मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात आणि राज्यातील इतर भागांतील शेतकऱ्यांच्या सुगीच्या काळात शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नेमके सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहे, मात्र काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी असून लवकर गोड बातमी दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ते आज उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असताना ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की विरोधी पक्ष संकटाच्या काळात राजकारण करत आहे. केंद्रात त्यांची सत्ता असताना राज्यावर आरोप करत आहेत. सगळी सोग करता येतात, मात्र पैशाचे सोग करता येत नाही. राज्याच्या हक्काचे GST चे पैसे अद्याप केंद्राकडून आलेले नाहीत. ते आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अधिक मदत होईल. पण तोपर्यंत आम्ही वाट पाहणार नाही. वेळप्रसंगी कर्ज काढू आणि शेतकऱ्यांना मदत करू.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, काही दिवसांमध्ये दसरा आहे. त्यानंतर दिवाळी आहे. या सणासुदीला राज्यातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही ही माझी जबाबदारी आहे, असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.