जिंकण्यासाठीच लढूया – विलास शिंदे

एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता शेतीत आहे. तरीही हा व्यवसाय सातत्याने तोट्यात आहे. व्यवस्था, व्यापारी, भांडवलदार यांच्याकडून शेतीतील वरकड उत्पन्नाचे शोषण होत आहे.

मी जरी छोटा शेतकरी असलो, माझी शेती आडवळणाच्या खेड्यात असली, त्याच बरोबर पाणी, तंत्रज्ञान, वातावरणातील बदल, भांडवल..अशा कितीही समस्या असल्या आणि त्यामुळे माझी शेती तोट्याची असली तरी एक शेतकरी म्हणून मला आता जागतिक पातळीवर स्पर्धा करावी लागते, हे आपण समजून घेतले पाहिजे. या स्पर्धेत जिंकावेच लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. जागतिक स्पर्धेत टिकतील अशा पिकनिहाय मूल्यसाखळ्या निर्माण होणे ही काळाची गरज आहे. ही लढाई एकट्या दुकट्याने लढणे आणि जिंकणेही तितकेच अवघड आहे. त्यासाठी शेतकरी म्हणूनच एकत्र यावे लागेल. तरच या स्पर्धेत आपला निभाव लागणार आहे.

शेती आणि शेतकरी चक्रव्यूहात सापडला आहे. हा चक्रव्यूह नीट समजून घेतला तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, हा ठाम आत्मविश्‍वास मनात ठेवून आपण गेले वर्षभर या सदरात चर्चा करत आहोत. चर्चा, चिंतन गरजेचं आहे; पण केवळ तेवढ्यावर थांबून चालणार नाही. या सगळ्याला कृतीची जोड असेल तरच या चर्चेला अर्थ उरतो. महात्मा जोतिराव फुलेंपासून ते शरद जोशींपर्यंत अनेक कृतिशील नेत्यांनी शेती, शेतीतील शोषण, वरकड कमाईची लूट, आसमानी-सुलतानी आपत्ती यावर मौलिक चिंतन केले आहे. व्यवस्थेवर आसूड उगारताना त्यांनी शेतीच्या चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठीचे उपाय सुचवले आहेत. या सगळ्यांचा आढावा घेण्याचा आणि त्यांच्या शिकवणुकीच्या विजेरीतून शेतीतील अंधारावर झोत टाकण्याचा प्रयत्न आपण केला. या सगळ्याला अर्थातच मागील दशकभर प्रत्यक्षात ‘सह्याद्री फार्म्स’ म्हणून जे काही करू शकलो, त्या अनुभवांची जोड होती.

या चर्चेचा सार पुढील प्रमाणे काढता येईल
एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता शेतीत आहे. तरीही हा व्यवसाय सातत्याने तोट्यात आहे. व्यवस्था, व्यापारी, भांडवलदार यांच्याकडून शेतीतील वरकड उत्पन्नाचे शोषण होत आहे. या शिवाय नैसर्गिक आपत्ती, मानसिक, सामाजिक, धार्मिक गुंते यातूनही शोषण होत आहे. फुटलेल्या पाइपलाइन प्रमाणे शेतीची अवस्था झाली आहे. या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडता येईल, या दृष्टीने प्रत्येक पिकाचा आपण विचार केला. प्रत्येक पिकात मूल्यसाखळ्या कशा उभारता येतील, जागतिक बाजारात कसे स्थान मिळवता येईल, शेतकऱ्यांच्या मालकीच्या व्यावसायिक यंत्रणा कशा उभ्या राहतील, त्या दृष्टीने प्रत्येक पिकामध्ये काय संधी आहेत, कोणत्या दिशेने पुढे जायला पाहिजे अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वस्तुनिष्ठ प्रयत्न आपण केला.

