जमीन मोजणीच्या प्रकरणांना ‘ब्रेक’

3,947 views

जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यावरदेखील करोना महामारीचा परिणाम झाल्याने विभागात जमीन मोजण्याच्या प्रकरणांच्या प्रलंबिततेत मोठी वाढ झाली आहे.

करोना महामारीचा फटका ज्याप्रमाणे उद्योग-व्यवसायांना बसला आहे, त्याचप्रमाणे शासकीय कामकाजालादेखील बसला आहे. जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यावरदेखील करोना महामारीचा परिणाम झाल्याने विभागात जमीन मोजण्याच्या प्रकरणांच्या प्रलंबिततेत मोठी वाढ झाली आहे.

विभागात दाखल प्रकरणांपैकी ५१.६४ टक्के प्रकरणे निकाली निघाली असून, ४८.३५ टक्के जमीन मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. नाशिक विभागातील नाशिकसह नगर, जळगाव, धुळे आणी नंदुरबार या पाच जिल्ह्यांमिळून मार्च २०१९ अखेर १० हजार ५८१ जमीन मोजणी प्रकरणे प्रलंबित होती. त्यानणार वर्षभरात ऑगस्ट २०२० पर्यंत नव्याने एक हजार ४८१ प्रकरणे दाखल होऊन एकूण प्रकरणांची संख्या १२ हजार ६२ झाली होती. त्यापैकी वर्षभरात चार हजार ९६२ जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यात भूमी अभिलेख विभागाला यश मिळाले होते. परंतु, त्यानंतर करोनाचा उद्रेक वाढल्याने जमीन मोजणी प्रकरणांचे काम ठप्प झाले होते. या संकटामुळे विभागात तब्बल पाच हजार ८३२ जमीन मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिलेली आहेत. मोजणी प्रकरणांची प्रलंबितता वाढल्याचा फटका शेतकरीवर्गाला बसला आहे.

गावठाण मोजणीसही खीळ

केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत विभागातील चार हजार ३६२ गावांच्या गावठाणांचे ड्रोनद्वारे मोजणीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. मात्र, हे कामदेखील अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. या योजनेच्या कामासाठी सुरुवातीला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याने नियमित जमीन मोजणी प्रकारणे निकाली काढण्यासदेखील विलंब झाला. भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी करोनाग्रस्त झाल्याचा फटकाही या कार्यालयाच्या कामकाजाला बसला. भूमी अभिलेख कार्यालयाकडून तातडीने जमीन मोजणी प्रकरणे निकाली काढण्याची अपेक्षा शेतकरीवर्गाने व्यक्त केली आहे.

विभागातील जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा—मोजणी प्रकरणे संख्या—मोजणी झालेली प्रकरणे–शिल्लक
नाशिक—४२८५—२२७४—२०११

धुळे—६९७—४७४—२२३

नंदुरबार—२९९—१६७—१३२

जळगाव—१४४६—८९८—५४८
नगर—५३३५—२४१७—२९१८

एकूण—१२०६२—६२३०—५८३२

स्त्रोत: महाराष्ट्र टाइम्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here