कोरोना काळात बळीराजा ठरला सर्वांचा पोशिंदा – दादाजी भुसे

राज्यात खरीप हंगामास सुरवात झाली असून, त्यादृष्टीने शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे जोमात सुरू झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर अधारित बी.बी.एफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने पीक पेरणी केल्यास शेतकऱ्याला उत्पन्नवाढीसाठी निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

सिन्नर तालुक्यातील वडगांव येथे भागवत बलक यांच्या शेत-शिवारात राज्यस्तरीय कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला,त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री श्री.भुसे म्हणाले, संपूर्ण राज्यात  २१ जून २०२१ ते ०१ जुलै २०२१  या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने राज्यात युरीयाचा बफर स्टॉक केला असून, युरीयाचा महाराष्ट्रात तुटवडा भासणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यानी खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, मका  व हरबरा पिकांच्या पेरणीसाठी बी.बी.एफ पेरणी यंत्र खुप उपयुक्त असून, या यंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास निविष्ठा खर्चात 20 ते 25 टक्के बचत होऊन, उत्पन्नात 25 ते 30 टक्के वाढ निश्चित मिळते. अवर्षणप्रवण क्षेत्रात याचा उपयोग प्रभावीपणे होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज आपण गेल्या वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करत आहोत.

पाच ते सहा महिन्यांचा लॉकडाऊन कालावधी सुध्दा आपण सर्वांनी अुनुभवला आहे. या कालावधीत सर्वच व्यवहार बंद होते, परंतु सर्वांपर्यत अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दुध हे वेळेत पोहचले, याचे सर्व श्रेय माझ्या बळीराजाला जाते, तो उभ्या जगाचा पोशिंदा असून त्याचा मला अभिमान असल्याचे गौरवोद्गारही मंत्री श्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद  साधला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून, यात शेततळ्यांसाठी कुंपण, सोयाबीन लागवड,  नाविन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक वाण, बियाणाचा वापर, कृषी योजना यावर सविस्तर मार्गदर्शनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले. पीक विमा व फळपीक विमा हा या वर्षापासून एच्छीक केला असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्रशासनाकडे  विमासंबधी बीड मॉडेल सादर केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, कृषी सहाय्य्क संचालक  संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, सिन्नर प्रांताधिकारी पुजा गायकवाड, उदय सांगळे, कोंडाजीमामा आव्हाड,वडगावच्या सरपंच मंदाकिनी काळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here