जिंकणे हाच पर्याय
अनंत अडचणींनी भरलेल्या या शेतीतून बाहेर पडणे आणि दुसरा काही व्यवसाय करणे शक्य असेल तर नक्कीच कुणीही तो मार्ग स्विकारेल. मात्र आपल्या बहुतांश शेतकऱ्यांसमोर तोही पर्याय नाहीय. शेतीबाह्य क्षेत्रांत रोजगारनिर्मितीचे कितीही प्रयत्न केले तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या मोठ्या लोकसंख्येला सामावून घेऊ शकतील इतकी क्षमता उद्योग किंवा सेवा क्षेत्राची नाही. त्यामुळे पुढील २० वर्षे किमान ५० कोटी लोकसंख्या तरी  शेतीवरच अवलंबून राहणार आहे. त्यामुळे शेतीलाच फायदेशीर करणे आणि शेतीतूनच वैयक्तिक समृद्धी साधणे, अतिरिक्त रोजगारनिर्मिती करणे ही दिशा ठेवावी लागणार आहे. आता आपण जागतिक बाजारपेठेच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. आपला शेतकरी छोटा असला आणि त्याला अनेक अडचणींशी झुंजावे लागत असले तरी त्याला आता जागतिक स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. या स्पर्धेत आपल्याला जिंकावेच लागेल. ही एक अपरिहार्यता आहे. त्या दृष्टीने आपल्याला तयारी करावी लागेल. जागतिक स्पर्धेत टिकतील अशा पिकनिहाय मूल्यसाखळ्या निर्माण होणे ही काळाची गरज आहे. या मूल्यसाखळ्या शेतकऱ्यांच्या पुढाकारातून उभ्या राहणे आणि त्या शेतकऱ्यांच्याच मालकीच्या असणे गरजेचे आहे. उत्पादनापासून ते काढणी पश्‍चात हाताळणी, मार्केटिंगपर्यंतच्या साखळ्या सक्षम करणे, त्यातून आपल्या भागात वैयक्तिक शेतकऱ्याच्या पातळीवर समृद्धी आणणे, शेतकऱ्यांच्या ताकदीच्या यंत्रणा उभ्या करण्यासाठी उत्पादक कंपन्या उभ्या राहणे हाच आपल्यापुढील मार्ग आहे.

दूरदृष्टीचे नेतृत्व हवे
पुढचे वीस वर्षांचे चित्र पाहिले तर शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ गतिमान करणे आवश्यक ठरते. त्यासाठी महाराष्ट्रातील दूरदृष्टी आणि कुवत असलेले विधायक तरुण नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे. याकामी जे पुढाकार घेत आहेत, त्यांना सुरुवातीच्या काळात साह्य देण्यासाठी, अडखळत चालणाऱ्या संस्थांना ताकद देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरची व्यवस्था गरजेची आहे. ‘सह्याद्री’ने याबाबतीत फलोत्पादन क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांना उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यभरात पीकनिहाय मूल्यसाखळ्यांचे जाळे वाढत जाईल. त्यांना सक्षम करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था उभी केली पाहिजे. त्यात कार्पोरेट, शासन, शेतकरी, शेतीतज्ज्ञ या सगळ्यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आपण जितक्या ताकदीने या इको सिस्टीम्स उभ्या करू, तितके शेतीचे चित्र लवकर बदलू शकेल.

रोजगारनिर्मिती शेतीतच
आजमितीस सरकारी व खासगी क्षेत्रात किती नोकऱ्या निर्माण होत आहेत, याकडे डोळसपणे पाहायला हवे. मनुष्यबळ कसे कमी करता येईल, यावर भर दिला जात असल्याचे लक्षात येईल. आज खासगी क्षेत्राचा जास्तीत जास्त कल ॲटोमायजेशनकडे आहे. जिथे पाच हजार लोक असतील तिथे हजार लोकांतच काम कसे होईल, या दृष्टीने विचार केला जात आहे. कोणत्याही खासगी उद्योगात अंतर्गत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘कॉस्ट-कॉम्पिटीटीव्ह’ असणे सयुक्तिक ठरते. खर्च कमी करतील तरच उद्योग टिकतील. शिवाय तंत्रज्ञान वेगाने विकसित होते आहे. त्यामुळेही नोकऱ्या जात आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- ए.आय.) वापर वाढल्यामुळे जुने जॉब जात आहेत. जे अगदी विशेषज्ञ आहेत, तेच टिकून आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता आपल्याला नेमके जॉब कुठे तयार होणार हे पाहिले पाहिजे. कुठलेही क्षेत्र जास्तीत जास्त हातांना काम देऊ शकेल, ते शोधावे लागेल. अशा प्रक्रियेत एकच नाव पुढे येते ते म्हणजे शेती क्षेत्र. रोजगार निर्माण करायचे असतील तर शेती क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. मरणासन्न आहे म्हणून शेतीचे पुनरुज्जीवन करायला सांगत नसून देशापुढे रोजगार-नोकऱ्यांची टंचाई आहे म्हणून तरी शेतीचा विचार होणे गरजेचे आहे.

