कमी जागेत भरघोस उत्पन्न देते कारल्यांची शेती

शेतीमध्ये कधी कधी उत्पादन व उत्पादनखर्च याचा ताळमेळ बसत नाही. जर अशा परिस्थितीत कारले लागवडीचा प्रयोग राबविला तर दुष्काळी भागामध्ये कारले लागवड वरदान ठरू शकते. कोणत्याही हंगामात कारल्याची लागवड करता येते आणि कमीत- कमी जमिनीत कारल्याचे अधिक उत्पादन घेता येते. खतांचे योग्य नियोजन, पाण्याचा प्रमाणशीर वापर इत्यादीचे बारकाईने नियोजन केल्यास कारल्याचे विक्रमी उत्पादन घेता येते.

कारले पिकासाठी जमीन – या पिकासाठी मध्यमभारी, पोयट्याची किंवा रेताड जमीनही उपयुक्त आहे.

हवामान – कारले पिकासाठी थंड व जास्त दमट हवामान जास्त मानवत नाही. अशा हवामानामुळे पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे उबदार हवामानात लागवड करणे फायदेशीर असते. वेलींची वाढ खुंटणे, परागकण तयार होणे, मादी फुलांवर सिंचन या महत्वाच्या प्रक्रियांवर थंड हवामानाचा प्रतिकूल परिणाम होतो. कारले पिकाच्या वाढीसाठी 24 ते 27 अंश तापमान फायदेशीर असते.

लागवडीची पद्धत –

जमिनीची चांगली नांगरणी करून घ्यावी, नांगरणीनंतर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगल्याप्रकारे भुसभुशीत करून घ्यावी. कुळयाचया पाळ्या देण्यापूर्वी 15 ते 20 टन योग्यप्रकारे मिसळून घ्यावे दोन ओळींमध्ये 2 ते 2.5 मीटर अंतर ठेवावे 50 सेमी रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात

वेलींमधील अंतर 1 मीटर ठेवावे लागवडीच्या वेळेस जर नत्र, स्फुरद, पालाश हेक्टरी 50 किलो या प्रमाणात टाकावे. लावणी करतांना 1 मीटर अंतरावर 2 ते 3 बियांची टोकन पद्धतीने लावणी करावी कारले लागवडीच्या ताटी व मंडप या दोन पद्धती फायदेशीर आहेत. कारल्याचे वेल जर आपण जमिनीवर पसरू दिले तर पाणी देतांना फळे सडू शकतात किंवा वेल पिवळे पडू शकतात. वेलींमध्ये हवा खेळती राहत नाही, त्यामुळे उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे मांडव पद्धत फायदेशीर ठरते.

आंतरमशागत – बियाण्याच्या उगवणीनंतर 1 ते 1.5 महिन्याने सऱ्या मोडून घ्याव्यात व हेक्टरी 50 किलो नत्राचा पुरवठा करावा. कारले पिकाला तणमुक्त ठेवणे फार महत्वाचे आहे, तण दिसायला लागल्यावर खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. नैसर्गिक पद्धतीने कार्ल्यामध्ये फळधारणा होते, परंतु अधिक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संजीवकाचा वापर करणे उपयुक ठरते. रोप दोन पानांवर आल्यानंतर जर आपण 10 दिवसाच्या अंतराने N. A. A 100ppm या संजीवकाचे फवारणी केल्यास मादी फुलांचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते.

पाणी व्यवस्थापन – या पिकास नियमित पाणी देणे महत्वाचे असते, परंतु फळे काढणीच्या वेळेस नियमित पाणी दिल्याने फळांची प्रत कमी होते किंवा फळे वेडीवाकडी होऊ शकतात. जास्त पाणी दिल्याने वेली पिवळ्या पडतात त्यामुळे गरज ओळखूनच पाण्याचे व्यवस्थापन करावे

कारल्यावरील रोग – या पिकावर केवडा, भुरी फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो.

भुरी – हा रोग जुन्या पानांपासून सुरु होतो कोरड्या हवेत पानाच्या खालच्या बाजूस पांढरी बुरशी लागते नंतर ती पूर्ण पानावर दिसून येते. या रोगाचे प्रमाण जर वाढले तर पाने गळून पडतात.

केवडा – उष्ण व दमट हवामानात या रोगाचे प्रमाण जास्त आढळते या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूस पिवळे डाग पडतात, नंतर हे डाग वाढत जाऊन पानांना काळसर रंग चढतो. याच्या नियंत्रणासाठी SRP-200 ग्रॅम +झिंक 100 ग्रॅम प्रती 100 लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा ड्रीप मधून मॅक्सवेल -2.5 किलो +हंस 500 मिली प्रती एकर ड्रीप मधून द्यावे.

फळमाशी – फळमाशी ही कीड प्रामुख्याने खरीप आणि उन्हाळी हंगामात आढळते. या किडीचे पतंग कळीच्या त्वचेमध्ये अंडी घालतात ते अंडे उबल्यानंतर अळ्या फळांमध्येच वाढतात. पूर्ण वाढीनंतर फळ पोखरून बाहेर येतात त्यामुळे फळे छिद्रयुक्त दिसतात व वाकडी होतात.

उपाय – याच्यावर खात्रीशीर उपाय म्हणजे अशी फळे दिसताक्षणी तोडावीत व पुरून किंवा जाळून टाकावीत. शिफारशीनुसार एका आठवड्याच्या आत दोन ते तीन फवारण्या केल्यास रोग आटोक्यात येतो.

लेखक –

रत्नाकर पाटील- देसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here