कृषीमंत्री म्हणतात, ‘शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे पैसे नाहीत’

750 views

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी तिजोरीत पैसा नाही ही वस्तुस्थिती आहे असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. तर पुढील तीन महिने तरी शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही असं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.

राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. असं असलं तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे कबूल करत पैसे उभा करु, असेही भुसे म्हणाले. तर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढील तीन महिने शेतकऱ्याला मदत करणे शक्य नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील नागद, सायगव्हान येथे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. यावेळी बोलताना भुसे म्हणाले की येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या त्यांच्याकडे अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाली याची आकडेवारी नाही. मात्र येत्या आठ दिवसात ही आकडेवारी आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात बोलू. सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल अशी परिस्थिती नाही. शासनाच्या तिजोरीत सध्या पैसा नाही, ही वस्तुस्थिती आहे, असं भुसे म्हणाले. मात्र शेतकऱ्यांना मदतीसाठी वाटेल ते करु पण शेतकऱ्याला मदत करु, असंही ते म्हणाले.

दुसरीकडे राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील सोयगाव तालुक्यातील काही गावांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या व्यथा सत्तार यांच्या समोर मांडल्या. यावेळी एबीपी माझाशी बोलताना मंत्री सत्तार यांनी देखील स्पष्ट म्हटलं आहे की की सरकार कडे पैसा नाही सर्व पैसा कोरोना उपचारांसाठी लावला आहे. पुढील तीन महिने तरी हा पैसा उभा करणं शक्य नाही. पण शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे वार्‍यावर सोडणार नाही वेळ प्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करू, असंही सत्तार म्हणाले.

यावेळी सत्तार यांनी दावा केला की सोयगाव तालुक्यामध्ये पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. मात्र ज्या शेतांमध्ये सत्तार नुकसानीची पाहणी करत होते. त्याच शेतातील शेतकऱ्यांनी मात्र अद्याप कुठलाही अधिकारी बांधावर आला नाही असं सांगितलं. यावेळी बोलताना सत्तार यांनी बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीच्या मालकावर कठोर कारवाई करून फाशी देण्याचा कायदा करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळणे शक्य नाही हे या दोन्ही मंत्र्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात कोरडा दुष्काळ होता. आता ओला दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here