जागतिक हवामान बदल आणि सेंद्रिय कर्ब

जागतिक तापमान वाढ (Elevated Temperature) आणि जागतिक हवामान बदल (Global Climate change) हे शब्द आपण सतत ऐकत आहोत. याचे कृषी घटकांवर विशेषतः मातीवर होणारे परिणाम आपल्याला फारसे माहित नसतात. ते आपण या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूत.

भूतकाळातील तापमानाचे स्वरूप सध्याच्या तापमानाच्या स्वरूपापेक्षा वेगळे होते. काही ठिकाणी खुप जास्त तापमान तर काही ठिकाणी अगदी कमी होतं. परंतु, सध्या जलदगतीने होत असलेल्या तापमान वाढीमुळे हे बदल तीव्रतेने होताना दिसत आहेत. नैसर्गिक घटनांमुळे होणाऱ्या तापमानवाढीचे प्रमाण हे मानवनिर्मित घटनांतून होणाऱ्या तापमान वाढीपेक्षा जास्त झाले आहे. म्हणजेच निसर्ग अनियमित झाला आहे. ही बाब वैज्ञानिकांना अधिक चिंताजनक वाटते. याचे परिणाम सर्व सजीवांना निश्चितपणे भोगावे लागणार आहेत, याबद्दल किचिंतपण शंका नाही.
हवेतील पाण्याची वाफ (vapour), कार्बन डायऑक्साईड (CO2), मिथेन (CH4) आणि अन्य वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते, त्याला हरितगृह परिणाम(greenhouse effect) म्हणतात. या नैसर्गिक हरितगृह परिणामाबरोबरच औद्योगिक, कृषी व पूरक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंमुळेही पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. यालाच जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल(climate change) म्हणतात.

मातीतील सेंद्रिय कर्बाचे महत्त्व:

जागतिक हवामान बदलाला बळी पडणारा मातीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब (Organic carbon). सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपिकतेला बळकट करतो. मातीचे आरोग्य तपासण्यसाठी कार्बन संबंधित विशिष्ट बेंचमार्क वापरले जातात. त्यात ह्युमसची पातळी, कार्बन डायऑक्साईडचे मुक्त होणे, सूक्ष्मजीव चयापचय या क्रिया महत्त्वाच्या मानल्या जातात. अजैविक आणि जैविक अशा दोन प्रकारांत सेंद्रिय कर्ब हा मातीत उपलब्ध असतो. अजैविक कर्ब हा खनिज स्वरूपात आढळतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मातीच्या वरच्या स्तरात अधिक असते. वाळवंटी भागात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी आहे. मातीच्या १२% ते १८% श्रेणीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्या मातीस सेंद्रिय माती (organic soil) असे म्हणतात. ५% ते २०%  कर्ब हा प्रकाश संश्लेषणाद्वारे निर्माण होतो. तो मुळांच्या अवतीभोवती असणाऱ्या मातीच्या स्तरात (Rhizosphere) असतो, सूक्ष्म जिवांच्या कृतीद्वारे कर्ब (carbon) पुरवला जातो. सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेत सूक्ष्मजिवांचे खूप मोलाचे योगदान असते. साधारणतः जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.40 % पेक्षा जास्त असावे.

सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचे आरोग्य (organic carbon and soil health):

◆जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
◆जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.
हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
◆रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते.
नत्र (N) आणि स्फुरदा (Phosphorous) च्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.
◆रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.
◆स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी स्फुरदाची उपलब्धता वाढते.
◆भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.
◆मातीची धूप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते.
◆जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता वाढते.
जमिनीचा सामू (Soil PH) उदासीन (६.५ ते ७.५) ठेवण्यास मदत होते.
◆आयन विनिमय क्षमता ( Ion exchange capacity) वाढते.
◆चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.
◆सेंद्रिय कर्बामुळे विकरांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. उदा. युरिएज सेल्युलोज (Urease cellulose).
सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जिवाणूंच्या जननक्रियेस गती प्राप्त होते. जैविक संख्येत वाढ होते.-जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

जागतिक हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावर होणारे परिणाम (Effect of global climate change on organic carbon) हवामान बदलाचा सेंद्रिय कर्बावर होणारा परिणाम व त्याची भविष्यवाणी करने अवघड असते. हवामानाच्या घटकांचा व जमीन घटकांचा एकमेकांशी असणाऱ्या परस्पर संबंधामुळे सेंद्रिय कर्बाच्या नुकसानीची आकडेवारी काढणे अवघड जाते.

