मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगर

3,629 views

रोटरी नांगर हे प्राथमिक मशागतीसाठी वापरले जाणारे एक आधुनिक यंत्र आहे. युरोपमध्ये वापरला जाणारा नांगर हा नांगर अलीकडे चांगलाच प्रचलित होत आहे. 

पेरणीपूर्व मशागतीमध्ये नांगरणी हे महत्त्वाचे काम आहे. याकरिता सुधारित नांगराचा वापर करणे गरजेचे आहे. सुधारित नांगराच्या बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित नांगर असे दोन प्रमुख प्रकार आहेत. याशिवाय त्यांच्या घडणीनुसार फाळांचे नांगर आणि तव्यांचे नांगर असे दोन प्रकारही आहेत. अलीकडच्या काळात ट्रॅक्टरच्या साह्याने चालणारा फिरता नांगरसुद्धा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.

कार्य आणि संरचना 

 • हे एक फिरते नांगरणी यंत्र असून, ते जमिनीला छेद देत माती भुसभुशीत करते. 
 • यामध्ये चाकूच्या आकाराचे ब्लेड्स किंवा टाइन्स यांचा संचय फिरणाऱ्या शाफ्टवर फिक्स केलेला असतो. 
 • यामध्ये दर मिनिटाला ३०० फेरे घेणाऱ्या आसावर धारदार पाती बसविलेली असतात. पात्यांचा आकार कुदळीसारखा किंवा इंग्रजी एल (L) अक्षरासारखा असतो. 
 • नांगर सुरू झाल्यानंतर आसावर बसविलेली पाती आसाभोवती वेगाने फिरतात. चाकूच्या आकाराचे ब्लेड्स किंवा टाइन्स जमिनीला छेद देऊन टाइन्सवर असणाऱ्या कव्हरच्या विरुद्ध दिशेने मोकळ्या झालेल्या मातीला फेकतात.
 • या यंत्रासाठी ट्रॅक्टरच्या पीटीओ पॉवरचा वापर केला जातो. ट्रॅक्टरचा पीटीओ शाफ्टद्वारे यंत्राच्या फिरत्या शाफ्टपर्यंत ऊर्जा पुरवली जाते. त्या ऊर्जेवर ब्लेड्स फिरतात. या सतत फिरणाऱ्या ब्लेड्सचा वापरातून जमिनीची नांगरणी केली जाते. 
 • वेगाने फिरणाऱ्या पात्यामुळे जमीन एकसमान खोलीपर्यंत नांगरली जाते. 
 • नांगरणीवेळी दगड किंवा झाडांची मुळे किंवा इतर अवशेष इत्यांदींमध्ये अडकून नांगराची पाती तुटण्याची शक्यता असते. या यंत्रामध्ये नांगरणीवेळी पाती तुटू नयेत यासाठी विशिष्ट रचना केलेली आहे.
 • एका तासामध्ये सरासरी १/४ हेक्टर क्षेत्र नांगरून होते.
 • लागवडीयोग्य जमिनीच्या मशागतीसाठी या यंत्राची फक्त एकच फेरी पुरेशी आहे. म्हणजे दुबार मशागतीची गरज भासत नाही.
 • यंत्राचे ब्लेड तीक्ष्ण आणि लांब असल्यामुळे कोणत्याही जमिनीत एकसमान खोलीपर्यंत जातात. त्यामुळे जमिनीची सेंद्रिय रचना सुधारण्यासाठी मदत होते. 
 •   या यंत्राच्या कामाची विस्तृत श्रेणी (वर्किंग विड्थ) ही १०० सेंमी ते २५० सेंमी एवढी आहे.
 • हे यंत्र ४५ एचपी व त्यापेक्षा जास्त एचपीच्या ट्रॅक्टरसाठी योग्य आहे. 
 •  हे यंत्र काळ्या मातीमध्ये ६.५ इंच आणि वालुकामय मातीमध्ये ७.५ इंच खोलीपर्यंत नांगरणी करू शकते. 

वापरण्याचे फायदे 

 • यंत्राच्या लांब आणि तीक्ष्ण ब्लेड्समुळे कोणत्याही जमिनीमध्ये एकसमान नांगरणी केली जाते. 
 • या नांगराच्या वापराने मातीच्या ढेकळांचा भुगा होत असल्याने जमीन चांगली तयार होते.
 •  जमिनीचे शेती करण्यायोग्य जमिनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी हा नांगर फार उपयुक्त आहे. 
 •  जमिनीची मशागत उत्तम होते. 
 •  या नांगराद्वारे काळ्या जमिनीमध्ये दिवसाला ४ एकर आणि वालुकामय जमिनीमध्ये दिवसाला ६ एकर क्षेत्र नांगरता येते.
 • नांगरणीसाठी लागणारा वेळ, इंधन, आणि खर्च यांची बचत होते. 
 •  यंत्राची रचना ही मजबूत जाड प्लेट्स सोबत जोडलेली असते. त्यामुळे हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये उत्तम कार्य करते.

– डॉ. अमोल गोरे,  ९४०४७६७९१७
(कृषी अभियांत्रिकी विभाग, 
महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था, औरंगाबाद)

स्त्रोत- ॲग्रोवन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here