गळीत हंगामासाठी येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांबाबत संसर्ग रोखण्याविषयी
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शक सूचना

ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होत असतो. साखर कारखान्यांना आवश्यक कच्चा माल पुरविण्यासाठी गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी मजूर / कामगार, ऊस वाहतूक करणारे मनुष्यबळ, तसेच प्रत्यक्ष कारखान्यामध्ये काम करणारे कामगार / अधिकारी वर्ग मोठया प्रमाणात कामासाठी एकत्रित येतात. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. येत्या काळामध्ये त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी मजूर / इतर मनुष्यबळ मोठया प्रमाणावर एकत्रित येण्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच सामाजिक संसर्ग रोखला जावा यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

 1. ऊस तोडणी मजूर/कामगारांमध्ये 60 वर्षावरील मजूर / कामगार यांना परवानगी देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांना परराज्यातून/परजिल्हयातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणण्यात येऊ नये.
  2. ऊस तोडणी मजूर / कामगार यांच्यामध्यो Co-Morbid असलेल्या कामगारांना परवानगी देण्यात येऊ नये. सर्व मजूरांची त्या त्या जिल्ह्यात वैद्यकीय तपासणी करण्यात यावी व फक्त प्रमाणित मजूरांनाच ऊसतोडणीसाठी आणण्यात यावे.
 2. ऊस तोडणी मजूर/कामगार यांच्या बरोबर येणाऱ्या लहान मुलांना कामाच्या ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये. अशा लहान मुलांसाठी प्रत्येक कार्यस्थळावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.
 3. ऊस तोडणी मजूर ज्याठिकाणावरून राज्य / जिल्हाअंतर्गत प्रवास करून येणार आहेत, त्यांच्या मुळ ठिकाणी त्यांची RTPCR / Antigen Test करणे बंधनकारक करण्यात यावे. तसेच जिल्हयामध्ये कारखान्यांच्या कार्यस्थळावर आल्यानंतर त्यांना 7 दिवसांचा Quarantine कालावधी बंधनकारक करण्यात यावा. यासाठी अलगीकरणाची व्यवस्था प्रत्येक साखर कारखान्यांने करावी.
 4. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस तोडणी सुरू असलेल्या शेतकाऱ्यांच्या फडाच्या ठिकाणी वैद्यकीय पथकाद्वारे दैनदिन तपासणी करण्यात यावी.
 5. कामगारांना राहण्यासाठी तंबू / तात्पुरत्या केबिन्स तसेच टॉयलेट यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
 6. येत्या हंगामामध्ये ऊस तोडणी कामगारांचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी यांत्रिक साधानामार्फत करण्यासाठी साखर कारखान्यांना जास्तीत जास्त Sugar Cane Harvesters खरेदी करून त्याचा वापर करण्याबाबत सुचित करण्यात यावे.
 7. प्रत्येक साखर कारखान्यांकडे कार्यरत 5 टक्के ऊस तोडणी कामगार / मजूर बाधित होतील असे गृहित धरून त्या अनुषंगाने त्यांच्या उपाचारासाठी आवश्यक अशी विलगीकरण केंद्रे तसेच सदर केंद्रामध्ये वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक ते साहित्य उदा. वैद्यकीय अधिकारी, व्हेंटिलेटरर्स, ऑक्सीजन सुविधा असलेले बेड, औषधे उपलब्ध करण्यात यावीत.
 8. ऊस तोडणी कामगार/मजूर यांच्यासाठी संपूर्ण गळीत हंगामातील कालावधी विचारात घेता प्रत्येक दिवसासाठी प्रती मजूर 1 या प्रमाणे मास्कची उपलब्धता, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात यावेत.
 9. हंगामामध्ये ऊस तोडणीसाठी येणारे मजूर, ऊस वाहतूक करणारे मनुष्यबळ, प्रत्यक्ष कारखान्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांच्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे औषधे उपलब्ध करून देण्यात यावीत.
 10. ऊस वाहतूक करण्यासाठी असलेले ट्रॅक्टर ड्रायव्हरर्स तसेच बैलगाडीतून ऊस वाहतूक करणारे मनुष्यबळ तसेच कारखान्यांतील इतर कामगार यांच्यासाठीही सर्व प्रतिबंधात्मक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
 11. सर्व कारखान्यांच्या कार्यस्थळावर RTPCR Test Machine तसेच तात्काळ तपासणी करण्यासाठी Antigen Kit उपलब्ध ठेवण्यात यावे किंवा खासगी प्रयोगशाळामार्फत तपासणी करून घेण्यात यावी.
 12. साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी हंगामामध्ये ऊस तोडणीसाठी येणारे मजूर, ऊस वाहतुक करणारे मनुष्यबळ यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोविड-19 Test केल्याशिवाय कामासाठी येण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असे नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here