१) वाढता कार्बन डायऑक्साईड (CO2) आणि सेंद्रिय कर्ब (organic carbon) –
वातावरणातील कार्बन डायऑक्साईड स्वरुपातील कर्ब वाढ होऊन त्याचा प्रकाश संश्लेषणा (Photosynthesis) साठी लाभ होऊ शकतो. मात्र, या प्रकाश संश्लेषणाद्वारे कार्बन डायऑक्साईडचे सेंद्रिय कर्बात रूपांतर होतेच, याची खात्री देता येत नाही. त्यावेळी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे नुकसान निरंतर चालू असते. आपण शेतीमध्ये मशागत (Tillage) करतो, त्यावेळी त्याचे प्रमाण वाढते. उलट कमीत कमी मशागत केल्यास सेंद्रिय कर्बाच्या नुकसानीचे प्रमाण कमी होते.

२)  तापमान वाढ व सेंद्रिय कर्ब –
तापमान वाढीचा सेंद्रिय कर्बावर नकारात्मक परिणाम होतो. वाढत्या तापमानामुळे कर्बात सूक्ष्मजीव अपघटन वाढून परिणामी कर्बाच्या नुकसानीला उत्तेजन मिळते. या उलट थंड प्रदेशात हे अपघटन कमी होऊन सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

३) हवामान बदलाला सेंद्रिय कर्बाचा अनियमित प्रतिसाद –
मृदेविषयी व मृदेतील असंख्य जैविक प्रक्रीयांविषयी असलेले मानवाचे अपुरे ज्ञान सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनेत बाधा आणते.

सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन-

सेंद्रिय खतांचा वापर करताना वनस्पतींना अन्नद्रव्ये पुरविणारे स्रोत इतक्याच मर्यादित अर्थाने पाहिले जाते. मात्र, जमिनीचे भौतिक (Physical) व जैविक (Biological) गुणधर्म सुधारण्यासाठी त्याचे खूप महत्त्व आहे. जमिनीतील स्थिर (immobile) झालेली विविध अन्नद्रव्ये (Nutrients) उपलब्ध (mobile) स्थितीत येऊन पिकांना उपलब्ध होतात. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याकडील शेणखत (FYM) चांगल्या प्रतीचे कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.
●शेणखत चांगले कुजवावे, अन्यथा शेणखतातील तणांच्या बियांमुळे शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढेल.
●ज्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणी ढीग पद्धती (Heap method) ने खत तयार करावे. ●याउलट कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धती (Pit method) ने शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करावे.

●बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेणखतामध्ये सामान्यतः कुजण्याच्या स्थितीनुसार तीन प्रकार पडतात. ●खड्ड्यातील वरचा थर न कुजलेला, मधला थर कुजलेला, तर खालचा थर न कुजलेला अशी परिस्थिती असते. अशा खतांमधून किडी (Pest) , तणे (weed), अपायकारक बुरशीं (Fungi)चा प्रसार होतो, हे लक्षात घ्यावे.
●सेंद्रिय खत आपल्या शेतावरच तयार करावे.
अर्धवट कुजलेल्या शेणखतापासून गांडूळखत (Vermicompost) तयार करावे.
●ज्या शेतकऱ्यांकडे शेणखताचा अपुरा पुरवठा आहे, त्यांनी दर दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीचे पीक (Green manuring crop) घेतले पाहिजे. ती फुलोऱ्यात येताच जमिनीत गाडावी. उदा. धैंचा (Dhaincha) , ताग (Sunhemp) , चवळी (Cowpea) इ.
●रासायनिक खतांबरोबर निंबोळी (Neem seed cake) किंवा करंज पेंडी (Karanj cake) चा वापर करावा. यांचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
शेतातील तणे फुले येण्यापूर्वी जमिनीत जागेवरच टाकावीत, त्याचे आच्छादन (mulching) होते. तसेच ती कुजल्यानंतर मातीत सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
●पिकांच्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. यामुळे मातीतील ओलावा (soil moisture) टिकण्यास मदत होते. तसेच हे घटक कुजल्यानंतर कर्बात वाढ होते. विशेषतः फळ पिकांना याचा जास्त फायदा झाल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
●चुनखडीयुक्त (calcareous soil) व चोपण जमिनीत नगदी व फळ पिकांना जीवामृत स्लरीचा वापर करावा.

सत्यवान विलास घोलप
(विद्यार्थी कृषी हवामान शास्त्र विभाग)
प्रितम प्रकाश पाटील
(विद्यार्थी कृषी हवामान शास्त्र विभाग)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
मो. ७७७६०१०६९६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here