कारखान्याला जाण्याआधी ऊस मालकाचा रस काढतो.. तो कसा यासाठी ही पोस्ट जरूर वाचा

14,829 views

दीड दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर उसाला तोड आली. ऊसतोडीसाठी दररोज जिथे ऊसतोड चालू आहे तिथे दररोज जाऊन ट्रॅक्टर मालकांची गाठ घेत होतो. ते म्हणायचे, “एवढा फड झाला की तुमच्यातच येतो.”
दुसऱ्या दिवशी गेले की त्यांनी दुसराच फड धरलेला असायचा.असे दीड महिना चाललेले .मी दररोज न चुकता त्यांच्याकडे जायचा.दीड महिन्यानंतर आमच्या ऊसाला तोड आली.
ट्रॅक्टर मालक आणि मुकादम ऊस पहायला आले. सगळीकडे फिरून ऊस पाहिला. उद्या सकाळी मुहूर्त करूया,नारळ घेऊन या आणि त्याच्यावर काहीतरी ठेवायला पाहिजे.,
” ठेवूया की” मी म्हणालो.
“का आत्ताच देताय बघा म्हणजे उद्या तुम्ही नाही आलं तर चालतंय” मुकादम म्हणाला.
“मी आता पैसे आणलेले नाहीत, उद्या सकाळी सहा वाजता मी टच आहे”
“बर पण लवकर या”
ट्रॅक्टर मालक म्हणाला.
मला थोडी धाकधूक वाटत होती कारण ते प्रत्यक्ष उद्या सकाळी फडात येईपर्यंत त्यांचा काय भरवसा वाटत नव्हता. त्याची चिंता करतच झोपलेलो. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मला मुकादमाचा फोन आला.
“मालक कधी येणाराय,आम्ही आलोय”
मी शाळेला जायच्या गडबडीत होतो मुलाला नारळ आणि पैसे घेऊन पाठवून दिले. मुलगा शेतात पोचतोय तोपर्यंत शेजारचा ऊस मालक आणि मालकीण तेथे येऊन हजर झालेलीत.
तो आमच्यात आलेल्या टोळीला आमचा ऊस तोडा म्हणून पाठीमागे लागलेला. परंतु चिरंजीव त्यांना म्हणाला,
“अहो , आमचा ऊस तोडायला आल्यात आणि तुम्ही कसं म्हणता आमचा ऊस तोडा म्हणून?”
“तुमच्याआधी मी त्यांना सांगून ठेवलेय” शेजारची ऊस मालकीण म्हणाली.
“अहो ,आमचे पप्पा दररोज त्यांच्याकडे जात होते.”
“आमचं पाहुणं आहेत ते,आमचं दाजी लागत्यात ते”
शेजारच्या ऊस मालकीण म्हणाल्या. असे म्हणून त्यांनी ट्रॅक्टर मालकाला फोन लावला.
ट्रॅक्टर मालकाने फोन उचललाच नाही. त्यांनी त्यांच्या पत्नीला तूच बोल म्हणून सांगितले.
“एवढा धरलाय तो फड होऊ दे ,मग मी तुझा फड तोडायला सांगतो”
ट्रॅक्टर मालकाची पत्नी त्यांना म्हणाली.
मग मुकादमाने आमचा ऊस तोडायला सुरुवात केला.मी शाळा सुटल्यावर शेतात पोहोचलो.ऊसाच्या पडलेल्या खोडक्या गोळा करु लागलो.तासाभराने टोळीचा मुकादम माझ्याकडे आला.
“मालक ,गाडी जरा द्या ,खोपटावरनं जाऊन येतो”
त्यांना नाही म्हणायची सोय नव्हती.अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी गत. मुकादम गाडी घेऊन गेला आणि थोड्या वेळाने परत आला.तेवढयात ट्रॅक्टर मालकाचा फोन आला,
“मालक चिटबाॅयकडनं वजनाच्या पावत्या घेऊन या जावा”
गाडी घेऊन पावत्या आणायला चाललो होतो . पहातोय तर गाडीत पेट्रोल नाही.शंका आली मुकादमनं काढून घेतले असणार .पण त्याला बोलायची सोय नव्हती.ऊस मध्यात सोडून गेला तर ?याची धाकधूक.तोंड दाबून बुक्यांचा मार शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय याची जाणीव झाली.