ताकद निर्माण करा
गेल्या काही दिवसांपासून देशात कृषी विधेयकांवरून अनेक प्रकारचे वाद-प्रतिवाद सुरू आहेत. त्यातून नेमके काय साध्य होईल हे आज तरी सांगणे अवघड आहे. मात्र या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आपण शेतीकडे पूर्ण व्यवसाय म्हणूनच पाहिले पाहिजे एवढे तरी भान यातून आपल्याला आले पाहिजे. आपण जुन्या बाजार समित्यांच्या रस्त्याने जाणार असू किंवा खुल्या अर्थव्यवस्थेत कार्पोरेट क्षेत्राच्या वाटेने जाणार असू; आपल्याला आपली बाजारातील ताकद वाढवावीच लागणार आहे. ती एकत्र येण्यातूनच वाढेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

वर्षानुवर्षे बांधून ठेवलेल्या माणसाला मोकळे केल्यानंतर सुरुवातीला तो माणूस गडबडून जातो. मात्र पुढे चालण्यासाठी त्याचे स्वत:च हिंमत धरणे गरजेचे ठरते. आपल्या शेती व्यवस्थेचेही- पर्यायाने शेतकऱ्यांचेही- तसेच झाले आहे. सध्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:च चालायला लागणे व पुढे धावायला लागणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी त्यांना स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

एक मुद्दा कायम राहणार आहे की आता वैयक्तिक शेतकरी म्हणून टिकून राहणे अडचणीचे राहणार आहे. बाजारात होणारे शोषण थांबविण्यासाठी संघटित होऊन ताकद निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी संपूर्ण मूल्यसाखळीचा विचार करणे, केवळ उत्पादनावर न थांबता ग्राहकापर्यंत जाण्यासाठी पुढाकार घेणे, प्रक्रियेपासून ते रिटेल मार्केटिंगपर्यंत विविध संधी हस्तगत करणे या दिशेने शेतकऱ्यांना आता वाटचाल करावी लागणार आहे.

कृतिशील होऊया
शेतीतील चक्रव्यूह भेदण्यासाठी इतिहासात अनेक महान नेत्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्या सर्वांचेच मार्गदर्शन, अनुभव आपल्यासाठी पथदर्शक आहे. ते घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. ग्रामीण विकासासाठी मागील ७० वर्षांत देशात भरपूर प्रयत्न झाले. भरपूर काही चांगले घडले आहे. भरपूर काही चुकलेही आहे. ते सगळे समजून घेऊन आपल्याला पुढची पाऊले टाकावी लागतील. आता कुणाला दोष देण्यापेक्षा, कुणाचे फक्त वाभाडे काढण्यापेक्षा आपल्याला प्रत्यक्ष कृतिशील होणे महत्वाचे ठरणार आहे. बोलण्यापेक्षा, खूप चर्चा करण्यापेक्षा आता कृती महत्त्वाची आहे. या दृष्टीने पुढचा काळ अधिक वैभवशाली असेल. त्यासाठी आपण सर्व जण कार्यरत राहू या.

धन्यवाद!
info@sahyadrifarms.com.
(लेखक ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

स्त्रोत- दै.सकाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here