते पाणी राहून गेले. दीर्घकाळ पाणबुड परिस्थितीमुळे जमिनीतील हवा व प्राणवायू, निष्कासित होतो. मुळाचे श्व्सन मंदावते व कार्बनडाय ऑक्साईड साठून राहतो. अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थापासून मिथेन वायू निर्माण होतो. हे दोन्ही वायू विषारी घटक पातळीवर जाऊन पिकाला हानी करतात. प्राणवायू संपुष्टात आल्यामुळे जमिनीतील अ‍ॅझोटोब्याक्टर, पीएसबी व इतर उपयुक्त जीवाणू मरून जातात. जमिनितील जैविक घटक नष्ट होतो. जमीन मृतप्राय होते. पोषणद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. पाणबुड क्षेत्रात पोषण द्रव्यांचा समतोल बिघडतो. प्रामुख्याने नत्र वाहून जाते, जिरून जाते. पिकावर नत्राची कमतरता येते. अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात रूपांतर करण्याचे जमिनीमधील कार्य बंद होते. पाणबुड क्षेत्रातील जमिनीतील वायू विरहित अवस्थेत काम करणारे बॅक्टेरिया हे मॅग्नेनीज ऑक्साइड व फेरीक ऑक्साइडचे रूपांतर मॅग्नेनीज व फेरस ऑक्साइडमध्ये करतात. एका आठवडाभरात ही अन्नद्रव्ये विषारी पातळीवर पोचतात. अनएरमेबिक बॅक्टेरियामुळे अमोनिया, सल्फेट, हायड्रोजन सल्फाइड असे घातक रासायनिक पदार्थ निर्माण होतात.

अभ्यासकांचा सल्ला

पाणबुडीतील उसाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल अभ्यासकांनी शेतकऱ्यांना काही सल्ला दिला आहे. त्याचे अनुकरण केले तर ते लाभदायक ठरू शकते. वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी याबाबत सांगितले की,उगवण आणि आरंभ वाढीच्या अवस्थेतील ऊस सलग एक आठवडाभर पाण्याखाली राहिला तर कोंभ किंवा रोपे मरून जातात. शेतात वाफसा आल्यानंतर पूर्वीच्याच सऱ्यांमध्ये जमीन पुन्हा भुसभुशीत करून घ्यावी. यामध्ये सुपरकेन नर्सरी पद्धतीने तयार केलेली जोमदार निरोगी रोपे लावावीत. पाऊस असल्यास व सरीत पाणी साठण्याची शक्यता असल्यास रोपे सरीच्या बगलेवर लावावीत. पूर्वी बेसल डोस दिला असल्यास परत द्यायची गरज नाही. तथापि, अ‍ॅझोटोबॅक्टर, पीएसबी. ट्रायकोडर्मा, मेटारायाझिम, बिव्हेरिया यांच्या आळवण्या द्याव्यात. पाणबूड अवस्थेमुळे जमिनीतले जीवाणू सुप्त अवस्थेत गेलेले असतात. म्हणून ही उपाययोजना करावी. पुढे खताचे हप्ते आणि संजीवकांच्या फवारण्या देऊ न ऊस जोपासावा. नदीलगतच्या क्षेत्रातील आडसाली, पूर्व हंगामी, सुरु आणि खोडव्याचा जोमदार अवस्थेतील ऊस ८ ते १० दिवस पाण्यात बुडाला तर तो  मोठय़ा प्रमाणात कुजतो अथवा वाळून कडब्यासारखा दिसतो.असा ऊस थोडय़ाफार प्रमाणात जगला तरी त्याचे हवे तसे अपेक्षित उत्पादन येत नाही. यावर खालीलप्रमाणे उपाय योजना करावी. जमिनीतील दलदल कमी झाल्यावर ऊस कापून अडवा पाडावा. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये उन्हाने चांगला तापू द्यावा. आतून भेंडाळलेला (पोकळ) झाला असल्यामुळे हा ऊस हलका झालेला असतो. पाचट कुटीयंत्राने अथवा रोटोवेटरने पालाकुट्टीप्रमाणे तुकडे करावेत. यावर एकरी ५० किलो युरिया, ५० किलो सिंगल सुपर फोस्फेट, ५ किलो पाचट कुजवणारे जीवाणू ५०० किलो सेंद्रिय (कंपोस्ट) खतात मिसळून पसरावे. रोटोवेटरने उसाचे अवशेष व खते जमिनीत गाडून टाकावेत. त्यामुळे शेतात कुजून त्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर होते. या शेतामध्ये ऑक्टोबर—नोव्हेंबरमध्ये हरभरा, राजमा, (घेवडा). मोहरी यासारखी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकापैकी एखादे पीक घ्यावे. याचा बेवड चांगला होतो. जमिनीत हवा खेळती राहून सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. जमिनीतील भौतिक, रासायनिक व जैविक घटकांची सुधारणा होते. सुपिकता वाढते. वरील पिकाऐवजी धेंचा किंवा ताग यांचे हिरवळीचे खतांचे पीक सुद्धा घ्यायला हरकत नाही. दीड महिन्याचा ताग जमिनीत गाडताना त्यावर एकरी १०० किलो सिंगल सुपरफोस्फेट व ५० किलो युरिया पसारावा. कडधान्य पिकाच्या बेवडाने किंवा हिरवळीच्या खताने समृद्ध झालेल्या जमिनीमध्ये ४.५ ते ५ फूट रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात. या दरम्यान सुपरकेन नर्सरी पद्धतीने रोपे तयार करावीत. रुंद सरीमध्ये बेसल डोस देऊ न रोपांची लागण दीड फूट अंतरावर करावी. पुढे जीवाणूंच्या आळवण्या, खतांचे हप्ते, संजीवन फवारण्या, आंतरमशागत, कीड, रोग व्यवस्थापन, तण नियंत्रण इ.करून पीक जोपासावे. या हंगामासाठी (पूर्वहंगामी) फुले १०००१ हा वाण वापरणे उत्तम. बेणे न मिळाल्यास को— ८६०३२ लावण्यास हरकत नाही. ऊस लोळला असेल तर बांधून उभा करावा. त्यामुळे कांडय़ाचा जमिनीशी संपर्क येणार नाही. उसाला मुळ्या व पांगशा (डोळे) फूटण्याचे प्रमाण कमी राहील. यामुळे पाणबुडीतील उसाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. याप्रमाणे पाणबूड उसाचे व्यवस्थापन करावे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

स्त्रोत- लोकसत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here