चार वाजता ट्रॅक्टरमध्ये ऊस भरायला सुरुवात झाली. भरलेला ऊस बाहेर काढू लागले आणि ट्रॅक्टर रुतला, बाहेरच येईना . जागेवरच गरागरा फिरु लागला.झाले बांधलेल्या उसाच्या मोळ्या रुतणाऱ्या चाकाखाली टाकल्या,तो आता तिथेच रुतून बसला तर बाहेर येणार नाही म्हणून लगेच दुसरा ट्रॅक्टर जोडून तो सुखरुप बाहेर काढला.परंतु फडातून ऊस बाहेर काढताना ट्रॅक्टरचा टर्न बसेना ,शेजारच्या उसाच्या दोन तीन सऱ्यात ट्रॅक्टर जाऊन शेजाऱ्याचा ऊस मोडला. त्यामुळे मला चांगलीच काळजी वाटू लागली की आता शेजारी आपल्याला काही तरी बडबडणार कारण त्याच्या चांगल्या उसाचे चार मोळ्यांचे तरी नुकसान झाले असेल. म्हणून आमचा ऊस ठेवा पण अगोदर त्यांचा ऊस तोडा म्हणून कंत्राटदाराला सांगितले.
बांधावरुन जागोजागी ट्रॅक्टर हेलकावे खात चाललेला. चांगल्या रस्त्यावर जाईपर्यंत शेतकरी बांधवांच्या जीवात जीव नसतो.कारण पलटी होऊन कधी उलटतोय की काय याची धाकधूक सतत मनात लागलेली असते. चांगल्या रस्त्यावर आल्यावर ड्रायव्हरला खेपेला दोनशे रुपये दिले . मुकादमला खेपेला बाराशे रुपये द्यायचे ठरले होते.
“वडणीचं दया की मालक” म्हणून ड्रायव्हरनं आणखी दोनशे रुपये डब्बल ट्रॅक्टर लावून ओढलेले मागून घेतले. नाही देऊन सांगतोय कुणाला?
गपगुमान देऊन टाकले.कारण ट्रॅक्टरमधील दोन चार मोळ्या जाणूनबुजून टाकायला कमी करणार नाही तो.गरजवंताला अक्कल नसते अशी गत झालेली.आमच्या ऊसाची खेप घेऊन ट्रॅक्टर कारखान्यात गेला आणि मशिनरी बंद पडली कारखाना दोन दिवस बंद.ऊस वाळत पडलेला.शेतकऱ्यानं काय ठणाठणा करायचं?तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर रिकामा झाला.वीस बावीस टन‌ वजन‌ येईल असे वाटत होते परंतु सतरा टन भरले .एकाचे अठरा भरले,एकाचे एकोणीस इथेही तीन टनाचा वजनात घाटा.शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दहा वर्षांपासून कारखानदारांनी काटा मारु नये यासाठी ऊस कारखान्यासमोर वजन काटे उभारण्याची घोषणा केली होती, पण ती आजतागायत हवेतच आहे.
आमचा एक फड संपून दुसरा फड तोडायचा होता.परंतु तो फड अडचणीत होता.रस्त्याची अडचण होती.म्हणून अगोदर शेजारी असणारे ऊस तोडा म्हणून कंत्राटदाराला सांगितले.ते तोडून झाल्यावर आमचा फड धरला. एक खेप तोडून झाल्यावर पण ती अर्धीच खेप नेली.दुसऱ्या दिवशी ऊस तोडणारे आलेच नाहीत त्यामुळे बाकीचा ऊस वाळत तसाच दोन दिवस पडला.यामुळे जीव मेटाकुटीला आला होता.तिसऱ्या दिवशी ती खेप भरली. चौथ्या दिवशी एक आणि अर्धी भरली. त्यामुळे जानेवारी महिन्यातच सगळा ऊस जातोय म्हणून समाधान वाटले.पण ते अल्पकाळ टिकले कारण ती खेप वेळेवर कारखान्यात पोचलीच नाही.दुसऱ्या दिवशी सायंकाळी म्हणजे फेब्रुवारीच्या १ तारखेला ती खाली झाली. त्यामुळे त्याचे बील पुढच्या महिन्यात गेले.अशी सगळी त्रेधातिरपीट उडालेली.जगाच्या पोशिंद्याला सगळ्यांनीच लाचार बनवलेले.
✍️ अनिल शिणगारे 8329984569

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here