तयारी हळद लागवडीची…

हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे.

जमिनीची पूर्वमशागत

 • जमीन चांगली निचरा होणारी असावी. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी.
 • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
 • लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावे.
 • हळद, आले यांसारख्या कंदवर्गीय पिकाच्या बेवडावरती पुन्हा हळदीची लागवड करू नये.
 • भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक घेण्याचे टाळावे.
 • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड केल्यास पिकावर कायम पिवळसर छटा राहते, उत्पादनात घट येते.
 • हळदीचे कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहते अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • या पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची उभी- आडवी नांगरट करून घ्यावी.
 • दोन नांगरटीनंतर ढेकळे फोडून घ्यावीत.
 • जमिनीमधील लव्हाळा, हराळी यांसारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत. तसेच अगोदरच्या पिकाच्या काड्या वेचून घ्याव्यात.
 • उपलब्धतेनुसार चांगले कुजलेले शेणखत एकरी १० ते १२ टन शेतात पसरवून टाकावे.
 • शेणखताची मात्रा कमी प्रमाणात उपलब्ध झाल्यास इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामध्ये गांडूळ खत, कंपोस्ट खत, मासळीचे खत, घडांचा चुरा, प्रेस मड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींच्या मिश्रणाचा समावेश करावा.
 • ओल्या मळीचा वापर हळदीसाठी टाळावा.
 • एकरी २५० किलो सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट अॉफ पोटॅश या खतांचा वापर जमीन तयार करतेवेळी करावा.

बेण्याची निवड

 • बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी.
 • बेण्यावरील एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत.
 • मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, तर हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असावीत.
 • बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे.
 • बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे.
 • बेण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बेणे मऊ पडते. असे मऊ बेणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो. असे बेणे उगवत नाही बीजप्रक्रियेच्या द्रावणात तरंगते.
 • मातृकंद बेणे त्रिकोणाकृती असावे.
 • बेण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी.
 • बेण्यावरील मुळ्या, गतवर्षीच्या पानाचे अवशेष साफ करून बियाणे स्वच्छ करावे.


डॉ. जितेंद्र कदम – ९४०४३६६१४१
(लेखक हळद संशोधन योजना
कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here