कांदा उत्पादकांच्या नजरेतून – दीपक चव्हाण

विषय – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ता. 12 ते 23 मे दरम्यान जारी होणारा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कांदा मार्केटवर होणारे दूरगामी परिणाम.

सध्याच्या कोरोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडतोय, हे शेतकरी जाणून आहेत. तथापि, शेतकऱ्याच्या अडचणीही प्रशासनाला समजल्या पाहिजेत. त्या दृष्टीने पुढील मुद्द्यांवर विचार व्हावा.

  1. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत दररोज सुमारे दहा हजार वाहनांद्वारे दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होते.
  2. दहा दिवस बाजार बंद असणे म्हणजे एक लाख वाहने साचून राहणे आणि त्यापुढील दहा दिवसांत एकूण दोन लाख वाहनांची दाटी होणे! पर्यायाने संसर्गवाढीला आमंत्रण मिळणे.
  3. आजघडीला देशाच्या रोजच्या कांदा खपाच्या तीस टक्के मालाची विक्री एकट्या नाशिक जिल्ह्यातून होतेय. ऐन आवक हंगामात दहा दिवस सर्व बाजार समित्या बंद ठेवणे म्हणजे कांदा मार्केटचा श्वास रोखण्यासारखे आहे.
  4. वाहन संख्या नियंत्रणात ठेऊन, फिजिकल डिस्टंसिंग कडक करून बाजार सुरळीत ठेवणे शक्य आहे. उदा. एखाद्या बाजार समितीत जर रोजची आवक एक हजार वाहनांची असेल तर तिथे पाचशे वाहनांना परवानगी द्यावी व कोरोना प्रोटोकॉलची अंमलबजावणी करून लिलाव सुरू ठेवावेत.

संदर्भ :

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार (ता.10) रोजी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात म्हटले आहे, “ता. 12 ते 23 दरम्यान जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद राहतील. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रीत पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील. याबाबत समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची राहील.”

वरील आदेशाचा आशय पाहता, नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागणार आहे. आधीच वाढत्या कोरोना संसर्गामुळे बाजार समित्या कधी बंद तर कधी चालू अशा प्रकारे रडतखडत सुरू आहेत. त्यात वरीलप्रमाणे सक्तीची बंदी लादली तर कांदाकोंडी आणखी तीव्र होईल. व्यापाऱ्यांना मजूर टंचाई व आनुषंगिक व्यवस्थापन करणे अवघड होते. आज माल खरेदी करून उद्या परवा विक्री करणारे बरेच व्यापारी सुद्धा मार्केट सुरू रहावे या मताचे आहेत.

उपरोक्त कालावधीत (विकेंद्रीत विक्री) शिवार खरेदी सुरू राहील. पण शिवार खरेदीत शेतकऱ्याची बार्गेनिंग पावर कमी होते. शिवार खरेदीचा बेंचमार्क दर ठरवण्यासाठी काही बाजार समित्या सुरू राहणे गरजेचे आहे. बाजार समित्यातील लिलाव प्रक्रिया प्राईस डिस्कव्हरीसाठी व शिवार खरेदीसाठीही उपयुक्त ठरत असते.

शेतकऱ्यांसाठी आवाहन : पॅनिक सेलिंग टाळा…
येत्या 15 सप्टेंबरअखेरपर्यंत म्हणजे खरीपातील नवे पीक येण्यापूर्वी — एकूण देशांतर्गत+निर्यात मागणीच्या तुलनेत — एकूण उन्हाळ मालाचा पुरवठा पाहता सध्याचे रेट किफायती नाहीत. त्यामुळे कडक लॉकडाऊन किंवा अन्य कुठल्याही दबावाला बळी पडू नये आणि जोपर्यंत बाजारभाव किफायती पातळ्यांवर जात नाही, तोपर्यंत उन्हाळ कांद्याची विक्री रोखून धरावी. पॅनिक सेलिंग करू नये. मात्र, आर्थिक अडचण, कांदा ठेवण्यास जागा नसणे, टिकवण क्षमतेबाबत खात्री नसणे या कारणांमुळे काही शेतकऱ्यांना विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. अशा गरजवंतांसाठी आपण थांबून जाणे म्हणजे एकमेकांना मदत करण्यासारखेच आहे. बाजारात जाताना डबल मास्क, उपरणे वापरावे आणि गर्दीपासून लांब रहावे, ही विनंती.

  • दीपक चव्हाण, ता. 10 मे 2021.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here