ऊसामधील तणनियंत्रण भाग 5

तणनाशक केव्हा वापरावे
तणनाशकाच्या वापरावरून तणनाशकाचे दोन प्रकार पडतात.
अ) तणांची उगवणहोण्यापूर्वी वापरण्याची तणनाशके(प्रीइमर्जन्स हर्बिसाइडस्)
ब) उगवण झालेल्या तणावर वापरण्याची तणनाशके(पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइडस्)

अ) उगवणपूर्व तणनाशके :
मेट्रिब्युझिन, सिमॅझाईन, ऍट्राझिन आणि डायुरॉन ही तणनाशके ऊसाची लागण केलेल्या शेतात तणांची उगवण होण्यापूर्वी मातीवर फवारायची असतात. पुरेसा ओलावा असेल तर ही तणनाशके भू द्रावणातून वहन होऊन अंकुरणार्‍या बीयांच्या संपर्कात येतात. त्यांचे शोषण होऊन पुढील क्रिया घडते. जमिनीच्या वरच्या एक इंच थरामध्ये तण वनस्पतींचे जे बीज असते त्यांचा बिमोड या प्रकारच्या तणनाशकाने होतो. प्रामुख्याने नुुकतेच अंकुरण होत असलेल्या तणाच्या बीजावर या तणनाशकाचा परिणाम होतो. सोयाबीन, घेवडा, चवळी, हरभरा यासारखी पिके ४ ते ५ इंच खोलीवर पेरणे अपेक्षित असते. त्यामुळे त्यांच्या उगवणीवर या तणनाशकांचा अनिष्ट परिणाम होत नाही. पण पेरणी खोल व्हावी.

ब) तणांची उगवण झाल्यानंतर वापरायची तणनाशके(पोस्ट इमर्जन्स हर्बिसाईडस्)
लव्हाळा, हरळी यासारखे तणाचे प्रकार उगवणपूर्व तणनाशकांनी नियंत्रित होत नाहीत. त्यासाठी त्यांच्या पानावर वेगळी तणनाशके फवारावी लागतात. २, ४-डी आणि सेंकॉरचे मिश्रण याबाबतीत चांगले प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे ग्लायफोसेट व ग्रामोक्झोन यांचाही काळजीपूर्वक फवारा उपयुक्त ठरतो. ऍस्युलम आणि ऍक्ट्रील डी यांचे मिश्रणसुद्धा उगवण झालेल्या तणांचे चांगले नियंत्रण करते. उगवणपूर्व तणनाशकांची फवारणी शेतामध्ये सरसकट केली जाते. पण २, ४ डी हे उगवण पश्‍चात फवारणीने ऊसाला थोडीसुद्धा हानी न होता वापरण्याजोगे भरवशाचे तणनाशक आहे. उभ्या ऊसामध्ये ग्लायफोसेट, ग्रामोक्झोन, मिरा ७१ ही तणनाशके वापरणे जोखमीचे असते. अत्यंत काळजीपूर्वक वापरली तरच उपयोग होतो.
क्रमशः

डॉ. बी. एम. जमदग्नी (सर), M.Sc. (Agri), Ph.D.
वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी