देशात पेट्रोलमध्ये २०२३ पासून २० टक्के इथेनॉल

नवी दिल्ली – महागड्या इंधन (Fuel) आयातीवरील (Import) अवंलबित्व कमी करण्याच्या दृष्टिने देशाने आणखी एक पाऊल टाकले. केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोलमध्ये (Petrol) २०२३ पासून २० टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळण्याचा (Mixing) निर्णय घेतला आहे. ही मुदत दोन वर्षे अलीकडे आणली आहे. (20 Percent Ethanol in Petrol Country from 2023)

गेल्या वर्षी केंद्राने २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य ठेवले होते. त्याचप्रमाणे, २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्टही ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची मुदत २०२५ पर्यंत कमी केली. आता, ती आणखी दोन वर्षांनी घटविली आहे. देशात १ एप्रिल २०२३ पासून २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य ठेवले आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा इंधन आयातदार देश आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविल्याने आयातीवरचे अवंलबित्व कमी होऊ शकते.

भारतीय मानक ब्युरोच्याच्या दर्जानुसार देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना २० टक्क्यांपर्यत इथेनॉल मिसळलेले पेट्रोल विकण्याची सूचना केंद्र सरकाने तेल कंपन्यांना केली आहे. तेल मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली असून १ एप्रिल २०२३ पासून याची अंमलबजावणी होणार आहे, असेही त्यात म्हटले आहे.

कारखाने ७० लाख लिटर इथेनॉल तयार करणार

देशाला पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी २०२३ पर्यंत एक कोटी लिटर इथेनॉल लागेल. देशभरातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल निर्मितीसाठी ६० लाख टन साखर पुरविली जाईल. यातून ७० लाख लिटर इथेनॉल तयार होईल. उर्वरित इथेनॉल अतिरिक्त धान्यापासून मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here